फुगा केव्हाच फुटलाय, अधिकृत घोषणा बाकी आहे !!!

Update: 2019-03-22 19:28 GMT

ज्या गुजरातमधून मोदीजी हिंदुंचे तथाकथित मसीहा म्हणून उभारले आणि ज्या गुजरात माॅडेलचं चाटुकार माध्यमांनी अतिरंजित कौतुक केलं, तिथे भाजपाचे संख्याबळ २००२ नंतर प्रत्येक निवडणुकीत घटत गेलंय.

२००२ ला गुजरातेत भाजपाचे १२७ आमदार होते. मोदींच्या राजवटीतच २००७ ला ते ११७ इतकं दहाने खाली घसरलं. २०१२ ला आणखी २ ने घटून ११५ झालं आणि देशात पंतप्रधानपदी विराजमान असतानाही २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत गुजरात सावरताना मोदींना घाम फुटला. भाजपाला शंभरीही गाठता आली नाही. ९९ वर भाजपाला समाधान मानावं लागलं. त्याउलट काॅन्ग्रेसने २००२ ते २०१७ पर्यंत ५१, ५९, ६१, ७७ अशी कासवगतीने वाढ राखली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१७ च्या विधानसभेत काॅन्ग्रेसची मतं ४० लाखांनी वाढली, तर भाजपाची ५ लाखाने कमी झाली.

मणीनगर मतदारसंघात नरेंद्र मोदींनी नेहमीच एकूण मतदानाच्या ६० ते ७५ टक्के असा मोठा हिस्सा पटकावलाय. २०१७ च्या निवडणुकीत तो ५ टक्क्यांनी कमी झालाय. स्वत: मोदींचं २०१२ चं प्रत्यक्ष मतदानही २००७ च्या तुलनेत २० हजारांनी कमी झालेलं दिसतं.

जिथे गुजरातच नाराज आहे, तिथे देशाचा कल लक्षात घेणं सहजसोपं आहे. गुजरातमधून लोकसभा लढणं मोदींसाठी जोखमीचं झालंय. त्यांना वाराणसीचा आधार जास्त सोयिस्कर वाटतो. पण तिथेही, मैं हां गंगा की सेवा करने आता हुं, कितपत चालेल, सांगता येत नाही. नमामि गंगेवर फक्त करोडो खर्च होताहेत. गंगा आहे तशीच आहे.

२०११ तील स्वामी निगमानंद यांच्या उपोषण प्रश्चात मृत्यू नंतर अलिकडचा नव्वद वर्षीय प्रोफेसर जी डी अग्रवाल यांच्या मृत्यूचं प्रकरण ताजं आहे. गंगा सफाईबाबतच्या अग्रवाल यांच्या कुठल्याही पत्राला मोदींनी साधी पोचही दिली नाही. बुध्दीकुपोषितांना भावनिक बोलून गुंडाळता येतं, पण बुध्दीवंतांना सामोरं जाण्याचा दम मोदींमध्ये नाही, हे अग्रवाल यांच्या लढ्यात पुन्हा दिसलं.

मोदी नावाचा खोटा बडेजाव आणि बागुलबोवा उभा करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या लोकांनी देशाला घाबरवणं सोडलं पाहिजे. खोटारडेपणा हा अल्पायुषीच असतो. तेच मोदींच्या राजकारणाचं होणार आहे. फुगा फुटलाय कधीच. अधिकृत घोषणा बाकी आहे !!!!

- राज असरोंडकर

________________

माहिती स्त्रोत : भारत निवडणूक आयोग

संशोधन : मीडिया कन्सेप्टस् आणि कायद्याने वागा लोकचळवळ

Similar News