भाजपच्या यशाचं सिक्रेट...

Update: 2017-04-22 04:55 GMT

निवडणूकांमधली आपली घौडदौड भारतीय जनता पक्षाने सुरूच ठेवलीय. अगदी काल-परवाच्या तीन महापालिकांच्या निवडणूकांमध्ये ही भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवलं. तीन पैकी दोन महापालिका खिशात घातल्या. एका महापालिकेची लॉटरी काँग्रेसला लागली. काँग्रेसजन लगेच राहुल गांधींच्या नेतृत्वाचं यश वगैरे म्हणून आपली लाज वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असताना बघून गंमत वाटतेय.

भारतीय जनता पक्षावर कितीही टीका केली तरी हा पक्ष सध्या निवडणूका जिंकतोय. निवडणूका जिंकण्यातलं सातत्य राखणं हे मोठं जिकीरीचं काम. पण जर या सर्व निवडणूकांचा अभ्यास केला तर तर विरोधी पक्षांनी भाजपला जिंकण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक ठेवलेला नाही हे सहज लक्षात येतं. एका रणनितीने भाजप सर्व निवडणूकांना सामोरं जात आहे. तर विरोधी पक्षांकडे अशा रणनितीचाच अभाव दितोय. काल एका टीव्ही चॅनेलवर झालेल्या चर्चेत मी गंमतीनं म्हटलं की, 2012 सालीच प्रश्नपत्रिका फुटलेली असूनही, गाईड जवळ असूनही काँग्रेसला उत्तरपत्रिका सोडवता येत नाहीय. निवडणूकांच्या नियोजनातील नरेंद्र मोदी आणि अमित शहा याची धडाडी आणि आघाडी खरोखरच अभ्यास करण्याजोगी आहे. त्या नियोजनाला ग्राऊंड टच आहे. निवडणूक जिंकण्याचं मॉडेलच त्यांनी तयार केलंय, आणि ग्रामपंचायत ते संसद सगळीकडे हे मॉडेल सध्या लागू पडतंय.

भाजपनं नेमकं काय केलंय...

भाजप नेमकं निवडणूका का आणि कसं जिंकतोय हा प्रश्न अनेकांना पडला आहे. आपल्या तीन वर्षाच्या कार्यकालात लोकांचं जीवनमान बदलून टाकेल असं फारसं काही न करताही नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी झालेली नाही. मधल्या काळात डिमॉनेटायझेशन सारखा अतर्क्य निर्णय घेऊनही लोकांची त्यांना सहानुभूती आहे. उद्या देशासाठी मोदींनी स्वत:ला फटके मारून घ्या सांगीतलं तरी लोक तसं करतील. लोकांच्या मनावर मोदींचं गारूड आहे. ते काही त्यांनी खूप लोककल्याणकारी कामं केली आहेत किंवा भारतीय जनता पक्षाचा करिष्मा आहे म्हणून नाही. ही मोदींची वैयक्तिक जादूगिरी आहे. टोकाची धार्मिक अस्मिता पाळणारा हा माणूस या देशातील सेक्युलरीजम म्हणजेच धर्मनिरपेक्षतेला उघड आव्हान देतो, मग तो लगेच गांधी-डॉ. आंबेडकरांचा फोटो वापरतो. हा माणूस मुस्लीम द्वेष्टा, जुन्या परंपरांचा दुराभिमान बाळगणारा आहे, त्याच वेळेस तो सबका साथ सबका विकास बोलत असतो. तो लोकांच्या खिशातले पैसेच संपवतो, त्या पैशांना कागज का टुकडा बनवतो, आरबीआय सारख्या संस्थेच्या स्वायत्ततेला एकदम आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून टाकतो.. तो व्हिलन आहे..तरी लोकांना आवडतोय. याचं काय कारण असावं.

मोदींच्या करिष्यासोबतच या सर्वाचं मुख्य कारण मला विरोधी पक्षाचे आजपर्यंतचे कारनामे वाटतात. विरोधी पक्षाकडे आज आकर्षित व्हावं असं काय शिल्लक आहे, असा प्रश्न कधीतरी या पक्षांनी स्वत:ला विचारून बघावा. भाजपमध्ये भ्रष्टाचार नाहीय का? तर तो आहे. किंबहुना तो काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस इतकाच आहे. हा पक्ष संधीसाधू नाहीय का? तर याचं उत्तर ही काही भाजपच्या पारड्यात जात नाही. तरी सुद्धा दगडापेक्षा वीट मऊ अशा न्यायाने लोक मोदींच्या मागे आहेत. यामध्ये अजून एक कारण आहे, ते म्हणजे लोकांशी थेट संवाद. मोदींनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून राजकारणाला इंटरॅक्टिव बनवलं. लोकांना सरकारमध्ये प्रत्यक्ष भागीदार असल्याचा फिल दिला. मोदींची सर्व भाषणं जर बारकाईने पाहिली तर त्यामध्ये विद्वत्तापूर्ण विचार नसेल कदाचित पण सामान्य माणसाच्या भाषेतील सोशल मिडीयावर व्हायरल असलेल्या पोस्टचा आधार मात्र घेतलेला असतो.

2012-13 पासून 2017 पर्यंत या माणसाने सतत स्वत:ला चर्चेच्या केंद्रभागी ठेवलंय. अखंड इवेन्टस् च्या माध्यमातून लोकांना गुंतवून ठेवलंय. ज्या ज्या वेळी प्रशासकीय पातळीवर अपयश आलं तेव्हा तेव्हा मोदींनी नाविन्यपूर्ण इवेन्टस्, कार्यक्रम लाँच केलेयत. लोकांचा सहभाग असलेले कार्यक्रम तयार करणे, त्यावर अतिरेकी प्रचार करणं आणि लोकांच्या बुद्धीला वश करणं हे काम सातत्य राखून मोदींनी केलं. निश्चलीकरण करत असताना लोकांचा राग वाढतोय हे पाहून मोदींनी लगेच डिजीटल पेमेंट, लेस कॅश पासून देशातील काळ्या पैसेवाल्यांना मी कसं एका झटक्यात कफल्लक केलं असा प्रचार करून स्वत:ची रॉबीनहूडी प्रतिमा तयार करवून घेतली. त्यांच्या निर्णयांना विरोध करणारे सर्वच कसे देशद्रोही असं चित्र तयार केलं. विरोध करणारे कसे स्वत:चा काळा पैसा बुडाला म्हणून बोंब मारतायत असं चित्र निर्माण केलं. त्याउपरही ज्यांची बोंब सुरू होती त्यांच्या अंगावर कधी ट्रोल सोडले तर कधी त्यांच्या तोंडावर विविध रेटींग संस्थांचे आकडे फेकले.

मोदी आणि टीम त्यांची लोकांमधली प्रतिमा चांगली ठेवणे, ती अधिक जबाबदार बनवणे यासाठी काम करत आहे. या देशाला नवा राष्ट्रवाद कसा आवश्यक आहे हे सांगतेय. देशाचा विचार आधी वगैरे वगैरे सांगतेय. दुसरीकडे लोकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतायत. कारखाने बंद होतायत. बेरोजगारी वाढतेय, उत्पादनात घट आलीय, नैसर्गिक चक्र उलटं फिरू लागल्याने त्याचा प्रभाव दिसायला लागलाय, राष्ट्रवाद-राष्ट्रवाद करत असताना सीमेवर पाकिस्तानच्या, काश्मिरात फुटीरतावाद्यांच्या कारवाया वाढल्यायत, सबका साथ च्या नाऱ्याखाली इथल्या अनेक जाती-जमाती-समुदायांमध्ये असलेली भीती दडपून गेलीय.

हे सर्व असतानाही मोदी निवडणूका जिंकतायत. ते जिंकतायत कारण ते न्यू इंडियाची कन्सेप्ट मांडतायत. ते इथल्या तरूणांना सांगतायत की हा न्यू इंडिया वेगळा आहे. याचा इतिहास वेगळा आहे. तो इतिहास तुमच्यापासून लपवण्यात आलाय. हे सर्व सांगत असताना काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष यांच्या इमारती आपोआपच खिळखिळ्या होऊ लागल्यायत. या पक्षांच्या इमारती ज्या पायावर उभ्या आहेत त्या पायावर मोदींनी हल्ला सुरू ठेवलाय.

इतक्या पद्धतशीरपणे मोदी काम करत असताना, त्यांच्या प्रचाराची पद्धत, सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कँपेन, विरोधकांच्या विनोदीकरणाची प्रक्रीया, निवडणूकांमध्ये होत असलेला सत्तेचा वापर या गोष्टी काही लपून राहिलेल्या नाहीत. आम्ही सोशल मिडीया वापरण्यात कमी पडलो हे एकमेव उत्तर 2014 पासून झालेल्या सर्व पराभवांनंतर काँग्रेसवाले आणि इतर पक्ष देत आले आहेत. सर्व प्रश्नपत्रिका समोर असून ती सोडवता येत नसलेले काँग्रेसी हे कर्मदरिद्रीच म्हणावे लागतील. मोदींशी लढण्यासाठी काँग्रेसींनी राहुल गांधींना उभं केलं आहे. राहुल गांधींचा आवाका पाहता राहुल-मोदी लढाईमुळे मोदींची प्रतिमा आपोआपच मोठी झाली आहे. मोदींना तुल्यबळ किंवा त्यांच्याशी- त्यांच्या वेगाशी, कल्पनांशी, वक्तृत्वाशी लढू शकेल असा नेता सध्या काँग्रेसच्या पटलावर नाही. घराणेशाहीच्या प्रभावाखालून काँग्रेस बाहेर पडत नाही हा काँग्रेसचा मोठा दुर्गुण आज काँग्रेसच्या ऱ्हासाचं कारण बनलाय. अंतर्गत यादवीवर पक्ष नेतृत्वाचं नियंत्रण नाही. सरंजामी नेत्यांना पक्ष पट्ट्याने करायला दिलाय की काय अशी स्थिती निर्माण झालीय. सोनिया गांधी यांची तब्येत खराब असूनही त्या अध्यक्ष पदावर आहेत. निवडणूकांमधला पराभव अध्यक्ष या नात्याने खऱ्या अर्थाने सोनिया गांधी यांचा पराभव आहे. मात्र काँग्रेसी त्याचं खापर राहुल गांधीच्या माथ्यावर फोडतायत. पोपट मेला आहे हे सांगायची हिंमत एकाही काँग्रेसीकडे नाही. सोनिया पायउतार झाल्या तर राहुल गांधी नेते बनतील या भीतीपोटी अनेकजण सोनियांच्या राजीनाम्याची मागणी करत नसावेत अशी ही रास्त शंका मला कधी कधी येते.

दुसरीकडे, तिसरा पर्याय सध्या झोपलेला आहे. या लढाईत आपला काही निभाव लागणार नाही, झाला तर खर्चच होईल असं वाटल्याने तिसरी शक्ती सध्या सैरभैर आहे. नितीश कुमार राष्ट्रीय पातळीवर आपलं नेतृत्व चमकवण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. त्यांनी तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न केल्यास विरोधी पक्षांना निदान काही आवाज मिळू शकेल. विरोधी पक्षाचा आवाज बनण्यासाठी लागणारं नैतिक अधिष्ठान काँग्रेसनं गमावलं आहे.

भारतीय जनता पक्षाने उमेदवारांना आयात करून, त्यांनाच घर का भेदी बनवून लंका ढासळवण्याचं काम दिलंय. हा रणनितीचा भाग आहे. काँग्रेस सारखे पक्ष स्वत:ला पक्ष नव्हे तर ‘एक विचार’ असल्याचं सांगतात. असा एक विचार सोडून त्यांचे लोक अगदी टोकाची भिन्न विचारधारा असलेल्या दुसऱ्या पक्षात जातात याचं विश्लेषण ही केलं पाहिजे. याचा अर्थ राजकीय पक्षांच्या वैचारिक बैठका ढिल्या झाल्या आहेत. त्या लवचिक झाल्यात. पक्षांच्या नेत्यांकडेच काही विचार शिल्लक राहिलेला नाही. सत्ता हाच विचार झालाय. हा फार मोठा धोका आहे.

सध्या भारतीय जनता पक्ष, ज्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची चौकट आहे, तो पक्षही आयात उमेदवारांना घेऊन सत्तेपर्यत पोहोचतोय. जे काँग्रेसचं झालं तसं होण्याचा धोका आता भाजपमध्येही वाढला आहे. चौकट हलली की मग सर्वच ढासळायला लागतं. कमकुवत पायावर टोलेजंग इमारत बांधली जाऊ शकत नाही. ती बांधलीच तर लवकर कोसळते. भाजपची इमारतही कोसळणार आहे. फरक एवढाच की ती इमारत आपोआप कोसळेल, शक्ती हरवलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना यातली एकही वीट हलवता येणार नाही. हे वाचून खूष होणाऱ्या काँग्रेसवाल्यांसाठी एकच सांगावसं वाटतंय, भाजपची इमारत जरी कोसळली तरी तुमची इमारतही आता धोकादायक इमारतींच्या यादीतच आहे. त्यामुळे तुम्हीही तुमची झोपडी पाडून नवीन पायावर पुनर्विकास करावा लागेल.

Similar News