समाजवाद म्हणजे काय ?

Update: 2018-12-22 10:53 GMT

समाजवाद म्हणजे काय याच्या चर्चा करताना खालील माहिती घेऊनच चर्चा करणे आवश्यक :

ज्या देशात कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर होते (सोव्हियेत रशिया), सत्तेवर आहेत (चीन, व्हियेतनाम), जय देशात डावी, जनकेंद्री सरकारे होती/आहेत (ग्रीस, लॅटिन अमेरिका) तेथे नक्की काय झाले/ चालले आहे ? जे झाले ते का झाले ? जे चालले आहे ते तसे का चालले आहे ?

या सुट्या घटना वाटल्या तरी त्यात एक पॅटर्न आहे. सत्तेवर गेली कि माणसे भ्रष्ट होतात या लोकप्रिय प्रमेयात त्याची उत्तरे नाहीत तर त्याची उत्तरे जागतिक भांडवलशाहीच्या गुंतागुंतीच्या संरचनेत शोधावी लागतील

कारण महाकाय ताकदीच्या, सर्वंकष जागतिक भांडवलशाहीत जनकेंद्री सरकारे चालवणे, डाव्या परिप्रेक्ष्यातून, सर्वात आव्हानात्मक काम आहे

आपापल्या “एको चेंबर्स”मध्ये बोलत राहायचे असेल तर गोष्ट वेगळी

_________________________

जॅक मा, चीनी कम्युनिस्ट पक्ष या कालच्या माझ्या या पोस्टला, बऱ्याच जणांनी प्रतिसाद दिला. त्या निमित्त काही निरीक्षणे /प्रश्न

चीन कम्युनिस्ट पक्षाने औपचारिकपणे काही दशकापूर्वी असे जाहीर केले आहे कि त्यांचा समाजवाद “चिनी गुणवैशिष्ठ्यांचा” आहे Socialism with Chinese Characteristics. याचा अर्थ असा कि इतरांनी त्यांची स्वतःची समाजवादाची व्याख्या करावी. आम्ही समाजवादी आहोत कि नाही याचे सर्टिफिकेट आम्हाला कोणाकडूनही नको आहे

आपण टीका करताना नीती/ अनीती, शोषणाधारित / शोषणरहित, भ्रष्टाचार/ स्वच्छ कारभार या “बायनरी”च्या बाहेर येतच नाही आहोत. जागतिक भांडवलशाही टोकाची गुंतागुंतीची संरचना आहे. ती या अशा द्वि-अक्षी मांडणीच्या चिमटीत येणारी नाही.

चीनचे बिघडण्याचे बिल डेंगच्या नावाने फाडणे चूक आहे. अख्खी कम्युनिस्ट पार्टी त्यांच्यामागे कशी उभी राहते. त्याच्या वैचारिक मांडणीत काही तथ्य असल्याशिवाय ?

मग व्हिएतनामचे काय ? अमेरिकेविरुद्धच्या लढाईत लाखोंचे रक्त सांडलेले कम्युनिस्ट राष्ट्र अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जागतिक भांडवलशाहीशी जोडून घेते याचे अर्थ काय लावायचे ?

फिडेल नंतर क्युबात काय चालू आहे ?

ग्रीसमसधल्या सिरिझाचे काय ?

लॅटिन अमेरिकेतील डाव्या पक्षांच्या हातात सत्ता असणाऱ्या देशात सध्या काय परिस्थिती आहे ?

मुळात सोव्हियेत आर्थिक मॉडेल का कोसळले ?

चिनी कम्युनिस्ट पक्षाचे ९ कोटी सभासद आहेत. जॅक मा एक झाला. अनेक श्रीमंत व्यक्ती त्या पक्षाच्या सभासद आहेत. याचे अर्थ काय लावायचे ? सारी पार्टी भ्रष्ट झाली ? पार्टीत काही तरी वैचारिक चर्चा झालीच असेल. ती सर्व काय धूळफेक म्हणायची ?

चळवळीत / आंदोलनात राहिल्यानंतर, सत्ता दृष्टीक्षेपात देखील नसतांना डाव्या परिभाषेत बोलणाऱ्याला अमर्याद स्वातंत्र्य असते. स्वतःला खरा क्रांतिकारी आणि शंभर टक्के नैतिक सिद्ध करण्यासाठी.

पूर्वी डाव्या चळवळीतील तरुण पक्ष/संघटनेशी संबंधित प्राध्यापक / विचारवंत / नेते / सिनियर कार्यकर्ते यांच्यावर अवलंबून असत

आता माहितीचे “लोकशाहीकरण” झाले आहे. आजच्या तरुणांना अनेक गोष्टी माहित असतात.

तरुणांना, विशषेतः वंचित वर्ग-जातीतून आलेल्या तरुणांना, भांडवलशाहीबद्दल चीड आहे. ती बदलावी अशी उर्मी आहे. त्यांच्या मनात डाव्या विचारांबद्दल तारुण्यसुलभ आत्मीयता असते

पण त्याचवेळी त्यांना अनेक प्रश्न असतात. त्यांना त्या प्रशांची उत्तरे हवी असतात. फक्त भावनिकतेला आवाहन करून तरुण चळवळीच्या जवळ येऊ शकतात, सहानुभूतीदार होऊ शकतात पण टिकू शकत नाहीत

डाव्या चळवळीकडे तरुण वर्ग यावा असे वाटत असेल तर “ऱ्हिटेरिक” कमी करून जमिनी सत्ये मांडली पाहिजेत. समजून घेतली पाहिजेत. त्यात “प्रत्यक्ष समाजवादी संकल्पना अमलात आणू पाहणाऱ्या देशात” काय झाले / चालले आहे, त्याचे विश्लेषण सर्वात महत्वाचे असेल

संजीव चांदोरकर

Similar News