वाघ एक...संकटे अमाप...!

Update: 2017-02-18 08:07 GMT

भारतीय जंगलांचा अनभिषिक्त सम्राट आज अनेक संकटांनी घेरला गेला आहे. अवैध्य शिकार, सतत संपणारे-नष्ट होणारे अधिवास, अतिपर्यटन आणि अश्याच अनेक समस्या आज वाघांच्या जीवावर उठल्या आहेत. मागील पाच वर्षातील वाघांच्या मृत्यूचे आकडे बघितल्यास सर्वकाही अगदी स्पष्ट होते. २०१२ साली ७२, २०१३ मधे ६३, २०१४ साली ६६, २०१५ साली ७० आणि २०१६ साली सर्वात जास्त तब्बल १०२ वाघ मृत्युमुखी पडले. २०१६ साली मृत्यू पावलेल्या १०२ वाघांपैकी ४६ वाघांच्या शिकारी झाल्या असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अगदी २०१७ हे वर्ष सुरु झाल्या झाल्या पहिल्याच महिन्यात आपण दोन वाघ गमावलेत.

२०१३ मध्ये मेळघाटामध्ये झालेल्या वाघांच्या शिकारीमुळे विदर्भातील व्याघ्र संरक्षणाचे तीन-तेरा कसे वाजले आहेत याची प्रचीती आली. पुढे चौकशीतून निष्पन्न झाले की रणजितसिंग भाटीयाच्या आंतराष्ट्रीय टोळीने संपूर्ण देशभरातील जंगलांमध्ये उच्छाद मांडला होता. मुळात देशभरात वन्यजीव संवर्धनाचे व संरक्षणाचे जे प्रयत्न सुरु आहेत ते सदोष आहेत हे मागील ५-१० वर्षात वारंवार सिद्ध झाले आहे.

“वाघ एक....संकटे अमाप” अशीच काहिशी आज वाघांची अवस्था झाली आहे. त्यातील काही संकटे वन व वन्यजीव विभाग यांच्या माध्यमातून नक्कीच टाळता येण्यासारखी आहेत. गुन्हे घडतच असतात, पण गुन्हे घडूच नयेत म्हणून काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात हे आपण सपशेल विसरलोय. “Prevention is better than cure” ही म्हण आपण नेहमीच बोलतांना वापरतो पण प्रत्यक्षात मात्र आणत नाही.

विदर्भा वनप्रदेशातील किंवा लगतच्या प्रदेशात ९९% शेतांमध्ये विजप्रवाहित तारांचे कुंपण लावले जाते. हे कुंपण शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी लावले जाते. अशा प्रकारच्या कुंपणात विजेचा धक्का लागून रोज कित्येक वन्यप्राणी मृत्युमुखी पडत आहेत. अगदीच २०१७ ची सुरवातच Tiger Capital असलेल्या नागपूर मधील खापा वनपरिक्षेत्रात एक वाघीण व दोन सांबर विजेच्या धक्क्याने मृत्यू पावून झाली आहे. यावर उपाय म्हणून सौर उर्जेवर चालणारी विद्युत कुंपणे वापरली जाऊ शकतात. पण ती सहजरीत्या उपलब्ध करून देण्याची जवाबदारी सरकारची आहे. वन विभाग अश्या घटना टाळण्यासाठी प्रयत्नात असतोच, पण खरी जवाबदारी असलेलं विद्युत महामंडळ मात्र अतिशय उदासीन आहे, अश्याप्रकारची कुंपणं शक्यतोवर चोरीची वीज वापरून लावली जातात. चोरीची वीज जरी नाही वापरली तरी विद्युत विभाग देत असलेल्या विजेचा उपयोग अयोग्य प्रकारे होत असेल तर त्यावर कारवाई करण्याची जवाबदारी ही विद्युत विभागाचीच आहे. खरतर नीलगाय, काळवीट, रानडुक्कर अशा प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना अतिशय त्रास होतो. पण त्यावर त्या वन्यप्राण्यांना ठार करणे हा पर्याय नक्कीच योग्य नाही. मुळात या प्राण्यांची निसर्गातील संख्या का वाढली? हे प्राणी शेतशिवारांमध्ये का शिरायला लागलेत हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. काळवीट, नीलगाय, रानडुक्कर यासारख्या वन्यप्राण्यांचे नैसर्गिक नियंत्रक असलेल्या प्राण्यांची निसर्गातील संख्या ही अतिशिकार व वास्तव्य ठिकाणांचा ऱ्हास झाल्याने झपाट्याने कमी झाली आहे. चित्ता तर भारतातून नष्टच झाला असे असतांना या तृणभक्षी प्राण्यांची संख्या तर वाढणारच ना? आज आपण या तृणभक्षी प्राण्यांच्या चराईक्षेत्रात सुद्धा अतिक्रमण केल आहे. हजारो-लाखो गुर-ढोर जंगलांमध्ये चराईसाठी नेली जातात. यात आपल्याकडील स्थानिक लोकांची गुर तर आहेतच शिवाय मागील काही वर्षात काठीयावाडी लोकांची हजारो-लाखो गुरे आपल्या भागात आली आहेत. या वन्यप्राण्यांना जंगलात खाण्यालायक गवत व तत्सम चारा नसेल तर ते प्राणी सहजरीत्या उपलब्ध होणारा शेतमाल खाणार नाही तर काय? त्यात आपलं सरकार पण ग्रेटच “नुकसान भरपाईच्या नावावर शेतकऱ्याच्या हातात खाकस देऊन मोकळे”. मुळात शेतकऱ्याचे नुकसान न व्हावे यासाठी शेतीशिवाराच्या सभोवतालच्या परिसरात उत्तम चराई क्षेत्र तयार केल्यास शेतात शिरून पिकांच नुकसान करणाऱ्या तृणभक्षी प्राण्यांच्या संखेत नक्कीच घट होईल.

मागील काही वर्षात विदर्भात नव्याने काही अभयारण्ये घाई-घाईने सुरु झाली आहेत. पण, ही अभयारण्ये वन्यप्राण्यांचे रक्षण करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या भरवशावर पर्यटन करण्यासाठी तयार झाली आहेत. ही अभयारण्ये परिपक्व होण्याआधीच पर्यटनासाठी फळवली गेली आणि त्यामुळे जे अनिष्ट परिणाम सभोवतालच्या ग्रामीण प्रदेशावर झालेत त्याला जवाबदार कोण? अरे किती भागावर पर्यटन कराव याला काही मर्यादा आहे की नाही? या अति पर्यटनामुळे हजारो वन्यप्राणी मानवाबद्दल Habitual (सवईचे) झाले आहेत. त्यांच्या मनात असलेली मानवाबद्दलची भीती कमी झाली आहे आणि असे निडर झालेले वन्यजीव पर्यटकांसाठी नसतील पण, सभोवतालच्या प्रदेशातील गावकऱ्यांसाठी नक्कीच धोकादायक ठरतील हे वेळीच जाणून घेण्याची गरज आहे.

वाघ हा प्राणी एकाकी जीवन जगणारा प्राणी असून अतिपर्यटन सुरु असल्याने बरेच वाघ एकांतवासाच्या शोधात गावांच्या जवळपास येतात व तिथे सहज मारता येणार भक्ष म्हणून गुरा-ढोरांवर हल्ला करतात. गावांमधील गुरं-ढोरं वाघाच्या हल्ल्यात ठार होतात तेव्हा त्या मृत जनावरावर विष टाकूनही वाघांचा घात करण्याच्या घटना घडतच असतात. निव्वळ बदला म्हणून या देखण्या व उमद्या जनावराला ठार केलं जातं. काही वेळेस वाघ व इतर प्राणी पाणी पिण्यास येणाऱ्या पाणवठ्यावर पाण्यात सुद्धा विष कालवले जाते आणि यात अनेक वन्यप्राणी आपला जीव गमावतात. मला आठवते, ज्यावेळी मी या क्षेत्रात एक हौशी विद्यार्थी म्हणून काम करण्यास सुरवात केली, त्यावेळी मी विविध जंगलांमध्ये स्थानिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह गस्ती करीत असे तेव्हा ते कर्मचारी पाणवठ्यातील पाण्यात विष आहे का याची खात्री करण्यासाठी लिटमस पेपर चा वापर करीत असे, आजकाल मात्र तसे होतांना दिसत नाही.

काही विशिष्ट जमातीचे लोक वाघांचे शिकारी म्हणून कुप्रसिद्ध आहेत. त्यांची वाघाला ठार करण्याची पद्धत सुद्धा अतिशय क्रूर आहे. या लोकांचा जंगलाचा व प्राण्यांच्या सवईचा अभ्यास भारी असल्याने कुठल्याही नवीन वनप्रदेशात सुद्धा जाऊन हे लोक लीलया शिकार साधतात. या जमातीकडे लोखंडी सळइंनी बनलेला स्प्रिंग लावलेला एक फास असतो जो साखळीच्या सहाय्याने बांधून ठेवलेला असतो, हा फास वाघाचे आवागमन होत असलेल्या मार्गावर बेमालूमपणे लावला जातो. या फासावर वाघाचा पाय पडल्याबरोबर फासाचा स्प्रिंग निसटून तो फास अतिशय जोरात बंद होतो व वाघाचा पाय त्यात अडकतो. हा फास इतका वेदनादायी असतो की साधारणतः वाघ रात्रभरात वेदनेने विव्हळून मरण पावतो. जर एखादा वाघ जिवंत राहिलाच तर हे लोक त्या वाघाच्या तोंडात लाठी अगदी घश्यापर्यंत खोल घालतात व पूर्ण शरीरावर लाठ्यांनी वार करून या रुबाबदार वाघाला संपवतात. मग तिथेच त्याची कातडी सोलून घेऊन जातात. या जमातीसाठी अभयारण्ये आणी व्याघ्र प्रकल्प म्हणजे एकप्रकारची बँक आहे. तिथे असलेले वाघ मुद्दल असून त्यांच्यापासून प्रजनन होऊन वाढणारे वाघांची पिल्ल वयस्क होऊन एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जातात ते म्हणजे त्या मुद्दलाच व्याज आहे.हे शिकारी त्या बाहेर पडलेल्या व्याजाचा म्हणजेच नवीन वाघांचा मार्ग अचूक हेरून सापळे लावतात व त्यांची शिकार करतात. कारण अश्या भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था कमी असते किंवा नसते म्हणजेच या शिकाऱ्यांना कमीत कमी धोका पत्करून शिकार साधता येते. गेल्या काही वर्षात वाघाच्या अवयवांचा हा अवैध व्यापार अगदी उच्चांकावर पोहचला. आंतराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या मागणीमुळे हे शिकारी अगदी बिनधास्तपणे व्याघ्र प्रकल्पांमध्येसुद्धा शिकार साधू लागलेत हे गेल्या १० वर्षातील घडलेल्या अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. पर्यटन वाढल्याने वाघांच्या सुरक्षेत वाढ होते अश्या फोक्नाड्या मारणाऱ्या सरकारला आणि निवडक कार्यकर्त्यांना हे माहीत नसेल काय हा प्रश्न आज सामान्यांना पडला आहे. आणि अश्या पर्यटनाने जर वाघ सुरक्षित राहले असते, वाघांवर नजर ठेवणे सोप्पी झाले असते, तर उमरेड करहान्डला मधील T१ उर्फ जय नावाचा वाघ बेपत्ता झाला नसता असे माझे प्रामाणिक मत आहे.

जंगलव्याप्त प्रदेशांजळील गावांमध्ये चितळ, सांबर, ससे, व तत्सम वन्यजीव जिभेचे चोचले पुरविण्यासाठी ताराचे फासे लावून मारले जातात. हे प्राणी मारण्यासाठी जे फासे लावले जातात त्यातच सांबर, चितळ हे प्राणी अडकण्याऐवजी वाघ अडकतो व फाशी लागून मरतो या घटनाही कमी नाहीच. अगदी दीड वर्षापूर्वी मी आणि माझ्या काही साथीदारांनी बोर व्याघ्रप्रकल्पा जवळ्च ५८ अश्याच प्रकारचे फासे शोधून वन विभागाच्या मदतीने जप्त केले होते. विशेष म्हणजे त्या भागात त्यावेळी एक वाघीण तिच्या पिल्लांसह फिरत असल्याचेही निदर्शनात आले होते. वनविभागाचे प्रयत्न कमी आहेत असे माझे मुळीच म्हणणे नाही. पण, हे प्रयत्न योग्य दिशेनी नक्कीच नाही एवढे मात्र खरे.

नॅशनल टायगर कन्झर्वेशन अॅथारीटी या शासकीय संस्थेने वाघांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या व्यवस्थांबाबत नुकतेच एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य वैज्ञानिक वाय. व्ही. झाला यांनी देशात व्याघ्र संरक्षणासाठी केल्या गेलेल्या उपाययोजनांमुळे वाघांची संख्या ६% नी वाढल्याचे सांगितले. सध्याच्या गणनेनुसार २२०० वाघ भारतात आहेत असेही ते म्हणाले. ही बातमी प्रथमदर्शनी आनंददायी भासत असली तरी मुळात वाघांची ही संख्या किती दिवसात वाढली हे जाणून घेतल्यास योग्य ठरेल. ब्रिटीश राजवट असताना वनविभागाचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन १८६० पासून आपल्या देशात सरू झालं. १९०० साली वाघांची संख्या अंदाजे तब्बल ४० हजार एवढी असल्याच्या नोंदी आहेत. खेळ आणि मनोरंजनाच्या हव्यासापायी या सुंदर वन्यजीवाची शिकार होऊ लागली. पुढे ट्रॉफी, कातडं व नखाच्या व्यापारासाठी वाघ मारले जाऊ लागले. स्वातंत्र्यानंतर वाढत्या लोकसंख्येमुळे वाघांच्या अधिवासावर आक्रमण वाढलं. त्यातून वाघाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. १९६० साली भारतातील वाघ नामशेष होतील की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली. त्यामुळे १९७० सालापासून वाघाच्या शिकारीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली. तत्कालीन प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधींनी वन्यजीव संवर्धनाचे महत्व लक्ष्यात घेऊन १९७२ साली भारतात वन्यजीव संवर्धन अधिनियम १९७२ हा कायदा अस्तित्वात आणला. १९७२ साली देशात प्रथमच वाघांची गणना करण्यात आली. या गणनेत केवळ दोन हजार वाघ असल्याचं आढळलं. वाघांची झपाटयाने कमी होणारी संख्या देशासाठी चिंतेचा विषय आहे हे लक्ष्यात घेऊनच वाघांचे अधिवास संरक्षित करण्यासाठी १९७३ पासून देशात व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली. २००६ साली केलेल्या व्याघ्र गणनेत वाघांची संख्या फक्त १६५७ एवढी होती. तर २०१० साली १८७५ एवढी वाढली आणि आता २०१७ मध्ये २२००. एकंदरीतच१९७२ च्या २००० च्या आकड्यावरून तब्बल ४४ वर्षांच्या दीर्घ काळात आपण देशातील वाघांची संख्या फक्त दोनशे ने वाढविण्यात यश मिळवले.

१९०० सालात ४०,००० च्या जवळपास असणारी वाघांची संख्या आज २२०० असतांना आनंद वाटून घ्यावा की दुख: हेच कळायला मार्ग नाही.........!

  • पराग हे. दांडगे

एन्व्हार्मेटल रिसर्च अॅड कन्झर्वेशन सोसायटी इंडिया( ERCS,India)

Similar News