'राजर्षी'!

Update: 2018-06-26 06:12 GMT

राजघराण्याचे वारसदार म्हणून कायमच सुख-ऐश्वर्याच्या पायघड्यांवरून चालणारे कित्येक छोटे-मोठे संस्थानिक भारतात झाले. पण सदैव रयतेचाच विचार करून समाजाच्या कल्याणासाठीच हयात घालवलेले जे संस्थानिक झाले, त्यापैकी छत्रपती शाहू महाराज हे एक. त्यांचा आज जन्मदिन.

शाहू महाराजांचा जन्मदिन ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. या दिवशी कोल्हापूरमध्ये आणि अन्यत्र काही ठिकाणी बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात.

चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे १८८४-१९२२ या काळात छत्रपती होते.त्यांचा जन्म १८७४ साली आजच्या दिवशी कागल तालुक्यातील घाटगे कुटुंबात झाला. त्यांचे नाव यशवंत. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

बहुजन समाजासाठी महाराजांनी केलेल्या अथक परिश्रमांना तोड नाही. त्यांनीच कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.

अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत त्यांनी बंद त्केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.

वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात घडले.

‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता.

राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

बलोपासनेकडे त्यांचे विशेष लक्ष असे. त्यांच्या प्रयत्नांनी अनेक आखाडे सुरू झाले; ते आजही चालू आहेत. कोल्हापूरला त्यांनी कुस्तीची पंढरी बनवले.

महाराजांनीच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.

शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने बहाल केली. ती सार्थच होती.

गरीब-श्रीमंत वा कोणताही जातीभेद न पाळता समाजातील नडलेल्या, पिचलेल्या बहुजन समाजाच्या दीर्घ पल्ल्याच्या कल्याणासाठी ते काम करत राहिले. 'छत्रपती' असले तरी त्यांची राहणी साधीच होती. दररोज ते संस्थानातील शेकडो लोकांना भेटत व त्यांच्या अडचणींचे निराकरण करीत.

दिल्लीत संसदगृहाच्या प्रांगणात त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. १८ फेब्रुवारी २००९ रोजी या पुतळ्याचे अनावरण तेव्हाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले, त्या कार्यक्रमास संसद सदस्य म्हणून उपस्थित राहता आले, हे माझे भाग्य.

Similar News