सीएमनी खेळवले, दानवेंनी लोळवले

Update: 2017-06-03 13:45 GMT

राज्यातील देवेंद्र सरकार आणि भाजपाने तर केंद्रातील मोदी सरकारलाही मात दिलीय. जुमला सरकार ही केंद्र सरकारची बिरुदावली राज्य सरकारने तंतोतंत उचलली आहे..किंबहूना राज्य सरकार तर त्यापुढे गेलंय. “अगा जे घडलेचि नाही” ते कसे प्रत्यक्ष घङले आहे, याचा भास या सरकारने आणि त्यांच्या महान पक्षाने निर्माण केला आहे... गोष्ट आहे शेतक-यांच्या संपाची... हा संप सामोपचाराने मिटला असून शेतक-यांनी सरकारच्या आश्वासनानंतर संप मागे घेतल्याची घोषणा गढीवरून फडणवीसांनी केली. तर पहाटे घडलेल्या या घटनेचे जणू पहाटस्वप्नच त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना पडले असावे. त्यांनी तर कढी केली. सरकारने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळेच शेतक-यांनी संप मागे घेतल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.

दिव्यत्व लाभलेल्या या प्रदेशाध्यक्षांना तर 31 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी करण्यात येणार असल्याची दिव्यदृष्टी प्राप्त झालीआहे, वास्तविक अल्पभूधारक शेतक-यांना कर्जमाफी देण्याबाबतची समिती नेमण्याचा हा निर्णय आहे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत कोणताही निर्णय नाही तर हमीभावापेक्षा कमी दर देणा-यांवर कारवाई करू हे घासून घासून गुळगुळीत झालेले आश्वासन. राज्य कृषीमूल्य आयोग गठित करण्याचा निर्णयही गेल्या वर्षीचाआणि इतर त्याच त्याच वल्गना आणि तीच तीच आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत. मात्र, ही आश्वासने म्हणजे समस्त शेतकरी वर्गाचे कल्याण करणारा निर्णय असल्याचे भासवण्यात आणि तशी पत्रकबाजी करण्यात दानवेंचा हात कोण धरणार ?

गेल्या अडीच वर्षात या सरकारने शेतक-यांची सर्वाधिक मदत केल्याचा दावा भाजपाने आपल्या पत्रकात केला आहे. मात्र, त्यांनी कोणतीही आकडेवारी दिलेली नाही. मोघम बोलणे, रेटून बोलणे आणि दिशाभूल करणे या तत्वावरच हे सरकार चालले असून सर्वसामान्य शेतक-यांची फसवणूक करीत असल्याचे दिसते आहे. “चूनावी जूमला” ही संकल्पना इतकी पक्की या सरकारच्या आणि पक्षाच्या डोक्यात बसली आहे की, त्यांना प्रत्येक गोष्टीत केवळ लोकप्रिय घोषणा करायची सवय झालीय. ती घोषणा पूर्ण होईल की नाही, त्याची अंमलबजावणी करता येईल की नाही, याचे कसलेही तारतम्य न बाळगता केवळ पत्रकबाजी आणि घोषणाबाजी हाच मूलमंत्र या सरकारचा असल्याचे दानवेंनी दाखवून दिले आहे. अडचणीत असलेल्या शेतक-यांना गोड बोलून काही जूजबी आश्वासने देवून मुख्यमंत्र्यांनी रात्रीत कमाल केली. तर कर्जमाफीसह शेतक-यांचे सर्व प्रश्न संपल्याचा दावा करीत दानवेंनी धमालच केली आहे.

Similar News