छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय?

Update: 2020-06-26 01:59 GMT

बाबासाहेबांनी माणगाव परिषदेत १०० वर्षांपुर्वी शाहूराजांचा वाढदिवस सणाप्रमाणे साजरा करण्याचा ठराव मांडला होता. हे माझ्या वाचनात आल्यापासून गेली २५ वर्षे मी हे सर्वत्र मांडतोय. जयंती करतोय,करायला लावतोय. बाबासाहेब म्हणाले होते, "शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते." अगदी सार्थ आणि उचित गौरव.

शाहूराजांच्या मृत्युला ६ मे २०२० ला ९८ वर्षे झालीत. पुढील वर्षी त्यांची स्मृतीशताब्धी सुरू होईल. महाराज फार अकाली गेले. अवघ्या ४८ व्या वर्षी ते गेले. एव्हढ्या वर्षांनी मागे बघताना आजही त्यांच्या विचारांचा रिलेव्हन्स काय दिसतो?

१) १९०२ सालचे महाराजांचे एक भाषण आहे. त्यात ते म्हणतात, " ग्रामीण महाराष्ट्राचा योग्य विकास झाला नाही, तर लोक रोजगारासाठी शहरांकडे धाव घेतील. शहरात झोपड्या वाढतील. शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर ताण पडेल. गुन्हेगारी वाढेल आणि शहरं ही अशांततेची केंद्रं बनतील." आज महाराजांचे हे उद्गार पटतात की नाही? होता की नाही माणूस द्रष्टा? काळाच्या पुढचं बघणारा?

२) महाराजांनी १०३ वर्षांपुर्वी शिक्षण हक्क कायदा केला. प्राथमिक शिक्षण, मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक केले. जे काम स्वतंत्र भारताला करायला त्यानंतर ९३ वर्षे लागली. "गाव तिथे शाळा," "गाव तिथे ग्रंथालय", ह्या त्यांच्या लोकप्रिय घोषणा होत्या. १९१७ ते १९२२ याकाळात महाराज कोल्हापूर संस्थानच्या बजेटमधला २३ टक्के पैसा शिक्षणावर खर्च करीत असत. १९२२ साली कोल्हापूरच्या शेकडोपट मोठ्या ब्रिटीश मुंबई प्रांतात आधुनिक विचाराच्या ब्रिटीशांनी शिक्षणासाठी तरतूद केली होती रुपये सत्तर हजार आणि त्याच वर्षी मुंबईप्रांताच्या टिकली एव्हढ्या आकाराच्या कोल्हापूरसाठी शाहूराजांनी बजेटमध्ये शिक्षणासाठी पैसे राखून ठेवले होते रुपये १ लाख. आजही आपण जीडीपीच्या साधारणपणे तीन टक्के पैसा शिक्षणावर खर्च करतो. महाराज किती पुढे होते बघा. एव्हढा खर्च तर जगातला कोणताच देश करीत नाही.

३) महाराजांनी १९०९ साली राधानगरी धरण बांधायला घेतले. ते म्हणाले, " इट इज माय ड्रीम प्रोजेक्ट." १९१८ साली हे धरण पुर्ण झाले तेव्हा १४ टक्के कोल्हापूर ओलीताखाली आले. सिंचनाची ही टक्केवारी गाठायला फुले- शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्राला २०१४ उजाडले. आज महाराष्ट्रात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्यात. कोल्हापूर याला अपवाद का आहे? कारण शाहूराजांचा द्रष्टेपणा.

फुले-शाहू-आंबेडकर यांच्यात ४२ गोष्टींबाबत साम्य होते.

त्यातली एक म्हणजे हे तिघेही निर्व्यसनी होते. संपुर्ण निर्व्यसनी.

उरलेल्या ४१ गोष्टींबद्दल नंतर कधीतरी बोलू.

या जयंतीपासून कितीजण दारू सोडणारेत? नुसत्या नामजपाला काडीचीही किंमत नाही. तुम्ही त्यांचे विचार स्विकारले तरच त्यांचे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. एरवी नाही.

शाहू छत्रपतींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

-प्रा. हरी नरके

Similar News