स्वावलंबनातून समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे अण्णा !

Update: 2020-06-15 07:05 GMT

2012 साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. राळेगणच्या ग्रामस्थांना चारा छावणी पाहिजे होती. अण्णांनी गावात एकूण उपलब्ध चारा किती त्याची यादी केली. गावात जनावरं किती त्याची यादी केली. आपल्याला चारा छावणीची गरज नाही, पुरेसा चारा आपल्याकडे आहे हे कागदावर मांडून दाखवलं. सरकारला विनाकारण काही मागायचं नाही. गरजेपेक्षा जास्त काहीच नको. अण्णा जे वैयक्तिक आयुष्यात पाळत आले तीच शिस्त त्यांनी संस्थांना लावली. राळेगणमध्ये सार्वजनिक कामांसाठी एक वर्षाची आर्थिक तरतूद झाली की त्यानंतर एक रुपयाही अतिरिक्त देणगी घेतली जात नाही.

राष्ट्रवादीचे, काॅग्रेसचे, भाजपाचे समर्थक अण्णांचं ट्रोलींग करत असतात पण तिन्ही पक्षांचे शीर्षस्थ नेते अण्णांवर कधीच वेडंवाकडं बोलल्याचा इतिहास नाही. अगदी अण्णांच्या तोंडून त्या नेत्यांबद्दल एखादा वावगा शब्द गेला तरी.अपवाद फक्त दिल्लीतील दोन काॅग्रेसी नेते आणि नवाब मलिक यांचा. नवाब मलिकांना मागच्या खेपेला अण्णांमुळं मंत्रिपद गमवावं लागलं होतं. मात्र नुकतंच नवाब मलिक बोलले त्यावर लगेच स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त करून पडदा टाकला. यातले दिल्लीचे एक ज्येष्ठ नेते राळेगणला येऊन अण्णांची माफी मागण्याची इच्छा व्यक्त करत होते. अण्णांनी सांगितलं माफी मागण्याची गरज नाही. नेत्यांना अण्णांचं मोल माहित आहे. स्व. बाळासाहेबांनी अण्णांवर शारिरीक शेरा मारला होता, मात्र 2011 साली, बाळासाहेबांच्या हयातीतच आदित्यनं दिल्लीत स्वतः येऊन अण्णांना पाठिंबा दिला होता. मागच्या राळेगणच्या उपोषणाला उद्धवजींनी पाठींबा दिला होता, मनसे प्रमुख राज ठाकरे स्वतः राळेगणला आले आणि अण्णांना उपोषण सोडण्याचा आग्रह केला. पृथ्वीराजजींनी अण्णांसाठी दिल्लीत महाराष्ट्रातून डाॅक्टर पाठवले होते. देवेंद्रजींनी अण्णांची एकही मागणी अव्हेरली नाही. स्व.विलासराव यांच्या आयुष्यात तर अण्णांना विशेष स्थान होतं. युतीचे मनोहर जोशी असोत की गोपीनाथराव, अण्णांचा शब्द त्यांनी कधी ओलांडला नाही. मोठ्या पवारसाहेबांच्या मनाचा मोठेपणाही असा की एवढ्या मोठ्या वादानंतर अण्णांवर त्यांनी एका शब्दाचीही प्रतिक्रिया दिली नाही. अण्णांच्या त्या विधानावर आम्हीही तत्काळ दिलगिरी व्यक्त केली होती.

स्वैर सत्तेला नैतिक बांध आवश्यक असतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या शीर्षस्थ नेत्यांना ही जाणीव आहे.

चारित्र्य हे अण्णांचं खरं भांडवल आहे. अण्णांवर सगळ्या प्रकारची टीका झाली आहे. अजून अण्णा भ्रष्ट आहेत हे म्हणण्याची हिंमत मात्र कोणी केलेली नाही. सुरेशदादा जैनांनी तसा प्रयत्न केला पण तो अंगलट आला.

अण्णा धार्मिक प्रश्नांवर भूमिका घेत नाहीत म्हणून पुरोगामी नाराज असतात. सेक्युलॅरिझमची भूमिका म्हणजेच सामाजिक भूमिका असा त्यांचा आग्रह असतो. मात्र पुरोगामी शहरात राहतात तर अण्णा गावात त्यामुळे दोघांचे दृष्टीकोन वेगळे असू शकतात. हिंदू मुसलमान भांडण गावात नाही. हे वाद शहरांचे. तिकडे सगळे गुण्यागोविंदानं रहात आहेत. मलाही माझ्या गावात गेलो की जाणवतं की साठ टक्के हिंदू आणि चाळीस टक्के मुसलमान भावाभावासारखं रहात आहेत. त्यांचे सगळ्यांचे सामुहिक प्रश्न आहेत ते शेतीचे आणि शेतमालाचे आहेत. सेक्युलॅरीझम हा विषयसुद्धा त्यांच्या अजेंड्यावर नाही कारण एकमेकांच्या सहवासात आणि प्रेमात तो विषय विरघळून गेला आहे. साहचर्य हा सहजभाव झाला आहे.

खास करून काॅग्रेस आणि राष्ट्रवादीचे ट्रोल अण्णांना 'छुपे संघी' ठरवण्यास उतावीळ असतात मात्र स्वामी अग्निवेश, डाॅ सुब्बाराव, शांतीभूषणजी, मेधाताई, राजगोपाल, राजेंद्रसिंह, अरूणा राॅय, योगेंद्र यादव अण्णांच्या आंदोलनाला 2011 साली सक्रीय पाठिंबा देतात. आज देशातले जे सेक्युलॅरिझमचे आदर्श आहेत त्यातल्या कोणीही अण्णांना आजपर्यंत छुपा संघी म्हणलेलं नाही. म्हणते ती फक्त ट्रोल सेना.

अण्णांनी दलितांच्या हत्त्यांवर भूमिका घ्यायला पाहिजे. ही अपेक्षा रास्त आहे. एक नम्र नोंद इथं केली पाहिजे की राळेगणमध्ये पोळ्याचा मान दलित कुटुंबाला देण्याची प्रथा अण्णांनी सुरू केली. दलित बांधवांना घटनेनंच दिलेल्या समतेची ही थेट अंमलबजावणी. राळेगणच्या सगळ्या दलित बांधवांची कर्ज गावानं फेडली. थेट आर्थिक कार्यक्रम. ही नोंद महत्वाची आहे.

मी अण्णांना एकदा म्हणालो की अण्णा आपण ट्रोलींगला तोंड देण्यासाठी राळेगणमध्ये मिडीया सेल तयार केला पाहिजे. अण्णांनी नकार दिला. ते म्हणाले त्यापेक्षा आपलीच अपमान सहन करण्याची ताकद वाढवणं जास्त फायदेशीर आहे. आपण लोकांच्या पैशावर ही सोशल मिडीयाची चैन कशासाठी करायची?

राळेगणचे गावकरी ही अण्णांची दुसरी शक्ती. ते नातं विलक्षण आहे. मी स्वतः राळेगणच्या लोकांच्या प्रेमाचा सतत अनुभव घेत असतो. अर्थात मी स्वतःला एक लक्ष्मणरेषा घालून दिली होती. राळेगण आणि अण्णा यांच्या अंतर्गत बाबतीत मी कधीच आत शिरलो नाही. राळेगणच्या उपोषणावेळी रोज रात्री ग्रामसभा होत असे. मी मुद्दाम गैरहजर रहायचो कारण मी ग्रामसभेचा सदस्य नव्हतो. आपली मतं ग्रामसभेवर लादायची नाही.

2011 साली देशानं डोक्यावर घेतलं तेव्हा आणि नंतर ट्रोलांनी अपमानावर अपमान केले, अत्य॔त वाईट टीका केल्या तेव्हाही अण्णा विचलित झाले नाहीत. मी त्यांना कधी निराश झालेलं पाहिलं नाही. दरवेळी ते नव्या योजनांवर भरभरून बोलतात.

मेधाताई आणि अण्णा यांचा स्पर्श आयुष्याला झाला नसता तर कदाचित 'बुडते हे जन न देखवे डोळा' ही माझ्यासाठी एका अभंगाची एक ओळ राहिली असती. दोघांच्या कायम ऋणात राहिलो आहे आणि राहील.

कधीतरी एखादं पुस्तक लिहीन. तूर्त एवढंच.

अण्णांना 84 व्या वर्षात नेणार्या आजच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा! 💐

Similar News