महात्मा फुल्यांना देशद्रोही म्हणणारे भिडे मोदी फडणवीसांचे लाडके कसे? : प्रा. हरी नरके

Update: 2020-04-29 14:34 GMT

२००७ साली मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा फुल्यांवर गरळ ओकली. सनातन प्रभातमध्ये बातमी आली की, महात्मा फुले हे देशद्रोही होते. असे भिडे म्हणाले. ही मुक्ताफळे प्रकाशित झाल्यानंतर मी काही लोकांशी बोललो. ओबीसी म्हणजे तमाम थंड आणि बत्थड लोक. कोणाचीच काहीही प्रतिक्रिया दिसली नाही.

त्याच दिवशी मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरूषोत्तम खेडेकरांचा निवृत्तीसमारंभ होता.त्यांनी आग्रहाने बोलावले म्हणून मी गेलो. पुण्याच्या अल्पबचत भवनमध्ये निरोप समारंभ होता. कार्यक्रमाला त्यावेळचे शिक्षण मंत्री वसंत पुरके, [काँग्रेस] राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे, [राष्ट्रवादी] भाजपाचे पांडुरंग फुंडकर, आय.पी.एस. अधिकारी विश्वास नांगरे पाटील असे अनेक दिग्गज मंचावर उपस्थित होते. माझ्या भाषणात मी मनोहर भिड्यांच्या महात्मा फुले विषयक संतापजनक वक्तव्याचा ती बातमी सर्वांना दाखवून जाहीर निषेध केला. मात्र, निरोपाच्या जल्लोशात त्यावर प्रतिक्रिया द्यायच्या मूडमध्ये कोणीही नव्हते.

मी नंतरही अनेकांशी बोललो. उपयोग झाला नाही. एकहाती लिहित राहिलो. बोलत सुटलो. ज्यांच्या विरोधात बोललो. लिहित होतो. त्या भिड्यांनी मात्र खुन्नस ठेवली.

बहुजन समाजाचं एकूण खूप कठीण प्रकरण आहे. जिथं जोतीराव-सावित्रीबाईंची सून [दत्तक पुत्र यशवंतची बायको] पुण्यात खडक माळ आळीत बेवारस म्हणून मेली. तिची मयत पुणे नगरपालिकेने केली. हाकेच्या अंतरावर जेधे मॅन्शन म्हणजे महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक चळवळीचे पुढे ब्राह्मणेतर चळवळीत रूपांतर झाले होते. त्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेते केशवराव जेधे यांचे निवासस्थान तसेच कार्यालय होते. तेव्हा १९३० साली चळवळ जोरात होती.

त्यांनी तिच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले असेल. असे मी म्हणणार नाही. नसेल आले लक्षात. तीही भिक मागून जगली. विनातक्रार मरून गेली. तिच्या पोटच्या लग्न झालेल्या मु्लीनं जिथं आईच्या दोन वेळच्या जेवनाची व्यवस्था केली नव्हती, तिथं इतर कुणी का मदतीला यावं ना? बहुजन समाज बिचारा आपापले संसार, देवदेव, बायकामुलांचे वाढदिवस आणि कशाकशात बिझी असतो. त्याला तरी काय दोष देणार ना? सगळे लोक रोजीरोटीच्या शोधात, संपुर्ण थंड, आत्ममग्न, स्वत:चा इतिहास माहित नसलेला, कोणतीही महत्वाकांक्षा नसलेला, मुर्दाड समाज. बहुजन हा या पृथ्वीतलावरचा विलक्षण प्राणी आहे.

त्यांच्या मेंदूत निसर्गाने मेमरी इरेज [ डिलीट] केलेले सॉफ्टवेअर बसवलेले असल्याने त्यांना विस्मरणाचे अतोनात वरदान लाभलेले असते.

 

या देशात जे स्वत:ची जात सोडून राबतात, त्यांच्या मदतीला लोक येतात का? की घर का न घाट का अशी त्यांची अवस्था होते? फुल्यांचा किंवा शिंद्यांचा विषय निघाला की लोक म्हणतात, बघतील त्यांचे समाज. बघा ना महर्षि वि.रा.शिंदे यांना आपण किती सहज विसरलो. राजर्षि शाहू छत्रपतीही पंधरावीस वर्षांपुर्वीपर्यंत दु्र्लक्षितच तर होते.

फुलेही बाबासाहेबांनी जवळ केले म्हणून आज जे काही दिसतात. अन्यथा आजवर आपला समाज फुल्यांनं ठार विसरूनसुद्धा गेला असता. लोकांचंही काय चुकतंय? फुल्यांनी काय माळी महासंघ काढला होता? नाही ना! उलट माळी म्हणतात, त्यांनी आमच्यासाठी कुठं काय केलं? हे खरंय की फुल्यांनी एकट्या माळ्यांसाठी काहीच केलं नाही. कधीकधी वाटतं फुले तुम्हारा तो चुक्याच.

माणसानं कसं आपापल्या जातीपुरतं बघावं. खरंतर स्वत:पुरत बघावं. आपलं घर, आपला संसार. बायकापोरं. बाकी सगळं झूट. समाज, कृतज्ञता, भविष्य…, गये भाडमें. तर हेच आंबापुत्र, मनुसमर्थक मनोहर भिडे मोदी-फडणवीसांना परमवंदनीय आहेत. फडणवीस-मोदी पाच वर्षे महात्मा फुले यांना भारतरत्न द्यायचं गाजर दाखवित राहिले. २०१९ च्या निवडणुकीआधी फडणवीस सरकारनं म्हणे केंद्राला शिफारस केली, महात्मा फुले नी स्वा. सावरकरांना भारतरत्न द्या म्हणून. द्यायचं नव्हतंच. फक्त निवडणूक स्टंट करायचा होता. आजच एक मित्र सांगत होता, कोणा संघोट्या उपाध्यायनं म्हणे त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. एकट्या सावरकरांना भारतरत्न द्या. तो त्यांच्या सोबत नको.

 

Similar News