तेच चेहरे, तीच घराणी...

Update: 2019-10-26 08:57 GMT

'पार्टी विथ डिफरन्स' म्हणणा-या पक्षाने पुण्यामध्ये तेच चेहरे आणि तीच घराणी पोसण्याचा मक्ताच उचलल्यासारखे चित्र आहे. निवडणुकीत काही ठिकाणी फटका बसलाय आणि जवळपास सर्वच ठिकाणी अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळालेले नाही. त्याला अनेक कारणं आहेत. त्यामध्ये 'तेच चेहरे, तीच घराणी' हे देखील एक कारण निश्चितच आहे.

- स्वतः आमदार आणि भाऊ नगरसेवक. नंतर भाऊ स्थायी समिती अध्यक्ष... आता स्वतः पराभूत होऊन घरी...

- स्वतःदोनदा राज्यमंत्री, भाऊ सातत्याने नगरसेवक. नंतर भाऊ स्थायी समिती अध्यक्ष. आणि आता भाऊ आमदार. कदाचित जातीच्या गणितामुळे भाऊ राज्यमंत्रीही होणार...

- स्वतः आमदार, त्याआधी स्वतःही नगरसेवक, आई अनेक टर्म नगरसेविका. जातीय समतोल राखण्यासाठी त्यांना युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष. यंदा पुन्हा तिकिट आणि आता घरीच बसणार...

- वडील अनेक टर्म नगरसेवक, पुण्यनगरीचे माजी खासदार, स्वतः पहिल्यांदाच नगरसेवक आणि आता नगरसेवकपदाच्या अडीच वर्षांच्या अनुभवावर स्वतः आमदार...

- स्वतः चार टर्म नगरसेविका, पुण्यनगरीच्या महापौर... आणि आता आमदारकी...

- दिवंगत यजमान अनेक टर्म नगरसेवक, नंतर स्वतः नगरसेविका, मग दोन टर्म आमदार, आता पुन्हा एकदा आमदार, कदाचित मंत्रिपदही, शिवाय शहराध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच...

आमची 'पार्टी विथ डिफरन्स' आहे. त्यामुळे आमची घराणेशाही एकदम 'डिफरन्ट' आहे. आम्ही त्याच त्याच चेह-यांना आणि घराण्यांना कायम संधी देतो... संघटनेतही देतो आणि निवडणुकीतही देतो... आणि आम्ही विरोधी पक्षांच्या नावाने खडे फोडणार.

वेळीच सुधरा... जनता जागी आहे. तिला गृहित धरू नका. ६-२ झालेय. ३-५ होता होता वाचलंय. तुम्ही सुधारला नाहीत तर ती तुम्हाला नक्की सुधरवेल... महापालिका आहेच दोन वर्षांनी...

-आशिष चांदोरकर

Similar News