खरंच ताई, नका येऊ भगवानगडावर !

Update: 2017-09-28 17:10 GMT

जेव्हा मथुरेला कंस आणि इतर दुष्टांचा उपद्व्याप वाढला तेव्हा कृष्णाने कंस वध केला. कंसाचा सासरा असलेला जरासंध यामुळे संतापून कृष्णावर आणि मथुरेवर चालून आला. तब्बल सतरा वेळा कृष्णाने जरासंधाला हरवले. परंतु अहंकार आणि क्रोधाने मातलेला जरासंध परत परत युद्ध पुकारी. याला कंटाळून, या निरर्थक युद्धातून आपलेही असंख्य यादव बंधू मारले जात आहेत म्हणून शेवटी श्री कृष्णाने मथुरेचा त्यागच केला. आपली वेगळी द्वारका वसविली. तेव्हाही कृष्णाला रणछोडदास म्हणून हिनवण्यात आले.

जरासंधाला माझा राग आहे, मथुरेचा नाही. मी जर मथुरा सोडली तर तो परत मथुरेवर आक्रमण करणार नाही आणि निष्कारण हानी टळेल. असं त्यामागे कृष्णाचे कारण होते. नंतर संधी भेटली तेव्हा भीमाच्या हाताने जरासंधाचा नायनाट देखील केला. आपल्या शत्रूला युद्ध करण्याचे निमित्त आणि युद्धाचे वेळापत्रक ठरवण्याचे स्वातंत्र्य देऊ नका, याचा अर्थ शत्रूला सोडून द्या असाही नाही. त्याला धडा जरूर शिकवा पण आपल्या शर्थीवर.

भगवानगडावर जे सुरु आहे ते याच जरासंघछाप वृत्तींचा धुडगुस आहे. या जरासंघाच्या मदतीने गोपीनाथानंतर वंचित समाजात यादवी माजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या वादामुळे अनेक लोकांची मने दुखावत आहेत. आपल्या हितशत्रूंना हा आपला कच्चा दुवा भासत आहे आणि यातही आपली दुकानदारी चालवण्याची संधी अशांना लाभत आहे. त्यांनी निर्माण केलेल्या विवादाशी लढण्यातच आपण आपली ऊर्जा, आपले तेज खर्ची घालत आहोत आणि खऱ्या कुरुक्षेत्रापासून मात्र भरकटत आहोत असे चित्र निर्माण होऊ नये.

वंचितांचा आवाज आणि वेदना दोन्हींसाठी वाहून घेण्याचा वसा घेतलेल्या तुमच्या सारख्या नेतृत्वाला कुठल्याही प्रतिकाची गरज नाही हे जगाला कळू द्या ताई. भक्ती-शक्तीचा संगम तुम्ही कुठेही सांगा तिथे होईल. अपप्रवृत्ती आपल्या कर्मानेच संपतात. त्यांना संपवण्यात आपल्या कर्मांकडे दुर्लक्ष व्हायला नको. भगवानबाबांना उतारवयात नारायणगड सोडण्यास भाग पाडले गेले. तुमच्या माध्यमातून लोकनेत्याने मरणोपरांत भगवानगड सोडावा किंवा त्या प्रयत्नातून यादवी माजवावी हा अनेक जरासंघांचा प्रयत्न आहे. त्यामुळे ताई नका येऊ भगवानगडावर. भगवानबाबांच्या विचारांचा अनुनय करण्यासाठी स्थानापेक्षा वंचितांची वज्रमुठ पक्की ठेवणे अधिक महत्वाचे आहे. जरासंघाचा नायनाट लोकशाही मार्गाने लोकशक्तीचा भीमच करेल.

Similar News