ठाकरे सरकारचं प्रशासन कुचकामी ? माजी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

Update: 2020-05-09 06:38 GMT

उद्धव ठाकरे संयमी आणि संयत मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय असले तरी त्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचं वारंवार समोर येत आहे. कोविड-१९ च्या संकटामुळे लॉकडाऊन असलेला महाराष्ट्र काही ठराविक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात आहे की काय अशी स्थिती निर्माण झाल्याची मंत्रालयात चर्चा सुरू आहे. अशावेळी राज्यातील रूग्णवाढीची वाढती संख्या बघून करण्यात आलेल्या बदल्यांमुळे ही ठाकरे यांचे ‘प्रशासन’ पुन्हा चर्चेत आलं आहे.

उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रशासनात काही आमुलाग्र बदल झाला नाही. काही ठराविक अधिकाऱ्यांच्या इकडून तिकडून पण मोक्याच्या जागी बदल्या झाल्या. मुंबईतील वाढती रूग्ण संख्या बघून मुंबई महापालिकेतील आयुक्त प्रविण परदेशी आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या काल करण्यात आल्या. मात्र अपयशाच्या कारणावरून झालेल्या बदल्यानंतर ही फारसा काही बदल घडेल असं अनेक सनदी अधिकाऱ्यांना वाटतंय.

अकाली बदल्या:

मुख्य सचिवांच्या Civil Services बोर्ड ने आता तरी अधिकाऱ्याच्या "सोयी " ऐवजी जनतेचे भले कशात आहे याचा विचार करून पदासाठी "लायकी" असलेल्या अधिकाऱ्यांचीच शिफारस मुख्यमंत्र्याना करावी म्हणजे " अपयशामुळे" बदल्या करण्याचे प्रसंग उद्भवणार नाहीत असं मत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केलं आहे.

तर परदेशी यांना अकार्यक्षमतेच्या कारणावरून तसंच कोरोना वाढी मुळे काढलं असेल तर मग अजॉय मेहता यांना कसं काय जीवनदान मिळालं ? कोरोनाच्याच कारणांमुळे त्यांना विशेष मुदतवाढ मिळालेली आहे. जर परदेशी अकार्यक्षम आहेत तर त्यांना नगरविकास विभागासारख्या महत्वाच्या ठिकाणी का पाठवण्यात आलं ? हे सर्व अनाकलनीय आहे.

दुसरं म्हणजे अकार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या तसंच पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात टिकेचे धनी बनलेल्या आशिष सिंह यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून जबाबदारी आहे. एकूणच उध्दव ठाकरे यांचे प्रशासन वाइटरित्या अपयशी ठरण्याची शक्यता आहे असं मत एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याने व्यक्त केलं आहे.

Similar News