उन्मादी गोंगाटात न्यायाची मुस्कटदाबी

Update: 2017-08-25 14:02 GMT

ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीरतेने हाताळणाऱ्या न्या. अभय ओक यांच्यावरच थेट पक्षपाती असल्याचा आरोप करून राज्य सरकार राजकीय हेतूने प्रेरित होऊन किती खालच्या स्तरावर जाऊ शकते याचे एक अश्लाघ्य उदाहरण प्रस्थापित झाले आहे. न्या. अभय ओक यांनी मात्र सरकारच्या आरोपानंतरही विचलित होऊन न जाता या प्रकरणातून माघार घेतली नाही आणि आपण या प्रकरणातून न्यायाधीश म्हणून माघार का घेणार नाही याबाबत तपशीलवार आदेश देऊन केवळ न्यायव्यवस्थेतीतलच नाही तर समाजातीलही अनेकांची मने जिंकून घेतली आहेत, सामान्य माणसांच्या मानवी प्रतिष्ठेसह जीवन जगण्याच्या हक्काला टाचणी लावणारा ध्वनीप्रदूषणाचा सामाजिक उपद्रव म्हणजे एकप्रकारे नागरिकांच्या खाजगी जीवन शांततेने जगण्याच्या हक्कांवरच हल्ला आहे याची जाणीव न्या. अभय ओक यांनी विविध उत्सवांच्यावेळी होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात निर्णय देताना प्रकर्षाने करुन दिली.

ध्वनीप्रदूषणाचा भस्मासुर रोखण्यासाठी ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारवर कारवाईचा न्याय आसूड उगारणारे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओकच पक्षपाती व सरकारविरोधी असल्याचा बेताल पक्षपाती व सरकारविरोधी असल्याचा बेताल आरोप राज्याचे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला तेव्हा अचानक स्तब्धता पसरली. आम्हाला या न्यायालयातील प्रकरणे इतर न्यायमूर्तींसमोर वर्ग करायची आहेत. कारण न्या. अभय ओक पक्षपाती व सरकारविरोधी आहेत. मला माझे व्यक्तिगत मत मांडायचे असते तर, माझी भूमिका निराळी राहिली असती. परंतु मला सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार मी सरकारची बाजू मांडतोय असे सांगण्यास राज्याचे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी विसरले नाहीत. आपण या प्रकरणातून स्वतःला न्यायधीश म्हणून हटविणार नाही याची स्पष्टता देणारा तपशीलवार आदेश न वाचताच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी राज्य सरकारच्या मागणीच्या प्राधान्याने विचार करून अत्यंत तडकाफडकी न्या. अभय ओक यांच्या समोरील ध्वनी प्रदूषणाची प्रकरणे अन्य खंडपीठाकडे वर्ग करण्याचा आदेश पारित करून टाकला. ध्वनी प्रदूषण नियंत्रणातील नवीन दुरुस्त्या नुसार सध्या एकही क्षेत्र अस्तित्वात नाही ही राज्य घटनेने घेतलेली सोईची भूमिकाच मान्य करण्यास न्या. अभय ओक यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने बुधवारी नकार दिला होता. आणि न्या. अभय ओक यांच्यासारख्या अत्यंत निःस्पृह, प्रामाणिक व न्याय न्यायधिशालाच 'शांत' करण्याचे षडयंत्र आकाराला आले. मुख्यमंत्री आणि भाजपाचा न्या. अभय ओक यांच्यावरील राडा जुना आहे असे म्हणतात. नरीमन पाँईटच्या भाजपा प्रदेश कार्यालायाचा अतिक्रमण असलेला भाग पाडण्याचे आदेश न्या. ओक यांनीच दिले होते. व्यक्तिगत मूलभूत अधिकार म्हणजे खासगीपणाचा हक्क मान्य करणारा निर्णय नुकताच सुप्रीम कोर्टाने दिलेला असताना न्या. अभय ओक यांनी ध्वनीप्रदूषणाच्या जाचातून सामान्य माणसांची सुटका करण्यासाठी खासगी आयुष्य जगण्याशी संबंधित वापरलेल्या न्यायिक संकल्पनेनेचं त्यांचा जणू घात केला आहे. उत्सवातील प्रचंड वॅटच्या दणदणाटाविरोधात बोलले म्हणून एका उत्तम न्यायबुद्धी असलेल्या, विवेकनिष्ठ न्यायधिशावर अत्यंत खालच्या दर्जाचे आरोप करण्यात आल्याने एक चुकीचा पायंडा पडलेला आहे.याची दखल प्रत्येक सामान्य माणसाने घेतली पाहिजे.

महाधिवक्त्यांनी सरकारतर्फे न्यायाधीशांवर ते पक्षपाती असण्याचा आरोप करणे आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी तडकाफडकी न्या. ओक यांच्यावरील याचिका इतर खंडपीठासमोर वर्ग करण्याचा आदेश करणे या दोन अत्यंत धक्कादाय गोष्टी न्यायालायच्या आवारात घडल्याने न्यायाचा आवाका क्षीण करण्याचा धोकादायक प्रघात न्यायव्यवस्थेतील राजकारणाचा प्रादुर्भाव दाखविणारा आहे.

न्या. अभय ओक यांच्यावरही आरोप करून त्यांच्यावर पक्षपाती आणि सरकारविरोधी असे संबोधताना, मी सरकारच्या सूचनांवरून बोलतोय, माझे व्यक्तिगत मत वेगळे राहिले असते अशी बोटचेपी भूमिका महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सरकारी दबावाखाली मांडली. सरकारी वकील म्हणजे सरकारी बाजू मांडण्यासाठी नियुक्ती झालेली असतात. परंतु त्यांनी कायदेशीर बाजू मांडावी अशी अपेक्षा असते. कायदा व कायद्याची बाजू मांडून सरकारची भूमिका पटविणे व अयोग्य असेल तर नकार देणे यासाठी लागणारे धैर्य दाखविण्याची गरज असते. महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना जर व्यक्तिगतरित्या सरकारची भूमिका मान्य नव्हती तर त्यांनी नकार द्यायला हवा होता की थेट राजीनामा देणे उचित ठरले असते? तसेच मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी जी घाई दाखवित न्या. ओक यांच्याकडील याचिका वर्ग केली त्यामध्ये न्यायिकता आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे?

न्या. अभय ओक यांच्यावर झालेल्या आरोपांविरोधात सामान्यांनी उभे राहावे.न्या. अभय ओक कोणत्या धर्माविरोधात नव्हते, त्यांनी गोंगाटाविरोधात स्पष्ट भूमिका घेतली होती. ध्वनीप्रदूषण ही विकासाच्या रेट्यासोबत वाढणारी शहरकेंद्रीत नवसमस्या आहे व ती केवळ कायद्याने नाही तर सामाजिक वागणूक बदलण्याची गरज आहे, हे न्या. ओक यांनी ओळखले व त्याबाबत त्यांना परिणाम भोगावा लागत. राजकीय प्रभाव आणि ताकद केवळ गणपती उत्सवासाठी वापरण्यात आली नाही तर पुढे येण्याच्या दांडियाचा मार्ग मोकळा करण्यासाठी वापरलेली आहे. ज्या ज्या सणांचा, उत्सवांचा धंदा झाला ते आता थांबविणे दुरापास्त झाल्याचे चित्र विदारक आहे. संस्कृती व धर्माच्या नावाने होणाऱ्या गोंगाटांचे समर्थन करण्यासाठी कायदा मोडीत काढणे व एका निःस्पृह न्यायाधीशाचा बळी देणे अमानुष आहे.

-अॅड. असीम सरोदे

asimsarode@rediffmail.com

Similar News