गांधी सांगा कुणाचे?

Update: 2019-10-02 03:08 GMT

गांधीजींची आज १५० वी जयंती साजरी होते आहे. एकीकडे या महात्म्याला जनमाणसातून हटवण्याचा हरेकप्रकारे प्रयत्न केला जात असताना कुठल्या न कुठल्या वळणावर तो नक्कीच भेटतो. कधी पाकिस्तानची निर्मिती समजून घेताना, कधी अहिंसेची चिकित्सा करताना तर कधी डॉ. आंबेडकरांसोबत झालेल्या वैचारिक द्वंद्वाचा इतिहास वाचताना. गेली वीस-एक वर्ष गांधी नावाचं प्रकरण प्रत्येकवेळी नव्यानं उमगतंय. इतका मोठा विलक्षण माणूस आपल्या चुका विनम्रतेने स्वीकारतो, त्याची लिखित नोंद ठेवतो आणि जगजाहीरही करतो. केवढं मोठं मन !

आपल्या आपल्या विचारविश्वात, भावविश्वात गुंतलेलो आम्ही त्यांना समजून घेण्यात कमी पडलोय हे नक्की. काल-परवा हिंदू महासभेच्या एका महिलेने गांधीजींच्या पुतळ्यावर गोळी झाडून नथुराम गोडसेचा जयजयकार केला. ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी मी अस्वस्थ होतो. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे मारेकरी आपल्या डोळ्यादेखत होते. विद्यमान सरकारनेच त्यांना पाठबळ दिलं होतं. आपण निषेधापलीकडे काहीही करू शकलो नाही. दिडशे वर्षानंतरही एका जख्ख म्हाताऱ्याची भीती वाटावी असं काय होतं त्यात?

गांधीजींच्या बाबतीत असं म्हणता येईल, विश्वव्यापी मानवतेने आपला स्वतःचा सारांश करायचे ठरवले आणि गांधींच्या रूपात तो सारांश व्यक्त झाला. या मानवतेच्या विश्वव्यापी सारांशाने भल्याभल्यांना गारद केलं. सामान्यांना बळ दिलं. सत्याच्या प्रयोगातून चांगलं काय, वाईट काय हे दाखवून दिलं, पटवून दिलं. विनोबांनी, नेल्सन मंडेलांनी, बाबा आमटेंनी यातूनच प्रेरणा घेतली. ज्यांना ज्यांना गांधीजी समजले, गांधीजी त्यांचे झाले. ज्यांना गांधीजी समजले नाही, ज्यांनी त्यांचा कायम दुस्वास केला त्यांनाही काळाच्या पटलावर गांधीजींना नाकारता आलं नाही. त्यामुळेच गांधीजी आज स्वच्छ भारत मिशनच्या जाहिरातीत अडकून पडलेत.

गांधीजींबरोबर स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतलेले आणि कालांतराने मुस्लिम लीगमध्ये सामिल होऊन पाकिस्तानात गेलेले मियाँ एप्तीखरोद्दीन यांचा एक किस्सा आहे. गांधीजीचा खून झाल्यानंतर ते भारताकडे येण्यासाठी निघाले. पेशावरच्या विमानतळावर सुशीला नायर त्यांना भेटल्या. मियाँ एप्तीखरोद्दीन सुशीलांच्या गळ्यात पडून ढसढसा रडले. 'हमने अपना सब कुछ खो दिया, हम खत्म हो गए' असं म्हणत गांधीजींची आठवण काढली. पाकिस्तानात निघून गेलेल्या गांधीजींच्या सहकाऱ्याला आपलं सर्वस्व संपल्यासारखं वाटतं आणि ते शोक व्यक्त करतात. देशाच्या सीमा झुगारून त्यांनी अनेकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होत, गांधीजी त्या सर्वांचे होते.

फाळणीनंतर बंगालमध्ये जातीय दंगली घडत होत्या. या दंगली थांबण्याचे नाव घेत नव्हत्या त्या वेळी स्वतः गांधीजी रस्त्यावर उतरून हिंदू-मुसलमानांना समजून सांगत होते, शांत करत होते. त्यांचं हे रूप पाहून माऊंट बॅटनने त्यांचं वर्णन 'वन मॅन आर्मी' असं केलं. दंगलग्रस्त भागात गांधीजी जायचे, रामधून म्हणायचे. सोबत भगवे झेंडे, हळद-कुंकू ठेवत. उध्वस्त झालेल्या मंदिरांवर भगवा झेंडा लावत, बलात्कारित स्रियांना हळदी-कुंकू देऊन धीर देत. यामुळे गांधीजी हिंदुत्ववादी आहेत अशी ओरड झाली. परंतु गांधीजी म्हणत, कोणीच कुणाचा धर्म बळजबरीने उध्वस्त करता कामा नये. दिल्लीला परत आल्यावर हिंदूंनी उध्वस्त केलेला मेहेरोलीचा दर्गा त्यांनी डागडुजी करून दिला. यावेळी मुस्लिमधार्जिणे म्हणून त्यांच्यावर टीका झाली. हिंदू आणि मुस्लिम अशा दोघांच्याही रोषाला त्यांना समोर जावं लागलं, पण ते स्थितप्रज्ञ राहिले. अविचल राहिले.

सत्याच्या प्रयोगाचा हा भाग होता. त्यांची हेटाळणी केली गेली. नको नको ती दूषणे लावली गेली. परंतु त्यांनी केलेल्या उपोषणाचा परिणाम हळूहळू जाणवू लागला. हिंदू-मुस्लिमांनी घरात लपवलेली हत्यारे गांधींसमोर आणून टाकली. गांधींच्या या अभूतपूर्व यशाची दखल संयुक्त राष्ट्र संघटनेत घेतली गेली. पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी जागतिक व्यासपीठावर गांधीजींचं कौतुक केलं. ज्यांना ज्यांना सत्याची जाणीव झाली, गांधीजी त्या सर्वांचे झाले.

गांधीजींच्या संघर्षात आणि इतर महापुरुषांच्या संघर्षात मूलतः फरक आहे. गांधीजी म्हणत, माझा संघर्ष किंवा लढाई कुणा व्यक्तीच्या विरोधात अजिबात नाही. त्यामुळे मी कुणालाच हरवत नाही. कुणावर विजयही मिळवत नाही.माझा संघर्ष हा माझ्याच विरोधात असतो. प्रत्येकाच्या चुका पदरात घेताना आपल्याही चुकांची कबुली देणारे गांधीजी म्हणून तर प्रत्येकासाठी वंदनीय ठरतात. मोहम्मद अली जिनांसोबत पराकोटीचे मतभेद असतानाही जिनांनी गांधींच्या हत्येनंतर हळहळ व्यक्त केली होती.

डॉ. आंबेडकर आणि गांधीजी यांचा वैचारिक संघर्ष तर भारतीय समाजमन घडवून आणण्यासाठीच एक महत्वाच प्रकरण आहे. सर्वोदयाची मांडणी करणारे गांधी आणि सर्वहारा वर्गाची बाजू मांडणारे आंबेडकर, या दोघांनीही एकमेकांचा आदरच केला. कधीही आपली मर्यादा ढळू दिली नाही. पुणे करार ज्या दिवशी झाला त्या दिवशी गांधीजींचं प्राणांतिक उपोषण सुटलं आणि बाबासाहेब आंबेडकर नावाचा महासुर्य राष्ट्रीय पातळीवर झळकला. या दिवशी आंबेडकर अनुयायांनी मोठमोठ्या मिरवणुका काढल्या. या मिरवणुकीत एकीकडे गांधींचा फोटो आणि एकीकडे आंबेडकरांचा फोटो रथामध्ये आरूढ होता. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यात अग्रेसर होते. तत्कालीन आंबडेकरी जनता राजकीयदृष्टया प्रगल्भ म्हणायला हवी. मतभेद असले तरी मनभेद होऊ न देणाऱ्या डॉ. आंबडेकर आणि त्यांच्या अनुयायांचे गांधीजी होते.

देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि गांधीजींची गरज संपली. ज्यानं उठाव त्याने गांधीजींवर तोंडसुख घ्यावं. फाळणीसाठी जबाबदार धरावं.जे आजही चालू आहे. गांधीजींना हिमालयात जाण्याचा सल्ला दिला गेला. वर्तमानपत्रात काहीबाही छापून यायला लागलं. स्वातंत्र्य आंदोलनात हिरो असलेले गांधीजी आता व्हिलन वाटायला लागले. आपला राग काढण्याचे हुकुमी स्थान म्हणजे गांधी असं लोकांना वाटायला लागलं. यात हिंदू होते, मुस्लिम होते, दलित होते, शीख होते. गांधीजींना शांतपणे आपल्या आलोचकांना उत्तर दिलं, मला हिमालयात जाण्याची गरज नाही. माझा हिमालय लोकांमध्येच आहे.

आज ज्याप्रमाणे सरकारला प्रश्न करणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जाते आणि पाकिस्तानात निघून जाण्याचा सल्ला दिला जातो तसाच सल्ला गांधीजींना देखील दिला गेला. तुमच्या अहिंसेची खरी गरज भारतात नाही तर पाकिस्तानात आहे असं सांगितलं गेलं. परंतु एकदा गांधीजींनी जाहीरच केलं कि, मी पाकिस्तानात जाणार आहे. एकदा का निश्चय केला कि गांधीजी मागचा-पुढचा विचार करत नसत. गांधीजींनी पाकिस्तानात जायचं ठरवलं. त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून दिनशा आणि जहांगीर यांना पाकिस्तानात पाठवलं. बॅ.जिन्नांशी प्राथमिक चर्चा झाल्यावर पाकिस्तानकडून जमशेद मेहतांना भारतात पाठवलं गेलं. पाकिस्तानने गांधीजींना सशर्त परवानगी दिली. भारत सरकारने आणि येथील नागरिकांना पाकिस्तानचे वास्तव्य खुल्या मनाने मान्य करावं, तसेच दोन्ही विभक्त राष्ट्रे परत एकत्र येतील असा विचारही करू नये, अशा या अटी होत्या. गांधीजींनी या अटी स्वीकारल्या किंवा नाकारल्या याबद्दल जाणून घेण्याआधीच गांधीजींची हत्या झाली. कदाचित गांधीजींची पाकिस्तान वारी घडली असती तर आजचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असत.

संयुक्त राष्ट्रांत एकमेकांची उणीदुणी काढणारे भारत-पाकिस्तान कदाचित शांतीवार्ता करताना दिसले असते. गांधीजी अहिंसा आणि शांतीचा पुरस्कार करणाऱ्या सर्वांचेच आदर्श झाले. गांधीजी गेल्यानंतर जेवढा भारतीय जनतेने शोक केला तेवढाच कराचीत आणि लाहोरमधेही केला गेला. दक्षिण आफ्रिकेतही लोक स्तब्ध झाले. जिथे जिथे गांधीजींना मानणारा वर्ग होता, तिथे तिथे प्रतिक्रिया उमटल्या.विश्वव्यापी मानवतेच्या सारांशाचे महत्व विशद करणारी ही घटना होती. गांधीजी विश्वशांतीचे पसायदान मागणाऱ्या प्रत्येकाचे होते. ते नथुरामचे देखील होते आणि सावरकरांचे देखील.

परदेशी पाहुणे आले की त्यांना साबरमतीच्या आश्रमात घेऊन जाऊन भारताची आदर्श गांधीवादी परंपरा दाखवणाऱ्या मोदींचे देखील ते आहेत. आयुष्यभर ज्यां महात्म्याला शिव्यांची लाखोली वाहिली त्यांनाच नमन करण्यासाठी आज माना झुकविल्या जाणार आहेत हे खरं माहात्म्याचं महात्मेपण. यातला नाटकीपणा हळूहळू समोर येतोय खरा, पण गांधीजींचा हिमालय लोकांमध्येच आहे. तेव्हा अशांना वेगळं करून कसं जमेल? सर्वोदयाच्या संकल्पनेत डावे-उजवे-गांधीवादी-आंबेडकरवादी-सर्वच आले. कुणीही सुटता कामा नये. अगदी नथुरामाचाही सर्वोदय व्हायला हवा, तोच खरा गांधीवाद.

- सागर भालेराव

Similar News