शिवशाही, पेशवाई आणि लोकशाही

Update: 2019-09-15 10:56 GMT

तमाम लोकहो,

उदयनराजे भोसले हे शिवाजीराजांच्या सारखे छत्रपती वगैरे नाहीयेत, ते एक पूर्वाश्रमीच्या संस्थानातले एक वंशज आहेत. शिवाजीराजांचा काळ 1630 ते 1680 असा होता, पण त्या काळात "महाराष्ट्र" नावाची संकल्पनाच नव्हती. 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालेले आहे आणि त्यानंतर वल्लभभाई पटेलांनी इथले सगळे संस्थानं खालसा केलेली आहेत, ज्यात सातारा आणि कोल्हापूर ह्या मराठा साम्राज्याच्या दोन्ही गाद्याही होत्या. महाराष्ट्र 1 मे 1960 ला निर्माण झाला आणि त्याच्या निर्मितीत कुठल्याही संस्थानिकांचं नव्हे तर इथल्या सर्व समाजातून, सर्व राजकीय विचारधारेतून आलेल्या नेत्या आणि कार्यकर्त्यांचं सामायिक कर्तृत्व आहे.

उदयनराजे हे सध्या एक लोकप्रिय खासदार म्हणजेच लोकप्रतिनिधी आहेत. खासदार म्हणून मिळणारे काही विशेष अधिकार आणि कर्तव्ये सोडली तर त्यांच्यात आणि इतर कुठल्याही भारतीय माणसात काहीही फरक नाही आणि त्यांना जे विशेष अधिकार खासदार म्हणून आहेत ते देशातल्या 800 हून अधिक खासदार लोकांनाही आहेत, त्यामुळे त्यात विशेष काही नाहीये. बाकीच्या खासदारांना जशी शपथ घ्यावी लागते तशी त्यांनाही घ्यावी लागते, लोकसभेतही त्यांना वेगळी आसनव्यवस्था (सिंहासन वगैरे) नसते आणि तिथे पहिल्या रांगेत पण बसायला मिळत नाही. त्यामुळे उदयनराजे भोसले यांना एक राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी यापेक्षा जास्त वेगळे स्थान कायद्यात, संविधानात आणि संसदेत नाहीये. थोडक्यात उदयनराजे सध्या 'शिवशाही'चे शासक नाहीयेत. कोल्हापूरचे लोक हेच सगळं वर्णन त्यांच्या खासदारांसाठी नाव बदलून वाचू शकतात.

आता जसे सध्याचे उदयनराजे किंवा संभाजीराजे हे जसे 'शिवशाही'चे शासक नाहीयेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही 'पेशवाई' चालवत नाहीयेत. देवेंद्र फडणवीस एक हुशार राजकीय नेते आहेत आणि निर्वाचित लोकप्रतिनिधी आहेत. ते फक्त ब्राम्हण समाजात जन्मले म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकारला 'पेशवाई' म्हणणे म्हणजे मूर्खपणा आणि जातीयवादी मानसिकता आहे. फडणवीसांचा पक्ष किंवा राजकीय विचारधारा ज्या मतांचा पुरस्कार करते त्याच्याशी मी अजिबात सहमत नसलो तरी गेल्या 10 वर्षांपासून दिसत आलेले त्यांच्यातले नेतृत्वगुण मी कधीच नाकारणार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात राणेंचा अपवाद वगळता बाकीचे सगळे मुख्यमंत्री मला आवडतात, कारण ते सुसंस्कृत आणि लोकशाही मार्गाने चाललेले आहेत.

देवेंद्र फडणवीसांना 'पेशवा' आणि उदयनराजेंना 'छत्रपती' समजून "ही उलटी गंगा कशी वाहिली?" अशा विचाराने त्रस्त झालेले लोक अजूनही 17 व्या शतकातल्या जातीयवादी आणि सरंजामी व्यवस्थेत जगत आहेत. या देशात सध्या लोकशाही आहे आणि इथे देवेंद्र फडणवीस, उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले या तिघांची किंमत समान आहे! आणि हो माझीही किंमत या तिघांपेक्षा थोडीही कमी नाही आणि जास्त नाही. बाकी भविष्यात मी खासदार किंवा मुख्यमंत्री वगैरे झालो तर तुम्हाला त्रास खूप होईल कारण मला कसल्याचं भगव्या, निळ्या, पिवळ्या आणि हिरव्या रक्ताचं, बाण्याचं, इतिहासाच आणि अस्मितेचं केळं कौतुक नाहीये!

- डॉ. विनय काटे

Similar News