दाभोळकरांना आठवताना…

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी का नाकारलं होतं पोलीस संरक्षण? दाभोळकरांचा कोणावर विश्वास होता? वाचा लेखिका सहिना हसीना यांचा लेख

Update: 2020-08-20 18:42 GMT

७/८वी मध्ये असताना आमच्या शाळेत उन्हाळ्यात शिबीरात मी गेले होते. त्यावेळी अनिंसचे कार्यकर्त्यांनी तिथे भेट दिली होती. लिंबूतून बाबा लोक रक्त काढतात म्हणजे नेमक काय करतात, मोहरम वेळी लोक जिभ/ओठांत सळी कशी घुसवतात याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले त्यांनंतर लेक्चरही झालं. तेव्हा मला अंधश्रद्धा वगैरे गोष्टी थोड्याफार समजू लागल्या. नंतर ३/४ वर्षांनी तालुक्यातील एक मुलीची जट काढण्यात आली होती. आमचा भाग कर्नाटक सीमेवर असल्याने बऱ्याच जोगतीन वगैरे दिसायच्या.

जोगवा चित्रपटाच्या निमित्ताने या विषयी अजून माहिती पडली. यावर बरेच लेखही वाचले. आता थोडी कुठे या विषयी जागृती होत असताना एक विज्ञानवादी, विवेकनिष्ठ माणसाची हत्या झाली आणि महाराष्ट्र विवेकवादाला मुकला…

दाभोळकर होणं इतकी सोपी गोष्ट नाही. समाजासाठी झोकून देऊन काम करावं लागतं. फक्त कठोर बोलून समाज घडत नाही तर त्यासाठी कार्यही तसंच असावं लागतं. डॉक्टर साहेब अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असताना त्यांना अनेक धमक्या यायच्या. पोलीस संरक्षण मिळत असताना त्यांनी ते नाकारलं, त्यांच्या दृष्टीने, " जर स्वत:च्या देशात, आपल्याच व्यक्तींकडून आपल्याला संरक्षण हवं असेल तर मी कुठेतरी चुकत असेल, मी संविधानाच्या चौकटीत राहून काम करत आहे ना की कोणत्याही एका व्यक्ती/संस्थे विरोधात."

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली तेव्हा मी बसमध्ये होते आणि मला कुणाचा तरी कॉल आला असं अस झालय म्हणून, मम्मी किंवा मामी असतील. त्या म्हणाल्या अगं दंगे वगैरे होतील रूमलाच रहा. मी त्यावर म्हणाले "एक विज्ञानवादी माणसाची हत्या झाली आहे, दंगे कसे होतील. जी काही reaction असेल ती शांततेच होईल. धार्मिक माणसाची झाली असती तर नक्की दंगे झाले असते" आणि हो ते खरेही ठरलं.

एकूण 7 वर्ष झाली या घटनेला आपल्या समाजाला याची तळमळच नाही. आपल्याला विज्ञानवादी, विवेकनिष्ठ व्हायचच नाही. त्या खड्यात मस्त जगायचं आहे. बऱ्याच कट्टर मुस्लिम लोकांना "मुस्लिम सत्यशोधक समाज पटत नाही" पण दाभोळकर पटतात आणि बऱ्याच कट्टर हिंदू लोकांना "हमीद दलवाई" पटतात पण "दाभोळकर" नको असतात. पण हे दोघे हातात हात घालून स्वत:च्याच धर्मातील सुधारणा घडवणारे लोक होते, आणि हेच त्या त्या धर्मातील लोकांना नको आहे. आपले प्राधान्य चुकत आहे, म्हणून आपला समाज घडत नाही.

सहिना हसीना गौसमहंमद मुजावर, सहाय्यक कक्षाधिकारी, मंत्रालय

Tags:    

Similar News