माळीण दुर्घटना: ६ वर्ष पूर्ण, आपण काय धडा घेतला?

Update: 2020-07-30 08:02 GMT

माळीण - भीमाशंकरच्या कुशीत वसलेले इवलेसे गाव. फार तर पुणे जिल्हा परिषदेच्या दप्तरातील नोंद, या पलिकडे या गावाचे अस्तित्वही जगाच्या गावी नव्हते. पण चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी देशभरातील टीव्ही वाहिन्यांवर या गावाचीच चर्चा सुरू झाली.

पण तोपर्यंत माळीण गाव 'इतिहासजमा' झाले होते. मुसळधार वृष्टीमुळे दरड कोसळली व त्याखाली अख्खे गावच गायब झाले.

सहा वर्षे झाली. माळीण गावाचे दु:खही एव्हाना काळाच्या ओघात अस्पष्ट व धूसर झाले. पण माळीण गावातल्या उरल्यासुरल्या रहिवाशांना मात्र, ती सकाळ आजही स्पष्ट आठवते.

माळीण हे गाव मंचरपासून 50 व पुण्यापासून 125 किलोमीटर अंतरावर होते. या गावच्या सात वाड्या व गावठाण मिळून 900 लोकवस्ती होती. दोन दिवस या भागाला पावसाने झोडपून काढले. तब्बल 200 मिलिमीटर पाऊस झाल्याने नागरिकांना घराबाहेर निघणे अवघड झाले होते.

गावठाणाची लोकसंख्या 170. या गावठाणाला लागूनच माडमाचा डोंगरकडा आहे. पावसाच्या सततच्या माऱ्यामुळे सकाळी साडेसातच्या सुमारास हा कडा कोसळला. काही कळण्याच्या आतच मुरुम, मोठे दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली तेथील 48 घरे गाडली गेली. कोणालाही घरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

पावसामुळे शेतकरी भात लावणीच्या तयारीत होते. त्यासाठी शेजारच्या गावांतील 50 जण गावात मुक्कामाला आले होते. तेही ढिगाऱ्याखाली अडकले.

डोंगरावरील दगड व माती वाहून आल्यामुळे संपूर्ण गावात चिखलाचे ढीग साचले. या ढिगातून नागरिकांचा शोध घेणे ही जिकिरीची बाब ठरली. त्यात सकाळी पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे आले.

सकाळी जवळच्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एस्टी बसच्या कंडक्टरला गावच दिसेना. तेव्हा त्याने पुढे जाऊन या दुर्घटनेची खबर दिली. सर्व यंत्रणा सतर्क होऊन मदत कार्य सुरू व्हायला दुपार झाली.

तोवर टीव्हीवर 'माळीणची दुर्घटना' जगजाहीर झाली व नंतर आठवडाभर पत्रकार, कॅमेरेवाले, पुढारी, अधिकारी अशा हौश्या-नवशांची जत्राच उसळली. माळीण गाव जणु 'मन्सून आऊटिंगचे 'आकर्षण' बनले.

माळीण दुर्घटनेला 6 वर्षे उलटली. अद्याप आपण बोध मात्र काहीच घेतलेला दिसत नाही. आजही डोंगर पाड्यांमध्ये बिनतारी संदेश यंत्रणा नाही. पर्यायी संपर्काची वा प्रथमोपचाराचीही व्यवस्था नाही.

माळीण गावाची कथा ऐकल्यावर बालकवींची एक विराणी आठवली.

भिंत खचली कलथुनि खांब गेला

जुनी पडकी उध्वस्त धर्मशाळा।

तिच्या कौलारी बसुनी पारवा तो

खिन्न निरस एकान्त गीत गातो।।

'एक होते माळीण गाव' इतकीच काय ती नोंद इतिहासात राहणार आहे.

- भारतकुमार राऊत

Similar News