Women Empowerment : आईकडे देव म्हणून नाही तर माणूस म्हणून बघायला हवं! तिचं मूल ही सगळ्यांची जबाबदारी आहे.
एखाद्या आईला तिचं स्वातंत्र्य आणि मातृत्व खुलेपणाने जगता यावं असं वातावरण आजूबाजूला हवं. चूल, मूल आणि सोबत कमावण्याची जबाबदारी देऊन तिला महानतेचा लेबल फक्त स्वार्थासाठी... या पार्श्वभूमीवर महिला सशक्तीकरणविषयी लक्ष्मी यादव यांचा लेख
Breastfeeding हे दूध पिणारं बाळ एक दीड वर्षांचं असेल. साताऱ्यातील एका छोट्याशा हॉटेलच्या वर एक छोटीशी खोली आहे, तिथं हे बाळ दिवसभर एकटंच बसलेलं असतं. आई हॉटेलात काम करते. कर्नाटकहून आलेली आहे ती. आई अधूनमधून वर जाते आणि तिला दूध पाजून खाली येते.
तर हे बाळ दिवसभर काय करतं? ते मोबाईल बघतं. आई तिला मोबाईल लावून देते, मग ही छोटीशी पोर त्यावर शिताफीने बोटं फिरवत व्हिडिओ बघत बसते. तिच्या डोळ्यांचं काय होणार? मेंदू मनावर काय परिणाम होणार याचा विचार हॉटेल मालकाला नाही आणि आईच्या डोक्यात तिच्या मर्यादांमुळे तो विचार येणारही नाही. आला तरी तिच्याकडे दुसरा पर्याय नाही. मुलीच्या शेजारी चॉकलेट टाकलेले असतात. अधूनमधून त्यातून एखादं चॉकलेट खाते ती. हिच्या दातांचं काय होणार? इतकं गोड खाण्याच्या शरीर आणि वर्तणुकीवरही परिणाम होणार. वर गिऱ्हाईकं जाऊन बसतात, त्यामुळं तिच्या सुरक्षेचा प्रश्न आहेच. आजकाल कुणीही काहीही करतं स्त्रिया आणि लहान मुलांसोबत.
या आईच्या घरी त्या बाळाला सांभाळणारं कुणीच नाही. त्या हॉटेलात पाळणाघर असण्याची शक्यता नाहीच. आणि आसपास असेल तरी त्याचे पैसे जी स्त्री देऊ शकणार नाही. मी तिथं असतानाच हे झोपेतून उठून जागेवरच उभं राहून रडायला लागलं. मी हॉटेल मालकाला सांगितल्यावर त्यांनी सहजपणे थांबेल ती तिथं असं सांगितलं. खाली उतरण्यासाठी छोटा लोखंडी दरवाजा होता. तो उघडाच होता. तिथून ती पडेल की असं म्हणाल्यावर फार आत्मविश्वासाने ते हॉटेल मालक "नाही, ती जागेवरून हलणार नाही," म्हणाले. एक दीड वर्षांचं ते बाळ रडू आल्यावर देखील एका जागी उभं होतं. कसलं क्रूर ट्रेनिंग दिलं असेल तिला या जगाने?
हॉटेल मालकांनी निदान तिला काम तरी दिलं या स्व समाधानावर मी त्यांना काहीच न बोलता बाहेर पडले. मागे एकदा पंढरपूरमध्ये फुटपाथवर एक लहान बाळाच्या पायाला दोरी बाधून आई तिथल्या इमारतीत फरशी पुसण्यासाठी गेलेली होती. हे बाळही रडत होतं. शेजारी असलेल्या मावशीला विचारल्यावर तिनं सांगितलं की त्या आईच्या घरी बाळाला सांभाळण्यासाठी कुणीही नाही. मी रागावत असतानाच त्या बाळाची आई आली. प्रचंड अपराधभाव घेऊन. काय बोलणार तिला मी? अशा असंघटित कामगार, मजूर स्त्रियांना बाळंतपणाची सुट्टी, मासिक पाळीत आराम, बाळाला पाजण्यासाठी ब्रेक या बाबी तर अत्यंत दूरच्या गोष्टी आहेत.
ग्रामीण भागातच काय शहरात देखील ज्यांच्या घरी लहान बाळ सांभाळण्यासाठी कुणीही नसतं अशा ठिकाणी पाळणाघरे नसतात. आणि मूल सांभाळण्याची सगळी जबाबदारी आईवरच असते त्यामुळं आया आपल्या मुलांना सोबतच कामावर नेतात. मुलं एक तर बसून राहतात किंवा मग मोबाइल पाहतात. मुलं कोमेजतात. देशाचे नागरिक मन आणि शरीराने सुदृढ राहत नाहीत. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये अनेक लहान मुलांना घरातच सोडून आई वडील कामावर जातात. जाताना हातावर दहा रुपये ठेवतात. ही मुलं दुकानातून खाण्याचे चिप्ससारखे दर्जाहीन पदार्थ रोज खातात. ती अनेकदा लैंगिक किंवा इतर प्रकारच्या हिंसेची शिकार होतात. माणसांच्या त्रासिक पिढ्या तयार होत राहतात.
आईचा, बाईचा सन्मान फक्त योजना दिल्याने वाढत नाही(चार चार मुलं जन्माला घाला असं म्हणणाऱ्यांनी स्वत:चं डोकं ताळ्यावर आहे का हेही तपासावं एकदा.).तिच्यासाठी योग्य आणि पुरेशा सोयी, कामाच्या संधीची गरज आहे. तिला तिचं स्वातंत्र्य, मातृत्व खुलेपणाने जगता यावं असं वातावरण आजूबाजूला हवं. नुसतं स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हणण्यात काहीही अर्थ नाही. चूल, मूल आणि सोबत कमावण्याची जबाबदारी देऊन तिला महान म्हणण्याचं षडयंत्र गेली अनेक वर्षे जगभर सुरू आहे.
आईकडे देव म्हणून नाही तर माणूस म्हणून बघायला हवं! तिचं मूल ही सगळ्यांची जबाबदारी आहे.
महिला दिन.. चला महिला सबलीकरणावर बोलूया आणि सांगूया किती महिला सशक्तीकरण झाले आहे ते!
- लक्ष्मी यादव