International nurses Day Special: परिचारिकांचे ज्ञान, कौशल्य, अनुभव आणि संयम पणाला लावणारा क्षण

१२ मे, हा जागतिक नर्स दिन म्हणून साजरा केला जातो. 2020-21 हे दोन वर्ष आरोग्य सेविकांसाठी आव्हानात्मक आहे. जगभरातील डॉक्टर कोव्हिड-१९च्या आव्हानाचा सामना करण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत. महाराष्ट्र ट्रेन्ड नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष सुरेखा सावंत यांनी मांडलेलं मनोगत

Update: 2022-05-12 07:09 GMT

जागतिक आरोग्य संघटनेने 2020 हे वर्ष आंतरराष्ट्रीय परिचारिकांचे वर्ष असं जाहीर केलं. आधुनिक परिचर्या व्यवसायाच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या १२ मे 2020 रोजी साजऱ्या होणाऱ्या 200 व्या जयंतीनिमित्त, जगाने परिचर्या व्यवसायाची दखल घेऊन विविध कार्यक्रमातून या व्यवसायाची ओळख दिली जी आजपर्यंत प्रलंबित होती.

जगभरातील नर्ससाठी २०२० हे वर्ष महत्त्वाचं होतं. पण, बहुदा नियतीला आम्ही या वर्षात सर्वात मोठ्या संकटाचा सामना करावा अशी इच्छा होती. त्यामुळे आमच्यासमोर कोव्हिड-१९ नावाचं एक संकट उभं केलं. या संकटाला जणू आमची आणि कुटुंबीयांची परिक्षा घ्यायची होती.

परिचर्या वृत्तीची आणि व्यावसायिकतेची परीक्षा घेणारा क्षण जगभरातील नर्ससमोर येणार, याची कोणालाही सुतराम कल्पना नव्हती. जो क्षण परिचारिकांचे ज्ञान, कौशल्य, अनुभव आणि संयम पणाला लावणार होता. तो जणू विचारत होता. तुम्ही तयार आहात का?

ही महामारी यापूर्वी कोणी-कधीच पाहिली नव्हती. याच्या व्यवस्थापनाचा अनुभवही नव्हता. परिस्थिती फारच गंभीर होती. सरकारने अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरुवात केली. पण अनेक धडे शिकायला मिळणार होते.लॉकडाऊन घोषित झालं आणि जनसामान्यांच्या मनात खूप गोंधळ, गडबड, शंका निर्माण झाल्या. याचा सगळ्यात जास्त परिणाम आरोग्य व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांवर झाला. कारण त्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून कामाच्या ठिकाणी प्रवास करायचा होता.

वाहतूक व्यवस्था ठप्प होती. संपूर्ण शहर निष्क्रिय झालं होतं. अशावेळी BEST बस मदतीला धावून आली आणि आरोग्य व्यवस्थेला संजीवनी मिळाली. परिचारिका आपल्या सेवेत कटिबद्ध होत्या, पण सेवा देऊन घरी परत जाणं त्यांच्यासाठी कठीण झालं होतं. याचं कारण म्हणजे शेजारी, सोसायटीतील रहिवासी परिचारिकांकडे 'कोरोना बॉम्ब' म्हणून पहात होते.

परिचारिकांना धमकावण्यात आलं, शिव्याशाप दिले गेले. या सर्वामुळे परिचारिकांचं मनोधैर्य खच्ची होत होतं. पण, तरीही या सर्वावर मात करत त्या पुन्हा नवीन उत्साहाने कामाला लागल्या. पण, अडचणी संपत नव्हत्या. आता प्रश्न उभा राहिला होता स्वसंरक्षण साहित्याच्या उपलब्धतेचा. अशावेळी राज्यातील नर्सेसची संघटना म्हणून विविध स्वसंरक्षण साहित्य उत्पादकांचा शोध सुरू केला. पण संपूर्ण लॉकडाऊन घोषित झाल्याने विविध संस्थांची स्वसंरक्षण साहित्याची मागणी पूर्ण करणे कठीण झालं.

जगभरात कोव्हिड १९मुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचं जीवन धोक्यात आलं आहे. काही आरोग्य कर्मचारी मृत्यूमुखी पडले तर, अनेकांना आपलं कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाली. अमेरिकेसारख्या प्रगत देशात २० टक्के, तर इटलीत एकून कोव्हिड-१९ केसेसपैकी ९ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांच्या होत्या.

या देशात अत्याधुनिक पद्धतीची आरोग्य व्यवस्था उपलब्ध आहे. पण, तरीही त्या देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, अपुरे पीपीई किट्स, टेस्टिंग किट्सची कमतरता आणि अनेक गोष्टी आहेत. ज्यांचा प्रश्न गंभीर आहे. ही परिस्थिती भयावह नक्कीच आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या विभागात माल पाठवण्यात आला. वाहतूकीचा मोठा प्रश्न होता. शेवटी १५ दिवसानंतर महाराष्ट्र राज्य शाखेला हा माल मिळाला आणि तो शासकीय व निमशासकीय रुग्णालयातील मेट्रन आणि नर्सिंग स्टाफ मध्ये वाटण्यात आला.

आंतरराष्ट्रीय परिचर्या दिनाचे घोषवाक्य आहे 'जगाची सुश्रृषा', जे सद्यस्थितीत घडत आहे. त्यात परिचारिका खऱ्या अर्थाने इतर वेळेपेक्षा जास्त जगाची सुश्रृषा करीत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर जाऊन लढाईतील योद्ध्याप्रमाणे कर्तव्य बजावत आहेत. आणि हो जर आपण आपले ज्ञान, कौशल्य, संयम परिश्रम इत्यादींचा निर्णायक विचार केला तर मला खात्री आहे की, आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने आपला व्यवसाय ज्यापासून वंचित आहे. तो आदर, सन्मान, आर्थिक व्यवहार्यता, व्यवसायातील उत्तम संधी या सर्वांत बदल होण्याची वेळ आली आहे.

जगातील कारण कोणताही देश परिचारिकांच्या सहभागाशिवाय उत्तम आरोग्य मिळवू शकत नाही. परिचारिका ह्या ओझं नसून देशातील आरोग्य संस्थेची शक्ती आहेत. निरोगी देश तेव्हाच होईल जेव्हा परीचारीका निरोगी असतील. मला खात्री आहे. जर हा परीक्षेचा क्षण आहे तर परिचारिका ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

परिचर्या संघटना म्हणून परिचारिकांच्या समस्या म्हणजे आमच्या समस्या आहेत. संघटना सातत्याने सरकार, माननीय आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री कार्यालयात लेखी समन्वय साधत असून त्यांनी दखल घेतलेल्या पत्रांचा पुढील कार्यवाहीसाठी पत्रव्यवहारही करत आहोत.

महाराष्ट्र ट्रेन्ड नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष सुरेखा सावंत

Tags:    

Similar News