जवान घडवणारा जवान

Update: 2020-07-27 11:17 GMT

जवान आणि किसान ही राष्ट्राच्या रथाची दोन चाके आहेत. यातील एक चाक जरी निखळून पडले. तरी राष्ट्ररुपी रथ कोलमडल्याशिवाय राहणार असे म्हटले जाते. सांगली जिल्ह्यातील निंबळक या गावाच्या माळावर आल्यावर एका बाजूला आपल्याला हिरव्यागार शेतात देशासाठी शेतमाल उत्पादित करणारे शेतकरी दिसतील. तर याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला या गावातील निवृत्त जवान शरद पाटील हे देशसेवेसाठी भावी जवान घडवताना दिसतील.

गेली अनेक वर्षे ते त्यांच्या परीसरातील मुलांना निःशुल्क आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण देत आहेत. यासाठी ते कोणतेही शुल्क घेत नाहीत. मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना ते सांगतात की...

‘माझ्या बावीस वर्षाच्या लष्करी सेवेच्या कालखंडात गावात केवळ दोन विद्यार्थी भरती झाले होते. ही खंत त्यांना सतावत होती. त्यांनी प्रशिक्षणाला सुरवात केल्यापासून हा आकडा आता काही वर्षात सात वर गेला आहे.’ गेल्या बावीस वर्षात तरुणांच्या मानसिकतेत काही बदल दिसत नव्हता. तरुणांची व्यसनाधीनता यामुळे ते निराश होते. ते सांगतात…

‘कारगिल वॉर मधून जिवंत घरी परतलो… हे माझं नशीब समजतो. यातून वाचलेल्या माझ्या आयुष्यात देशसेवेकरीता आणखी योगदान द्यायचं. मी ठरवलं यातून मी हा उपक्रम सुरू केला’. या उपक्रमासाठी त्यांनी अण्णा हजारे यांच्याकडून प्रेरणा घेतली.

निंबळक गावाच्या माळावर त्यांनी अगदी मोजक्या साधनांमध्ये आपले हे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी ते दररोज मुलांना प्रशिक्षण देतात. यासाठी त्यांनी आतापर्यंत भरती झालेल्या मुलांची मदत घेतली आहे. येथून भरती होऊन तरुण गेला की, पुन्हा गावी सुट्टीला आल्यावर तो त्याचा वेळ या कामाकरीता देत असतो.

शरद पाटील यांच्या या उपक्रमामध्ये आता मुलांचा सहभाग वाढत असून अनेक तरुण या मैदानावर घाम गाळत आहेत. यातील मुले आता लष्करी सेवेत भरती होत आहेत. आजपर्यंत देशाला शेतीतून अन्न धान्य पुरवणाऱ्या या परिसरातून आता देशासाठी जवान देखील तयार होत आहेत. हे भारताच्या भविष्यासाठी आनंददायी चित्र आहे.

Similar News