काय ठरवलंय ते महाराष्ट्राला एकदा सांगाच!

Update: 2019-10-30 07:42 GMT

काय ठरवलंय ते महाराष्ट्राला एकदा सांगाच! मतदाराला ते समजलंच पाहिजे, नव्हे त्याचा तो अधिकार आहे.

एकानं म्हणायचं समसमान ठरवलंय, दुसऱ्यानं म्हणायचं ते मुख्यमंत्रीपदाबाबत नव्हतंच, हे अजिबात चालणार नाही. यासाठी जनतेनं तुम्हाला निवडून दिलेलं नाही.

एकमेकांशी दगाबाजी केलीत तर ती जनतेशी सुद्धा मोठी गद्दारी ठरेल आणि मतदार ती अजिबात खपवून घेणार नाही. एकमेकांचे पाय खेचून दुसऱ्याला पाडण्यासाठी मुद्दाम तुम्हीच एकमेकांविरोधात बंडखोर उभे केलेत, हे न कळण्याइतकी जनता दुधखुळी नाही. ती तुमच्यापेक्षा शहाणी आणि धूर्त आहे हे तुम्ही दोघांनी विसरता कामा नये. नाहीतर जसं निवडून आणलं तसं ती भिरकाऊनहि देईल !

ऐनवेळी मित्रपक्षाचे आमदार फोडायचं घाणेरडं राजकारण तर आजिबात करू नका. ते जनतेला रुचणार नाही. जनतेचा कौल स्पष्ट आहे, कोणी सत्तेत आणि कोणी विरोधात रहायचं, ते जनतेनंच ठरवलंय. जनादेशाविरोधात जाण्याचा उर्मटपणा करू नका.

होय, आज हे तुम्हाला कोणीतरी स्पष्ट आणि खणखणीतपणे सुनावणं गरजेचं आहे. कारण जनता तुमच्या विचारधारा, एकत्र असणं, आणि काम करण्याची ताकद, क्षमता पाहूनच मतं देते, कारण तुम्ही तसेच वागाल अशी बिचारीची खात्री असते. एकदा निवडून गेल्यावर तुम्ही मुजोरीपणानं हवी तशी समीकरणं सत्तेसाठीच बदलली, तर जनता काहीच करू शकत नाही, ती काय वाकडं करणार? अशा भ्रमात राहू नका.

मग दोन तृतीयांश आमदार फोडणं, विधीमंडळात विश्वास ठरावाच्या मतदानात अनुपस्थित राहणं, असल्या क्लृप्त्या केल्यात, तरी जनता माफ करणार नाही. जनादेश तो धनादेश ! योग्य संदेश ओळखा, गद्दारी न करता अभद्र, अनैतिक आघाड्या व युत्या टाळा! एकमेकालाही गृहित धरू नका. येतील फरफटत मागे, जातील कुठं, असंही समजू नका.

या महाराष्ट्राचा स्वतःचा पॅटर्न आहे आणि तो मराठमोळी जनताच ठरवते. हे राज्य म्हणजे कर्नाटक, गोवा किंवा मणीपूर नाही. इथे दगाबाजी, शब्द फिरवणे, तोडफोड चालणार नाही.

तुम्ही असेच वागणार होतात, तर मग मनसे जनतेकडे विरोधात बसण्यासाठी मत मागत होती, त्यांचं काय चुकलं? तुम्हाला मत दिल्याचा जनतेला पश्चात्ताप वाटेल असं काही करू नका. काळाची गरज आहे सुस्थिर सरकार आणि अत्यंत प्रभावी विरोधी पक्ष, जो सरकारवर खरा अंकुश ठेवेल!

त्यासाठी उन्माद, अहंकार आणि माज बाजूला ठेवा. मतदाराला दिलेल्या वचनांशी प्रामाणिक रहा, आणि लवकर सरकार स्थापन करून कामाला लागा, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे !

Similar News