कठीण आला काळ। मातीश तुटे नाळ । युगाचा अंधा खेळ । डोळेच केले गहाळ। 

Update: 2019-08-14 06:13 GMT

काळ कठीण आला आहे! हे वाक्य माझ्या लहानपणापासून मी अनेकांच्या तोंडून रोज ऐकले आहे. त्यातल्या त्यात म्हातारी माणसं तर हे वाक्य दिवसातून एकदा तरी बोलतातच. या वाक्याला जोडून आणखी एक वाक्य हमखास असते. ते म्हणजे काय काळ होता आमच्या बालपणी, तरुणपणी वगैरे. जेव्हा या गाण्याच्या ओळी लिहताना, कठीण आला काळ, ही ओळ मी लिहून मी मोकळा झालो आणि नंतर वाचली तेव्हा मला मी अकाली म्हातारा झाल्याचे माझ्या लक्षात आले.

मी ज्यास्त विचार करू लागलो. नुसता विचार नाही, तर चिंतन करू लागलो. बालपण, तरुणपण, म्हातारपण या जीवनाच्या अवस्थाचेच्या पल्याड, जीवन मरणाच्या चक्रापल्याड चिंतन करू लागलो. आणि हळू हळू उमगले, काळाबरोबर मानवजात विकसित होताना मला दिसली. पण विकासाबरोबर ती आनंदाने विकसित होताना दिसली नाही. उलट, विकासासोबत विकाराचे मोठे ओझे तिच्या पाठीवर वाढताना दिसले. एकूण विकासाचा सूर्य जगावर तळपत असताना माणसाच्या आतला अंधार गढद झाल्याचे जेव्हा माझ्या लक्षात आले, तेव्हा मी अंतर्बाह्य हादरून गेलो! म्हणजे बाहेर उजेड आणि आत अंधार ही अवस्थाच भयावह असल्याने मी अधिक हवालदिल झालो.

दिवसेंदिवस हा अंधार वाढला तर या प्राण्याचे काय होईल? विश्वातील एकमेव बुद्धिमान प्राणी म्हणून ज्याचा युगानुयुगे गौरव केला जातो त्याला हा अंधार का पडला आहे? याचे गणित सुटत नसेल, तर त्याने विकासाचे तीर मारून मंगळावर जरी शेती सुरू केली तरी या अंधाराचे तो काय करील? हा प्रश्न मला त्रास देऊ लागला. एकूण, मनुष्यप्राणी एका उजेडाच्या रस्त्याने अंधाराचा प्रवास करतोय की अंधाराच्या रस्त्याने उजेडाचा प्रवास करतोय? असल्या जीवघेण्या प्रश्नाने मला घेरले.

रोजच्या जगण्याचे बारकाईने निरीक्षण केले तर मला मानवाचे बरेचसे व्यवहार हे जिवंत माणसाने केलेलं मृत्युवत व्यवहार आहेत हे माझ्या नजरेस येऊ लागले. म्हणजे माणसे जिवंत आणि व्यवहार मेलेले! मी बाजारात जातो, भाजी घेतो. मारवाड्याच्या दुकानात जातो, किराणा घेतो. मारवाडी जिवंत मी ही जिवंत. मी किराणा घेतो, मारवाडी पैसे घेतो. मी किराणा आणून स्वयंपाक करतो. मी जेवतो आणि जेऊन खाऊन अनंत दुःखाने तडफडत दिवस काढतो. चिंता करतो, कधी स्वतःची, तर कधीमधी जगाची. मारवाड्याचेही तेच होत असेल. म्हणजे व्यवहारातून जगणे होत नाही तर फक्त अस्तित्व जागवत ठेवणे एव्हढेच होते. याला जगणे म्हणत नाहीत. तर मेलेलं जगणे म्हणतात.

मनुष्य जर पुढेही असंच मेलेले जगणे जगू लागला तर या महामरणाची केवढी दुर्गंधी वाढेल? आधीच एवढे मेलेले लोक, त्यात नव्या मेलेल्या पिढ्या भरती झाल्या तर या जिवंत स्मशानाचे काय होईल? मरणात खरोखर जग जगते. अशा ओळी कुणीतरी मराठी कवीने लिहून ठेवल्या आहेत. हा कवी गेल्या शतकाच्या पूर्वार्धात जन्मला असावा. कारण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत असे तत्वज्ञानाच्या अंगाने खूप लेखन झाले आहे. नंतर हळूहळू ज्ञान संपून माहितीचे युग सुरू झाले. हा कवी मार्क्सवादी किंवा कळत नकळत बुद्धाचा अनुयायी असण्याची श्यक्यता ज्यास्त आहे. कारण त्याला सृष्टीचे dailactics कळले होते. मरणातून जग निर्माण होते आणि जीवनातून मरण निर्माण होते हे त्याला कळले होते. मला त्यापलीकडचा प्रश्न पडला होता. मूळ काय आहे? मरण की जीवन? सृष्टीचा मूळ स्वभाव काय आहे, तर खूप अभ्यास केल्यावर कळले की जीवन आणि मरणापल्याड नैसर्गिकरित्या विस्ताराने हाच सृष्टीचा मूळ स्वभाव आहे. नैसर्गिकरित्या विस्ताराने म्हणचे आनंदाने विस्ताराने दुःखाने कोणतीच गोष्ट विस्तारत नाही उलट ती आकुंचन पावते. सृष्टीचे विस्तारत राहणे म्हणजे आनंदाने बागडत नाचत हसत खेळत विस्ताराने. मग सृष्टीचा मूळ स्वभाव जर आनंद आहे तर त्याच सृष्टीतून निर्माण झालेल्या माणसाचा नैसर्गिक मूलस्वभाव दुःख असू शकत नाही. म्हणजेच आनंद नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे तर दुःख कृत्रिम आणि घडवून आणलेले आहे!

साधारण वीस लाख वर्षांपासून आपण मानव प्राणी म्हणून या विश्वाचा भाग आहोत आणि गेल्या काही हजार वर्षांत आपण संस्कृती वैगेरे घडवली. इमारती वगैरे बांधल्या. शेती वगैरे केली. कपडे वगैरे घातले. लग्नेवगैरे केली. धर्म वगैरे निर्माण केलं. देव वगैरे देवळात आणले. चंद्रावर वगैरे गेलो. मंगळ वगैरे पादाक्रांत करण्याचे ठरविले. यालाच आपण प्रगती वगैरे म्हणलो. आपणच आपली पाठ वगैरे थोपटून घेतली. पण ज्या पायावर आपण हे उभे केले त्याबद्दल कधी खोलात बोललो नाही.

काय आहे हा पाया??

ज्या निसर्गाच्या कुशीतून आपण जन्म घेतला त्याला ओरबाडून खाऊन झाल्यावर त्याला सोडून आपण खूप पुढे आलो आहोत. जरा मागे वळून पहा. त्याचा स्वभाव बघा, एका जातीची झाडे एकत्र येऊन दुसऱ्या जातीच्या झाडावर हल्ला करत नाहीत. भूक लागली तरच अन्न साखळीचा भाग म्हणून एक प्राणी दुसऱ्याला खातो. पण भूक नसेल तेव्हा एकाच पाणवठ्यावर एकत्र पाणी पितात ते निसर्गाच्या नियमानुसार जगतात मरतात. कुणीही कितीही ताकदवान असला म्हणून आपली मालमत्ता साठवत नाही. माणूस पण काही लाख वर्षे असाच सुखाने जगाला असे मानववंशशास्त्र तज्ञांचे मत आहे. मग माणसाने अशी कोणती मोठी चूक केली? आणि त्याच्याभोवती हा दुःखाचा घेरा पडला?

निसर्गातील इतर प्राण्यांपासून वेगळे होतना त्याने खाजगी मालमत्ता नावाच्या जालीम विषाचे इंजेक्शन स्वतःला टोचून घेतले किंवा प्राप्त परिस्थितीने त्याला ते टोचले आणि इथूनच सगळा खेळ बिघडला. पायाने चालणारे जीवन डोक्याने चालू लागले. तृष्णा वाढली. ती खाजगी मालमतेतून वाहू लागली. धर्मशास्त्राने मानवात सहा विकार आहेत असे सांगितले. पण त्या सहा विकाराच्या मुळाशी खाजगी मालमतेच्या विषाची नदी वाहत आहे. हे धर्मशास्त्र सांगत नाही कारण ते सारे धर्मसुद्धा खाजगी मालमत्तेचे रक्षण करण्यासाठीच जन्माला आले आहेत.

सर्वप्रकारच्या भेदाची जननी खाजगी मालमत्ता आहे. मग तो वर्ण असो वर्ग असो. जात असो की लिंग असो. याच खाजगी मालमतेच्या पायावर आपण आपण सगळी व्यवस्था उभी केली आहे म्हणून आपले जीवन दुःखाने घेरले आहे. कोणतेच मानवी संबंध प्रेमावर आधारित नाहीत. मग अगदी तुमचे रक्ताचे संबंध असणारे कुटुंब असो, ज्यांच्याबरोबर आपला रोजचा संबंध येतो तेच नाते जर खाजगी मालमतेच्या पायामूळे सडलेलं असेल तर मग बाकी संबंधांचे काय घेऊन बसलात.

जातीचे, धर्माचे, पक्षांचे जे काही तुमच्याशी संबंध निर्माण होतात ते तर चोर आणि लुटारूचे संबंध असतात. याच पायावर उभी असली सरकारे तर हिंसेच्या महानद्यांचे उगमस्थान आहेत. एकूण काय तर मानव समाज ज्या पायावर उभा आहे त्याची पाया खाजगी मालमत्तेने भराला आहे. त्यामुळे जेवढा विकास होतो आहे त्याच्या कितीतरी पटीने विकार वाढत आहेत. आणि विकार आनंद देणार नाहीत. उलट विकार दुःखाला जन्म देतात.

मानव प्राण्याने सुखाच्या जीवनाला दुःखाचा बिबवा चोळला आहे आणि त्या बिबव्याचे रक्षण या समाजातील उच्च वर्ग, उच्च वर्ण आणि पुरुषसत्ता करते. साहजिकच ते डोक्यावर उभे आहेत म्हणून प्रथम त्यांना पायावर उभे केले पाहिजे. त्यासाठी लढा आणि चळवळी उभ्या केल्या पाहिजेत. आनंद हाच सृष्टी हा मूलस्वभाव आहे. माणसाने त्याचा मूलस्वभाव दुःखी केला आहे. म्हणून सर्वात प्रथम मानवी समाजाला नियंत्रित करणारे सगळे वर्ग, वर्ण, जाती समग्र मानव समाजाचे शत्रू आहेत. हे समजून घ्या, आणि जमेल तसे जमेल त्या मार्गाने त्याच्या विरुद्ध लढा!

- लोकशाहीर संभाजी भगत

Similar News