राजकीय क्षितिजावरून २०१७ कडे मागे वळून बघताना...

Update: 2017-12-30 10:49 GMT

वर्षाच्या शेवटी अनेकजण विविध गोष्टींचा मागोवा घेत असतात. या प्रवाहात माझ्या अल्पमतीनुसार भारतात ढोबळमानाने काय घडलं हे मांडण्याचा या लेखात प्रयत्न करणार आहे. २०१४ साली आलेली मोदी लाट ओसरली की अजूनही कायम आहे याची चाचपणी आमचे माध्यमं सतत करत असतात. किंबहूना कोणत्या बातम्या नसल्या की कोणीतरी त्यांचा सर्वे आपल्या माथी मारतात. हे वर्षदेखील याला अपवाद नव्हते मात्र यंदा विविध राज्यात वेगवेगळ्या निवडणुकांत खरंच कोणता पक्ष किती पाण्यात आहे हे कळाले.

वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर, उत्तर प्रदेश या राज्यात पंजाब वगळता इतर सर्वत्र भाजपचे कमळ फुलले. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या रूपाने कट्टर हिंदुत्ववादी चेहरा भाजपने मुख्यमंत्रीपदी विराजमान केला. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या फुटीला सामोरे जावे लागले. अखिलेश आणि मुलायम यांच्या कौटुंबीक वादात पक्ष पार धारशाही झाला. त्याचा फायदा आपल्याला होईल असा होरा लावत काँग्रेसने सपासोबत आघाडी केली. चाळीशीतले (तरुण?) राहुल आणि अखिलेश यांनी नव्या युगाची पाऊले ओळखत एकत्र येऊन भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण तो पूर्णपणे फसला. चारशेहून अधिक आमदार असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत सव्वा तीनशेच्या आसपास आमदार निवडून आणत मोदी-शहा जोडीने त्यांच्या मजबूत नियोजनाचा दाखलाच दिला.

त्याचवेळी गोवा, मणिपूर राज्यात झालेल्या भाजपला बहुमातापेक्षा जागा कमी मिळाल्या. या राज्यांत काँग्रेस सत्ता स्थापन करू शकली असती पण मुत्सद्दीगिरीतसुद्धा आम्हीच उस्ताद हे भाजपने दाखवून दिले आणि तिथेही आपला झेंडा रोवला. उत्तराखंडातही भाजपला एकहाती सत्ता मिळाली.

पुढे जुलैमध्ये राष्ट्रपती निवडणुकीत भाजपने अशी काही खेळी केली की काँग्रेससह इतर विरोधक भांबाहून गेले. भाजपने कितीही नाकारले तरी विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यारूपाने दलितकार्ड खेळून भाजपने आपण खरे धर्मनिरपेक्ष आहोत असे जनमानसात बिंबवण्याचा प्रयत्न केला. सर्व आकडे राष्ट्रीय लोकशाहीला अनुकूल होते तसेच नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने कोविंद यांना समर्थन दिल्याने ते सहजगत्या निवडून आले. त्यानंतर ऑगस्टमध्ये उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीतही तेच चित्र कायम राहिल्याने वेंकय्या नायडू जिंकले.

वर्षाच्या शेवटी बहुप्रतिक्षीत गुजरात निवडणूक पार पडली तिथेही भाजपने बाजी मारली. अमित शहांनी जाहीर केलेले मिशन १५० जरी उधळले गेले तरी भाजप सत्तेतच राहिली. काँग्रेसने वर्षभरात भाजपला कडवी झुंज दिली ती मोदींच्या होम पिच असलेल्या गुजरातमध्येच. एकही स्थानिक चेहरा नसताना काँग्रेसने गुजरातमध्ये मिळवलेले यश लक्षणीय आहे. काँग्रेसच्या मणीशंकर अय्यर, कपिल सिब्बल यांनी तसेच युवा देशाने ऐनवेळी काही सेल्फ गोल करून काँग्रेसचे नुकसान केले, अन्यथा चित्र वेगळे दिसले असते. या निवडणुकीत एक मात्र प्रकर्षाने जाणवले की राहुल गांधी यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. नरेंद्र मोदी यांना ते आत्ताच आव्हान देऊ शकतील असा माझा अजिबात दावा नाही मात्र येणाऱ्या काळात राहुल यांनी मेहनत घेतली तर काहीही अशक्य नाही हे गुजरात निवडणुकीने दाखवून दिले.

देशात वर्षभरात विविध राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्याही निवडणुका झाल्या त्यात भाजपचं क्रमांक एक राहिली. दिल्लीत स्वतःला अनभिषिक्त सम्राट समजणारे अरविंद केजरीवाल यांना तिथल्या महानगर पालिकेत पराभवाचे तोंड पहावे लागले. तिथेही सत्ता भाजपने स्थापली. महाराष्ट्रात मुंबई मनपात कधीनाही ते शिवसेनेच्या तोंडाला भाजपने फेस आणला हे सत्य नाकारून चालणार नाही.

थोडक्यात २०१७ वर्षात भाजपने काँग्रेसमुक्त भारत या त्यांच्या संकल्पाकडे दमदार घोडदौड कायम ठेवली. यात मोदी शहांनी भारतीय जनता पक्षाला जवळपास 'मोदी जनता पार्टीत' रूपांतरीत केले. तर दुसरीकडे स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणारी काँग्रेस एकएक राज्य गमावत गेली (अपवाद पंजाब) तसेच नवीन कोणत्याच राज्यात सत्ता मिळवू शकली नाही. नाही म्हणायला वर्षअखेरीस गुजरातमध्ये काँग्रेसने बऱ्यापैकी चमक दाखवली पण त्यात एकटे राहुल गांधी जिम्मेदार नाहीत. राहुल गांधीसोबत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अलपेश ठाकूर यांचे योगदानही तिथे मोलाचे ठरले हे नाकारून चालणार नाही.

प्रादेशिक पक्षांबाबत बोलायचे तर ते भाजपकडे ओढले जात आहे. त्याचवेळी तामिळनाडूत सत्ताधारी एआयडीएमकेत अंतर्गत कलह वर्षभर सुरूच होते. दक्षिणेकडील राज्यात विशेष काही ठसठशीत झाले नसले तरी भाजप आपले संघटन मजबूत करताना दिसला, आगामी वर्षात तिथे बरेचं खेळ रंगतील.

बिहारमध्ये नितीश कुमारांनी अचानकपणे असा काही यु-टर्न घेतला की सगळेजण आवाक झाले. स्वतःला सेक्युलर म्हणवणारे नितीश रातोरात हिंदुत्ववादी मोदींच्या वळचणीला गेले. याआधी प्रसार माध्यमांनी २०१९साली नितीश कुमारांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मोदींना पर्याय म्हणून ढकलले होते. मात्र, राजकीय हवेची दिशा ओळखण्यात तरबेज असलेल्या नितीश यांनी लालूंचा 'लालटेन' विझवला. माझ्यामते यावर्षी गुजरातपेक्षा बिहारमध्ये भाजपने हस्तगत केलेली सत्ता ही भारतीय राजकारणातील Event of the year आहे.

पुढील भागात राजकीय क्षितिजावरून २०१७ कडे मागे वळून बघताना महाराष्ट्रात काय घडले हे बघूया.

क्रमशः

Similar News