White Guilt आणि भारतीय

Update: 2019-08-16 18:32 GMT

जगभरातील बहुतांश गोऱ्या लोकांमध्ये एक White guilt असतो की आपण आणि आपल्या पूर्वजांनी वंशभेद करत अत्याचार केले, लोकांना त्यांचे मानवी हक्क नाकारले, कत्तली केल्या, साम्राज्यवाद पसरवला इत्यादी. या White guilt मधून बऱ्याच लोकांनी मोठाल्या देणग्या दिल्या, संस्था उभारल्या, स्मारके उभारली, विधायक कार्य केले, पुस्तके व सिनेमाद्वारे स्वतःचा अप्रिय इतिहास पुढच्या पिढ्यांना सांगितला की जेणेकरून त्यांनी त्यांच्या पूर्वजांसारखा अमानवीपणा करू नये!

भारतातल्या सवर्ण लोकांनीही अशाच किंबहुना याहीपेक्षा वाईट प्रकारचा जातीभेद, लिंगभेद हजारो वर्षे पाळला. यात अगणित स्त्रियांचे बलात्कार झाले, सती दिले गेले, कत्तली झाल्या, जमिनी हडप केल्या गेल्या, पाणी नाकारले गेले, अन्नावाचून लोकांना मेलेली जनावरे खायला भाग पाडले गेले, गटारी साफ करायला लावून किंवा डोक्यावर मैला वाहायला लावून पिढ्यानपिढ्या मारल्या गेल्या, एकही मानवी हक्क दिला गेला नाही. पण यानंतर एकाही भारतीय सवर्णाला त्याचे दुःख किंवा शरम आल्याचे पाहण्यात किंवा ऐकिवात नाही. उलटपक्षी इथल्या जातीव्यवस्थेचं, धर्माचं त्यांना अफाट कौतुक आणि माज आहे!

या देशातल्या तमाम नीच गोष्टींना इथे संस्कृतीचं गोंडस लेबल लावून त्या मखरात बसवल्या गेल्या. भारतीय सवर्णांनी कधीही स्वतःच्या धर्माला, जातीला किंवा संस्कृतीला जाहीरपणे घरचा आहेर देऊन त्याचा त्याग केल्याचे ऐकीवात नाही. उलट "SC/ST क्षमस्व" म्हणत स्वतःचा अहमगंड आजही गोंजारणे सुरू आहेच. विशेष तेव्हा वाटत जेव्हा सवर्ण बायकाही यात हिरीरीने भाग घेतात. भल्या स्त्रिये, जर फुले-आंबेडकर-रॉय वगैरे लोक नसते ना तर तू आजही अडाणी राहिली असतीस, सती गेली असतीस, केशवपन करून घरात वापरली गेली असतीस किंवा बनारसला राहिली असतीस.

याही सगळ्यांच्या पुढे जाऊन अतिविशेष कौतुक वाटतं ते खालच्या जातीत जन्माला येऊन जातीय अभिमान बाळगणाऱ्या लोकांचं. स्वतःला कसले कसले वंशी, मूलनिवासी, क्षत्रिय वगैरे लेबल लावून स्वतःच्या जातीचा माज बाळगणारे मुर्ख लोकही कमी नाहीत. ज्या व्यवस्थेने तुम्हाला कुत्र्याच्या लायकीचे समजले नाही त्या व्यवस्थेने दिलेल्या ओळखीचा तुम्हाला गर्व कसा काय असू शकतो? एवढीही अक्कल तुम्हाला कशी असू नये? तुमच्या तथाकथित जातीतला एक माणूस महापुरुष म्हणून नावाजायचा आणि तुम्ही त्याच्या मागे या जातीत आपण राहणे किती अभिमानाचे आहे यावर स्वतःच्या शेंगदाण्याएवढ्या मेंदूला पटवायचे आणि पुढच्या पिढ्यानाही शिकवायचे!

जातीव्यवस्था, पुरुषसत्ताक व्यवस्था संपवायला फार लांब जायची गरज नाही. आधी स्वतःच्या जातीला, धर्माला खच्चून शिव्या द्यायच्या, त्याची लाज बाळगायची आणि ही लाजिरवाणी ओळख मेंदूतून, वागण्यातून आणि कागदपत्रांतूनही काढून फेकायची. आणि ज्या टीकोजीरावांना त्यांचं कौतुक असेल त्यांना हिंग लावून विचारायचे नाही. स्वतःच्या संपत्तीतला निम्मा वाटा न मागता बायकोच्या नावाने करायचा. स्वतःच्या वडिलोपार्जित संपत्तीत बहिणीला समान वाटा न मागता द्यायचा. आधी माणूस बनायला शिकायचे आणि नंतर माणूस असण्याचा अभिमान बाळगायचा!

जात, धर्म, लिंग, देश, भाषा यांच्यापलिकडे जाऊन माणसातला माणूस बघायला शिकलं तर जग खरंच सुंदर आहे. नाहीतर आहातच तुम्ही IIT, इंजिनिअर होऊन पुराणात विमाने शोधणारे आणि डॉक्टर होऊन रक्तात धर्म-जात शोधणारे अक्कलशुन्य भिकारडे!!

- डॉ. विनय काटे

Similar News