नव्या पिढीचं सॉफ्ट लाँच 

Update: 2018-12-12 11:27 GMT

शरद पवारांना महाराष्ट्राचा जाणता राजा ही पदवी कुणी दिली माहित नाही, पण हे बिरूद आता त्यांच्या नावापुढे चिटकून गेलंय. २०१९ च्या निवडणूकीत थेट पवार परिवारातच फूट पाडण्याची भारतीय जनता पक्षाची रणनिती लक्षात घेऊन शरद पवारांनी 'पवार' परिवार एकसंध राहावा या साठी परिवारातल्या नवीन पिढीचं राजकीय लाँचिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शरद पवार जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांच्या सोबत रोहित आणि पार्थ हे नव्या पिढीतले 'पवार' उपस्थित असतात.

दादा-ताई कोल्डवॉर

Credit: outlookindia

सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात पटत नाही, त्यांचे वेगवेगळे गट आहेत अशा बातम्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच संभ्रम असायचा. 'दादा गट' की 'ताई गट' या संभ्रमात असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी तर दोन्हीकडे हजेरी लावायचा कार्यक्रम सुरू केला होता. पक्षाची सर्व एनर्जी दादा-ताईंची मर्जी सांभाळण्यातच खर्च होते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत शरद पवारांनी स्वत: लक्ष घालून पक्षातली दादा आणि ताईगिरी नियंत्रणात आणल्याचं सांगीतलं जातंय.सध्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे अनेक कार्यक्रमांमध्ये सोबत असतात. एकमेकांविषयी चांगलं बोलतात. सुप्रिया सुळे तर अनेक ठिकाणी दादांचे फोटोसेशन किॅवा बाईट नीट कव्हर व्हावेत यासाठी डायरेक्शन ही करताना दिसतात. औरंगाबाद मधली भजी असोत किॅवा लालबागच्या दर्शनाला जातानाचं डायरेक्शन... दादा आणि ताईंनी आपली पब्लिक इमेज आता अधिक सौहार्दाची बनवलीय.

Full View

पवार परिवारात शीतयुद्ध !

राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला अभयदान दिल्यानंतरही भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केलाय. बारामतीतच रा. स्व. संघाचं शिबीर होणं, त्यानंतर पवार परिवारातील वरिष्ठ व्यक्तीने संघाच्या नेत्यांना भेटणं, बारामतीत मध्यंतरी झालेली होर्डींगबाजी, एकाच विषयावर पवार परिवारातीलच विविध सदस्यांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणं, सोशल मिडीयावर तयार झालेले समर्थकांचे ग्रुप यामुळे पवार परिवारातील शीतयुद्ध बारामतीतल्या लोकांना जाणवू लागलं होतं.

येत्या काळात रोहित आणि पार्थ पवार यांच्यात नेतृत्वासाठी लढाई होऊ शकते अशीही चर्चा बारामतीमध्ये रंगली होती. पवार परिवारातील या शीतयुद्धाला भाजपाच्या चाणक्यांकडून इंधन पुरवलं जाऊ शकतं अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर अखेर शरद पवारांना लक्ष घालावं लागलं.

रोहित आणि पार्थचं ट्रेनिंग

सध्या शरद पवारांनी रोहित आणि पार्थ ला ट्रेनिंग देणं सुरू केलं आहे. अनेक कार्यक्रमांना शरद पवार या दोघांना घेऊन जातात. दिवाळी मधला शरद पवारांचा एक व्हिडीयो व्हायरल झाला होता त्यात ते एका वृद्धाला १०० वर्षे जगण्यासंदर्भात शुभेच्छा देतायत, या व्हिडीयोत बारकाईने पाहिलं तर कारच्या मागच्या सीटवर रोहित आणि पार्थ पवार बसलेले दिसतील.

Full View

Credit -Supriya Sule Fc

पवारांच्या कोकण दौऱ्यातही हे दोघे त्यांच्या सोबत होते. पवारांच्या तालमीत तयार होऊन या दोघांपैकी नक्की कोण पुढे जातो, कोण मागे राहतो याची चर्चा आता पक्षामध्ये रंगलीय.

कोण वरचढ?

रोहित आणि पार्थ मध्ये कोण वरचढ ठरेल हा प्रश्न आता सर्वांना पडलाय. दादा-ताईंनंतर लगेच रोहित-पार्थ असं लाँचिंग योग्य राहिल का अशी चिंता ही पक्षाच्या एका नेत्याने बोलून दाखवलीय. रोहित यांना जिल्हापरिषदेच्या राजकारणातून राज्याच्या राजकारणात आणण्याची त्यांच्या आई वडिलांची इच्छा आहे,

तर पार्थ यांच्या राजकारण प्रवेशाबाबत अजितदादांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे. रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्वत:चं जोरदार ब्रँडींग केलंय, तर शरद पवारांच्या वाढदिवसाच्या होर्डींगच्या निमित्ताने पार्थ पवारही आता या लढाईत उतरले आहेत.

कोण आहे रोहित पवार?

रोहित पवार हे शिर्सुफळ - गुणवडी गटातून राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते नातू असून शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचे ते चिरंजीव आहेत. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ते नात्याने पुतण्या आहेत. सध्या रोहित पवार राजकारणाबरोबरच बारामती अॅग्रोच्या माध्यमातून कृषी व्यवसायात काम करत आहेत. मध्यंतरी शरद पवार आणि रोहित पवार यांचा परदेश दौऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रोहित पवार सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. मध्यंतरी शिवसेनेने अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर रोहित पवार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. रोहित पवार यांना शरद पवार यांच्याप्रमाणेच शेती क्षेत्रात आवड असल्यानं दोनही दोघांचही चांगलं ट्युनिंग असल्याचे बोलले जातंय. सकाळ रिलीफ फंड, बारामती अॅग्रो, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, भारत फोर्जसह काही कंपन्यांच्या सहकार्याने 57 गावांमध्ये तब्बल 70 हजार मीटर लांबीचे ओढ्यांचे खोलीकरण करून ग्रामस्थांना दिलासा दिला आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते महाआरोग्य शिबीरांचं आयोजन करतात. या शिबिराची तब्बल 54 हजार रुग्णांना मदत झाली. या शिबिरात वेगवेगळ्या मोफत शस्त्रक्रियांच्या माध्यमातून सामान्यांची 7 कोटींची आत्तापर्यंत बचत झाली आहे.

Full View

कोण आहे पार्थ पवार ?

पार्थ अजित पवार हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. त्यांच शिक्षण मुंबई आणि परदेशात झाले असून उच्चशिक्षित असलेले पार्थ हे अजित पवार यांचे सोशल मीडिया हॅंडल करतात. अलिकडे अजित पवार यांच्या पेजवर येणाऱ्या इंग्रजी पोस्ट हे पार्थ यांचंच मॅनेजमेंट आहे. अजित पवार राज्याच्या राजकारणात व्यस्त असताना पार्थ कुटुंबाच्या व्यवसाय आणि मतदार संघातील कामं पाहत असतात. पार्थ सध्या राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये कार्य़कर्त्याप्रमाणे काम करतात. मध्यंतरी राष्ट्रवादीच्या एका सभेतील पार्थ यांचा सर्व सामान्य जनतेत बसलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. सध्या पार्थ मावळ मतदार संघातून लोकसभेसाठी निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं समजतंय.

Credit: E Sakal

पार्थ पवार यांना शरद पवार यांच्या प्रमाणे खेळाची आवड आहे. त्यांनी मध्यंतरी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा मॅरेथाॅनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पार्थ यांनी या स्पर्धेत धावून सहभाग नोंदवला होता. पार्थ हे अजित पवार यांच्यासोबत पिंपरी चिंचवड येथील अनेक कार्यक्रमात हजेरी लावतात. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवार यांच्यासोबत पार्थ यांचेही फ्लेक्स लावण्यात आल्यानं पार्थ यांची राजकीय घोडदौड सुरु असल्याचं यातुन स्पष्ट होते.

Full View

Credit - Sarkarnama

थिंकटँक कोण?

रोहित पवार : रोहित पवारच्या घरातून त्याला जबरदस्त पाठिंबा आहे. त्याशिवाय संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रवीकांत वर्पे यांच्यासारखे काही लोक रोहित पवार यांच्या सोबत थिंकटँक म्हणून काम करत आहेत.

पार्थ पवार : पार्थला सध्या घरातूनही सक्रीय पाठिंबा आहे, तर अजित पवार प्रत्यक्ष मदत करताना दिसत नाहीत. उद्योजक आणि मित्र सध्या पार्थच्या थिंकटँकचं काम सांभाळत आहे.

Similar News