पवारांनी घराबाहेर नव्हे, मुख्यमंत्र्यांनी चौकटीबाहेर पडणे आवश्यक

Update: 2020-05-17 04:07 GMT

शरद पवार यांच्यासारखा मुत्सद्दी नेता फक्त राजकीय डाव टाकण्यासाठी गरजेचा नसतो. आपल्याला केवळ मुख्यमंत्रीपदी बसवण्यासाठी शरद पवार उपयुक्त नाहीत, तर अभूतपूर्व आपत्तीशी दोन हात करतानाचे ते सच्चे मार्गदर्शक आहेत. हे उद्धव यांना नीट समजलेले दिसत नाही.

उद्धव ठाकरे 'टिपिकल' राजकारणी नाहीत, हे एका मर्यादेपर्यंत चांगलं आहे. पण, ते 'ब्युरोक्रॅटिक' असतील, तर अडचणीचं ठरू शकतं. आपत्तीचा मुकाबला कसा करायचा? याचं एक अंगभूत आणि सामूहिक समंजसपण राजकारण्यांना असतं. मी अगदी यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलत नाही. ते राजकारणी नव्हते आणि ब्युरोक्रॅटही नव्हते. 'इमेज मेकिंग'चं ते अपत्य होतं. ते सोडा. पण, एकूण राजकारणी गोळ्यामेळ्यानं संकटावर मात करतात, असा आपला अगदी गाव पातळीवरचाही अनुभव असतो.

उद्धव ठाकरे इथं थोडे कमी पडताहेत, अशी मला भीती आहे. मागे मी आजी- माजी मुख्यमंत्र्यांची नवरत्न परिषद घेण्याची कल्पना मांडली. त्याला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला. पण, मुख्यमंत्र्यांनी ती कल्पना फार उचलून धरली नाही. अर्थात, हा एकमेव मुद्दा नाही. बाकीही काही निरीक्षणं आहेत. ती वेळ जाण्यापूर्वी शेअर करणं महत्त्वाचं, म्हणून नोंद करतोय.

शरद पवार हे सध्याचे महाराष्ट्राचे सर्वात ज्येष्ठ माजी मुख्यमंत्री. आपत्ती व्यवस्थापनात त्यांना गती. राज्यासह देशाचा समग्र आवाका. माणसांमधून जन्माला आलेला हा राजकारणी. सर्वपक्षीय स्वीकारार्हता. ब्युरोक्रॅसीशी उत्तम संवाद. दिल्लीशी कनेक्ट. शरद पवारांच्या अनुभवाचा, प्रज्ञेचा आणि संपर्काचा यथायोग्य वापर करून घेतला जातोय, असे दिसत नाही.

पवार आता घराबाहेर पडले असतील, तर ८० वर्षांचा योद्धा रणांगणात उतरला, वगैरे भलते कौतुक करत बसू नका. पवारांनी घरात थांबून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. अशावेळी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी पवारांच्या मार्गदर्शनानुसार पुढची रणनीती आखणे अधिक महत्त्वाचे.

त्यासाठी पवारांनी घराबाहेर नव्हे, मुख्यमंत्र्यांनी चौकटीबाहेर पडणे आवश्यक आहे.

- संजय आवटे

Similar News