कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची इत्यंभूत माहिती मोदी देशाला देतील काय?

Update: 2020-04-04 17:11 GMT

मोदींचं‌ समर्थन करणाऱ्यात एकतर हिंदुत्ववादी आणि कातडी बचाव साहित्यिक, कलावंत, व्यवसायिक, उद्योगपती यांची मोठी संख्या आहे. देश म्हणजे नेमकं काय, याच्या जवळपासही हे लोक नाही. बहुतांशी मोदी समर्थक भारतीय संविधानाबद्दल अनादर असुया बाळगणारे आहेत. त्यांना वावडं आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता या संविधानिक मूल्यांचं ! यांच्या देशात अल्पसंख्याकच काय पण स्वधर्मातील मागासांचंही काही स्थान नाही; उलट आहे ती फक्त घृणा ! समाज माध्यमांतील कुजकट प्रतिक्रियांतून ती वेळोवेळी दिसून येत असते.

एका जीवघेण्या आजाराच्या संकटकाळातही एका विशिष्ट समाजावर सगळं खापर फोडण्याची जराही कसर मोदी समर्थकांनी आणि त्यांच्या चाटुकार मिडियाने सोडलेली नाही. अगदी तसेच आरोप इतरांवरही करता येतील अशाही कित्येक घटना देशात घडल्यात. पण धर्मांधांनी धर्मांधाच्या विरोधात बोलण्याला काय किंमत द्यावी ! सगळे धर्मांध संपावेत जगाच्या पाठीवरून ! पण कोणाच्याही खोट्यानाट्या बोभाट्यावर समाजात एकटं पडण्याच्या भीतीने घाईघाईत प्रतिक्रिया देऊन सापळ्यात अडकायला लोक मूर्ख नाहीत, याची विनम्र नोंद मोदी समर्थकांनी घ्यायला हरकत नाही.

नमस्तेट्रम्पच्या निमित्ताने मोदींनी जेव्हा लाखोंचा जमाव अहमदाबादेत जमवला होता, तेव्हा जगभरात ८० हजारांहून अधिक संशयित कोरोना रुग्ण आढळून आलेले होते. अडीच हजार मृत्यू झालेले होते. या पार्श्वभूमीवर नीट विचार केला तर नमस्तेट्रम्प ही मोदींची देशाला संकटात टाकणारी घोडचूकच म्हणायला हवी.

१७ जानेवारीची केंद्र सरकारची कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय सुरू केल्याची प्रेसनोट आहे. तिथपासून केंद्र सरकारने नेमकं काय केलं ते दैनंदिन तक्त्यात तपशीलवार सांगण्याची हिंमत मोदींमध्ये आहे काय?

जानेवारीपासून ते ५ मार्चपर्यंतची मोदींची ट्वीट तपासा. कोरोना नावाचा कोणता आजार जगात आलाय, यांची कल्पनाच असलेली दिसत नाही, मोदींना !

मार्चमध्ये जे काही देशात सुरू होतं, ते त्या त्या ठिकाणची राज्य सरकारं करत होती. त्यात केंद्र सरकार आणि मोदींचं काहीही अस्तित्व नव्हतं. त्यामुळेच त्यांनी जनता कर्फ्यूची टुम काढली आणि महाराष्ट्रात जे सुरळीत लाॅकडाऊन सुरू होतं, ते विस्कटवलं, असं म्हणायला जागा आहे. राज्याचा मुख्यमंत्री टप्प्याटप्प्याने परिस्थिती हाताळत असताना अत्यंत बेजबाबदारपणे २१ दिवसांचं लाॅकडाऊन घोषित केलं.

आता पुन्हा नियोजनशून्यतेचे दिवे लावायला घेतले आणि उर्जा मंत्रालयाला घाम आला. पण त्या घामामुळेच अर्धेअधिक विषाणू मरतील, असंही निर्लज्जपणे मांडणारे तथाकथित शिकलेले, मेरीटधारी इथे खोऱ्याने आहेत. म्हणून मोदीसारख्यांचं फावतं.

ज्या दिवशी द्वेषाधारित राजकारण चालायचं भारतात बंद होईल, तिथून पुढे भाजपासारखे राजकीय पक्ष औषधालाही सापडणार नाहीत.

ज्यांना डोळ्यांवर झापडं ओढून देश खड्ड्यात घालणारं द्वेषमूलक राजकारण कुरवाळत बसायचंय, त्यांनी खुशाल ते करावं, पण अमुकतमुक केल्यावर ह्याव होतं, त्यांव होतं, असल्या पोस्ट रचताना आणि पसरवताना थोडीतरी आपल्याकडे असलेल्या शिक्षणाची लाज जरूर बाळगावी !

Similar News