देणं समाजाचं...

Update: 2020-06-09 11:18 GMT

कोरोनाबाधित झाल्यानंतर आलेले अनुभव खरंच न विसरण्या जोगे आहेत. (अविस्मरणीय हा शब्द मुद्दामून वापरत नाहीये कारण ते आजारपपण होतं). तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अनेकांचे फोन येत होते.(काहींनी तर माझ्यासाठी नवसही केले, तर काहींनी माझे फोटो मागवून रेकी सुध्दा दिली होती.) माझ्या बरं होण्याचं श्रेय मी जितकं होमियोपॅथी, आर्युवेदाला दिलं तितकंच ते प्रार्थनेलाही देतो. मी हॉटल आयसोलेशन मध्ये असताना सोसायटीतल्या सदस्यांसोबत नातेवाईक आणि मित्रांनी फक्त माझीच नाही तर माझ्या परिवाराची सुद्धा काळजी घेतली होती. काय हवं ? काय नको ? हे पहात होते. वेळोवेळी तब्येची विचारपूस करण्यासोबत घरच्यांना भाजीपाल्यापासून ते दुधापर्यंत सर्व गोष्टी कश्या व्यवस्थित मिळतील याचीही काळजी घेत होते.(यात फक्त जीवनावश्यकच गोष्टीच नाही तर जीभेचे चोचले पुरवणाऱ्या मासांहाराचा देखिल समावेश होता) त्यामुळे राहून राहून वाटत होतं की या मदतीची परतफेड कशी करायची ? पण अखेर ती संधी मिळालीच..

हॉटेल आयसोलेशममध्ये असताना प्लास्मा डोनेशन आणि त्याचं महत्व सांगणारी बातमी पाहिली, त्याचक्षणी निर्णय केला की बरे झाल्यानंतर आपणही प्लास्मा डोनेशन करायचं. माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडून बेसिक माहिती घेतली. डिस्चार्ज मिळाल्यानंतर किमान 21 – 28 दिवस वाट बघावी लागणार होती. घरी आलो. रुटीन सुरु झालं आणि अचानक 2 आठवड्यात नायर हॉस्पिटलमधून फोन आला. त्यांनी प्लास्मा डोनेशन बद्दल विचारलं आणि मी हसत हसत एका पायावर तयार झालो. (20 दिवस आयसोलेशनमध्ये काढल्यानंतर एका अर्थाने मीच कोरोना एक्सपर्ट झालो होतो,त्यामुळे डॉक्टरांनी काही विचारायच्या आधीच मीच त्यांना सांगत होतो), ‘अहो मला डिस्चार्ज मिळून फक्त 15 दिवसच झालेत 25 दिवसांनंतर करता येईल ना’. त्यावर डॉक्टरच म्हणाल्या ‘विचारुन कळवते.’

3 जूनला पुन्हा त्याच डॉक्टरांचा फोन आला, 2 वेळा नायर हॉस्पिटलमध्ये जावं लागणार होतं. पहिल्या दिवशी काही बेसिक टेस्ट होणार होत्या, त्याचे रिझल्ट आल्यानंतर मुख्य चाचणी फेरेसिस म्हणजे , कॉन्व्हलेसंट प्लास्मा डोनेशन.. 5 जूनला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची शिफ्ट संपण्याआधी पोहचायचं होतं त्यामुळे, बुलेटीन आटोपून निघालो. हॉस्पिटलमध्ये पोहचताच ‘सरकारी रुग्णालयाचा’ पुरेपुर अनुभव आला, मात्र तरीही एक चांगलं काम करता येणार होतं, त्यामुळे बाकींच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत ब्लड बँकेत पोहचलो. थोड्या वेळात बल्ड टेस्ट करण्यासाठी ट्रेनी डॉक्टर आल्या. रक्ताचे 6 वेगवेगळे नमुने घेतले गेले, सर्व व्यवस्थित पार पडलं, निघताना ब्लड बँकेचे असिस्टंट प्रोफेसर, डॉ. रमेश वाघमारे यांच्याशी बोलणं झालं. डॉक्टर म्हणाले, ‘रिपोर्ट्स आल्यानंतर तुम्हाला पुढच्या आठवड्यात बोलावतो.’ एक तर वर्क फ्रॉम होम असल्याने बुलेटीन्स मधून सुट्टी घेणं कठीण होतं, त्यात मला स्वत:ला प्लास्मा डोनेशन करण्याची प्रचंड इच्छा होती, कोणताही अडथळा यायला नको म्हणून मीच डॉक्टरांना सांगितलं, ‘मी उद्या सुट्टी घेतलीये, नंतर सुट्टी नाही मिळणार, तेव्हा उद्याच झालं तर बरं होईल.’ डॉक्टरही सकारात्मपणे म्हणाले, ‘तुमची सुट्टी फुकट जाणार नाही याची पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न करु’.

घरी परतलो. एका स्वप्नपुर्तीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली होती, मात्र सर्वात मोठा अडथळा होता तो रिपोर्ट्स. जोपर्यत रिपोर्ट्स नॉर्मल येत नाहीत तोपर्यत प्लास्मा डोनेशन करता येणार नव्हतं. रिपोर्ट्स नॉर्मल येण्यापेक्षा प्लास्मा डोनेट करता यावं यासाठी अक्षरक्ष: देवाला प्रार्थना केली, दिवा लावत पुजा सुध्दा केली. नेहमीप्रमाणे दिवस संपला. शनिवारी सुट्टीच होती, त्यामुळे आरामात अकरा - साडे अकराला उठलो.. मात्र जो उठलो तो एकदम ताडकनच, कारण डॉक्टर सकाळी दहा – साडेदहाला फोन करणार होते आणि वेळ सांगणार होते. पावणे बारा झाले तरी त्यांचा फोन आला नव्हत्या त्यामुळे पुन्हा धाकधूक वाढू लागली होती.

चहा घेत असतानाच डॉक्टरांचा फोन आला,. ‘तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत तुम्ही प्लास्मा डोनेट करू शकता, फक्त गाडीची अडचण आहे जशी गाडी मिळेल तसा मी तुम्हाला कळवतो. आदल्या दिवशी अवघ्या 15 मिनीटांत ड्रायव्हरच्या नावासकट मेसेज आला होता. आज मात्र अर्धा तास झाला... एक तास झाला मात्र गाडीचा अद्याप पत्ता नव्हता. शेवटी मनाशी ठरवलं की आपणच ड्राईव्ह करत जाऊया आणि प्लास्मा डोनेट करून येऊया पण, नंतर पुन्हा लक्षात आलं की रक्तदानानंतर ड्रायव्हिंग करायचं नसतं त्यामुळे डॉक्टर परवानगी देणार नाहीत. थोड्याच वेळात डॉक्टरांचा फोन आला आणि त्यांनी ड्रायव्हरचा नंबर पाठवला. ड्रायव्हरला यायला साधारण अर्धा ते पाऊण तास लागणार होता. त्या वेळेत माझी तयारी करून घेतली.

मुळातच हॉस्पिटलटचं नाव काढलं की अंगावर काटा येतो, सरकारी हॉस्पिटलचा विचार तर करवतंच नाही आणि त्यातही सरकारी कोविड रुग्णालय म्हटलं की अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही मात्र नायर या सरकारी कोविड रुग्णालयात जाताना माझं मन आनंदून गेलं होतं. हॉस्पिटलमध्ये पोहचण्याआधीच वरिष्ठ डॉक्टर हजर होते. त्यांनी मला माझ्या रिपोर्टबद्दल माहिती देतानाच प्लास्मा डोनेशनची माहिती आणि महती सांगताना माझं अभिनंदन केलं.त्यात AB + रक्तगटाची प्लास्मा मिळते हे कळल्यावर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

प्लास्मा डोनेशनला सुरुवात झाली. आत्तापर्यंत मी अनेकदा रक्तदान केलंय,मात्र प्लास्मा डोनेशन पहिल्यांदाच.त्यामुळे ते नेमकं कसं होतं याची ही प्रक्रिया समजून घेत होतो.रक्तदानात आपल्या शरीरातून जवळपास 350 मिलीलीटर रक्त काढलं जातं. मात्र प्लास्मा डोनेशन मध्य साधारण 650 मिलीलीटर, मात्र इतकं रक्त शरिरातून काढणं योग्य नसल्याने रक्तातले घटक काढून उर्वरित रक्त आपल्या शरिरात परत सोडलं जातं. ब्लड फ्लो चांगला असेल तर अक्षरक्ष: अर्ध्या तासात ही प्रक्रिया अगदी सहजपणे पूर्ण होते. डॉ. वाघमारे, डॉ. नितिन वळवी, डॉ आशिष मिश्रा यांच्या सोबत चांगल्याच गप्पा रंगल्या.या गप्पांमध्ये एक गोष्ट कळली, जी माझ्यासाठी आनंदाची बातमी होती, ती म्हणजे मला पुन्हा पंधरा दिवसानंतर प्लास्मा डोनेशन करता येणार होतं. पहिल्या डोनेशनची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर पुढच्या प्रक्रियेची वेळही मनातल्या मनात ठरवून घेतली होती.

अवघ्या पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा प्लास्मा डोनेट करता येणार होतं हे कळल्यावर प्रचंड आनंद झाला होता. देशात, राज्यात, मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढते आहे अनेक रुग्ण बरे होत आहेत, मात्र प्रकृती खालावलेल्या आणि मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांसाठी प्लास्मा डोनेशन हे वरदान ठरु शकणार आहे. त्यामुळे मी केलेल्या प्लास्मा डोनेशनमुळे किमान काही रुग्णांचा जीव वाचू शकेल आणि ते मृत्यूच्या दाढेतून परत येऊन सर्वसामान्य माणसांप्रमाणे आपलं जीवन ही जगू शकतात. ही भावना.. हा विचारच मनाला सुखावून जात होता.

मी कोरोनाबाधित झाल्यानंतर व्हीडीओ, लेखांच्या माध्यमातून व्यक्त झालो होतो. ते लेख, व्हीडीयो तुम्ही मोठ्या प्रमाणात लाईक करत शेअरही केले होते. मात्र आज माझी मनापासून इच्छा आहे की हा अनुभव तुम्ही मोठ्या संख्येने शेअर करावा म्हणजे आपल्या परिसरात जे कोरोनाबाधित रुग्ण होते, आहेत जे पूर्णपणे बरे झाल्यानंतर प्लास्मा डोनेशनसाठी पुढाकार घेतील. ज्याचा फायदा आपल्याला , राज्यावर आणि देशावर आलेलं कोरोनाचं संकट परतवून लावण्यामध्ये होईल.

आधी म्हटल्याप्रमाणे मी ज्या समाजात रहातोय, त्या समाजाचं देणं लागतोय आणि प्लास्मा डोनेशनच्या माध्यमातून हेच देणं चुकवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत समाजाच्या ऋणातून उतराई व्हायचा प्रयत्न करतोय. हा लेख वाचून, फोटो किंवा व्हीडीयो पाहून किमान काही जणांनी जरी प्लास्मा डोनेशन, प्लेटलेट डोनेशन किंवा रक्तदान जरी केलं तरीही या लेखाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल..

तुषार शेटे, पत्रकार

Similar News