सेक्यूलॅरिझम : अपेक्षा आणि वास्तव

Update: 2020-04-13 23:09 GMT

भारतीय स्वातंत्र्याच्या उत्तरार्धातील आंदोलनात स्वतंत्र भारत कसा असेल याचे स्वप्न आंदोलनातील समाजधूरीनांनी पाहीले होते. या स्वप्नांपैकी भारत हा सेक्यूलॅरिझमच्या तत्वांशी बांधील राहील असे एक तत्व होते. या महत्वाकांक्षी स्वप्नाला सर्वात मोठा धक्का बसला तो भारताला स्वातंञ्य मिळत असतांना जमातवादी शक्तीचा महत्वाकांक्षी उन्माद आणि देशाची फाळणी होवून झालेली पाकिस्तानची निर्मिती. या अपेक्षित नसलेल्या घटनेनंतरही भारताने सेक्यूलॅरिझमशी बांधील राहून सर्व भारतीयांना समान नागरिकत्व देवून धर्मस्वातंञ्य हा नागरीकांचा मूलभूत हक्क देण्यात आला. भारतीय संविधान निर्माण होतांना भिन्न धर्मिय नागरिकांना धर्मस्वातंत्र्य बहाल करीत असतांनाच, सेक्यूलॅरिझमच्या आत्म्यास बाधा येणार नाही याची काळजीही भारतीय संविधान निर्मात्यांनी घेतली आहे.

भारतीय संविधानाच्या भाग ३ मधील, कलम १४, १५ , १६ , २५, २९ मधून व संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांसंदर्भातील भाग ४ मध्ये सेक्यूलॅरिझमचा आत्मा कायम ठेवण्यात आले आहेत. वरवर पाहता संविधानातील ही कलमे सेक्यूलॅरिझमच्या तत्वांशी विसंगत वाटतील परंतू व्यापक अभ्यास केल्यास ते सूसंगतच आहेत असेच आपल्या लक्षात येईल.

भारतीय संविधानाच्या प्रारंभीच्या प्रस्ताविकेत धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या संकल्पना नव्हत्या. त्या १९७६ मध्ये संविधानाच्या ४२ व्या दूरूस्तीतून प्रास्ताविकेत समाविष्ठ करण्यात आल्या, ही वस्तुस्थिती सर्व परिचीत आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरूवातीलाच या संकल्पना संविधानाच्या प्रारंभीच्या प्रस्ताविकेत का समाविष्ठ केल्या नाहीत ?

भारतीय समाजाचा इतिहास हा सर्वधर्मसमभावाचा आहेच पण सेक्यूलॅरिझम ही आधुनिक संकल्पना आहे. भारतीय भाषांमध्ये सेक्यूलॅरिझमला नेमका व चपखळ असा पर्यायी शब्द नाहीत पण या संकल्पनेच्या जवळपास जाणाऱ्या संकल्पना आहेत. जसे सेक्यूलॅरिझम म्हणजे वरती म्हटल्याप्रमाणे सर्वधर्मसमभाव हा एक शब्द आहे. माञ सेक्यूलॅरिझम हा आधिक व्यापक आहे. तसेच धर्मनिरपेक्षता, धर्मतथष्ठस्ता धर्मातीतता, धर्मविहीनता, निधर्मी, हे शब्दसुध्दा सेक्यूलॅरिझमला अपेक्षित अर्थ व्यक्त करीत नाहीत. फारतर ईहवाद किंवा जडवाद हे शब्द सेक्यूलॅरिझमच्या जवळपास जाणारे आहेत.

अमेरीकन विचारवंत थॉमस जेफरसन यांनी सेक्यूलॅरिझम म्हणजे " Wall of separation between religion and the state " म्हणजेच धर्माने शासनात व शासनाने धर्मात हस्तक्षेप करायचा नाही अशी जी व्याख्या दिली आहे ती व्याख्या भारतीय संदर्भात डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हती. भारतीय समाज धर्माधिष्ठीत आहे आणि भारतीय राज्यव्यवस्था सेक्यूलर आहे. भारतीय संविधानाला भारतीय समाज हा विषमता, अन्याय, शोषणमुक्त करायचा आहे. मात्र यांचे उगमस्थान हे धर्मसंस्था आहे. जर शासनाने धर्मात हस्तक्षेप केला नाही तर अन्याय, विषमता, शोषण दूर करता येणार नाही. सेक्यूलॅरिझमची निश्चित परिभाषा नसल्यामुळे व भारतीय समाजावरील धर्माचा प्रभाव आधोरेखीत असल्यामुळे सुरूवातीस प्रास्ताविकेत या संकल्पना वापरल्या नाहीत.

सेक्यूलॅरिझमला धर्मनिरपेक्षता हा पर्यायी किंवा कार्यात्मक शब्द वापरून पुढील मांडणी करूया.

जॉर्ज हॉलयाक (१८१७ ते १९०६) यांच्या सेंट्रल सेक्यूलर सोसायटीने सेक्यूलॅरिझममध्ये पुढील पाच गोष्टींचा समावेश केला आहे.

१. विज्ञान हा मानवाचा खरा मार्गदर्शक असेल

२. नैतिकतेचे मूळ हे धर्म नसून सेक्यूलँरिझम असेल

३. बुध्दिप्रामाण्यतेसच प्राधान्य असेल

४. विचार व अभिव्यक्ति स्वातंञ्य

५. मानवी जीवनाची अनिश्चितता विचारात घेवून आपले प्रयत्न जीवनाधिष्ठतेकडे असावे.

भारतीय समाज जीवन व संस्कृतीत आध्यात्मिकतेस महत्व आहे. धर्मनिरपेक्षता ही फक्त ऐहिक जीवनाबद्दल भाष्य करते. पारलौकिक बाबी या वैयक्तीक आहेत असे मानते. महात्मा गांधी व मौलाना अबूल कलाम आझाद हे धार्मिक असूनही धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कार करणारे होते. सर्व धर्मंचा मूळ गाभा हा मानवतावाद आहे. मानवतावाद हा विषमता, अन्याय, शोषणाच्या विरोधात असतो त्यामुळे धर्मनिरपेक्षता हा धर्माच्या विरोधात नाही ही गांधी-आझादांची भूमिका होती. नेहरू-आंबेडकर यांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. भारतीय संविधानात सेक्यूलॅरिझम किंंवा धर्मनिरपेक्षता यांची व्याख्या कोठेही दिलेली नाही मात्र, हे भिन्न मतप्रवाह विचारात घेवून भारतीय संविधान या संदर्भात स्पष्ट करते की,

१. भारत हा कोणत्याही एका विशिष्ठ धर्माला राष्ट्रीय धर्म मानत नाही

२. भारतात कोणत्याही एका धर्माला जास्त प्राधान्य देवून वागवले जाणार नाही

३. धर्मस्वातंत्र्य, श्रद्धा, विश्वास व पूजाअर्चा करण्याचे स्वातंत्र्य हे व्यक्तीला दिले आहेत कोणत्याही धर्माला नाही.

४. शासन कोणत्याही एका धर्माचा प्रचार करणार नाही किंवा प्रोत्सहान देणार नाही.

प्रत्येक राजकिय पक्षाची ही संविधानिक जबाबदारी व बांधीलकी असेल की ते भारताची धर्मनिरपेक्ष ओळख टिकवतील आणि कायम ठेवतील. आजच्या भारतात धर्मनिरपेक्षतेची स्थिती काय आहे हे आपण पहात आहोतच. यावर उदाहरणे देवून जास्त भाष्य करण्याची गरज वाटत नाही. आपण आपल्या आजूबाजूला काय काय घडत आहे हे प्रत्यक्ष व प्रसारमाध्यमातून अनुभवत आहोत. धर्मनिरपेक्ष ही भारताची ओळख टिकवण्यात, धर्मनिरपेक्ष समाज घडवण्यात राजकिय पक्ष कोणती भूमिका व जबाबदारी पार पाडतात हे आपणांस माहित असल्यामुळे राजकिय पक्ष व नेत्यांकडून आपेक्षा न करता सूजाण नागरिकांनीच या संदर्भात लोकशिक्षण केले पाहीजे.

 

डॉ.शमशुद्दिन तांबोळी

अध्यक्ष,

मुस्लीम सत्यशोधक मंडळ

९८२२६७९३९१

tambolimm@rediffmail.com

Similar News