मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांवर ट्वीट डिलीट करण्याची नामुष्की

Update: 2018-12-21 13:41 GMT

मॅक्स महाराष्ट्रने दिनांक २० डिसेंबरला कॅबिनेटच्या निर्णयानंतर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ या आशयाची बातमी पोस्ट केली होती. त्यामध्ये मंत्रीमंडळाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी दीडशे कोटी रूपयांची तरतूद मंत्रीमंडळाने केली होती. मात्र, वास्तविक पाहता सरकारच्या निर्णयानुसार १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये अनुदान मिळणार आहे. एकूण ७५ लाख टन कांद्याला ही मदत मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमुद केले होते. त्यासाठी त्यांनी दीडशे कोटी रूपयांची तरतूद केल्याचं आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. तसंच आत्तापर्यंतची ही सर्वाधिक मदत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

प्रत्यक्षात ७५ लाख टन कांद्याला प्रति क्विंटल २०० रूपये अनुदान द्यायचे असेल तर ती रक्कम दीड हजार कोटी रूपये इतकी भरते. याचाच अर्थ अनुदानासाठी आवश्यक असलेल्या रक्कमेच्या दहा पट कमी तरतूद सरकारने केलेली आहे. सरकारला अजून १३५० कोटींची तरतूद करावी लागेल. असं आम्ही पोस्ट केलेल्या बातमीमध्ये म्हटलं होतं. दरम्यान महाराष्ट्राचे एकूण वार्षिक कांदा उत्पादनच ७० ते ८० लाख टन असताना मुख्यमंत्र्यांच्या पोस्टमध्ये १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या दरम्यान ७५ लाख टन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.

मॅक्स महाराष्ट्रने केलेल्या या पोस्टनंतर मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटवर अकाऊंटवरुन हे ट्विट डीलीट करण्यात आले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्वीट डिलीट करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री कार्य़ालयाकडून या नंतर कोणताही खुलासा अद्याप पर्यंत करण्यात आलेला नाही.

Full View

Similar News