कोरोना आणि गावगण्णा पुढाऱ्यांचा उन्माद...

Update: 2020-05-24 03:32 GMT

मुंबई, पुण्यात सध्या कोरोनाच्या साथीने थैमान घातल्याने शहरात पोटं भरण्यासाठी आलेली मंडळी तथा नोकरदार मंडळी आपल्या कुटुंब कबिल्यासह गावी निघालीत. अर्थात उद्देश हाच आहे की, कोरोनापासून जीव वाचावा. पण ई पास, सेपरेट गाडीघोडीची व्यवस्था अशा सगळ्या सतरा भानगडी करून तुम्ही बायका पोरांसकट गावच्या वेशीवर पोहोचलात की लागलीच गावातली चार उनाड पोरं आणि गावगण्णा पुढारी मंडळी आडवी येऊ लागलीत...

का तर म्हणे तुम्ही मुंबई पुण्याकडचे लोक शहरातून कोरोना घेऊन आलात... त्यामुळे तुम्हाला घरी जाता येणार नाही... तुम्हाला मंदिर किंवा शाळेतच क्वारनटाईन होऊन राहावं लागेल....

ठिक खबरदारी म्हणून नक्कीच चांगला उपाय हे पण ज्यांचं शेतावर स्वत:चं घर हे तिथं स्वतंञ राहण्याची सोय आहे. अशांना राहू द्या की, त्यांच्या किमान शेत वस्त्यांवर तरी.... तुमच्या बाचं काय जातंय त्यात... त्यांच्या घरचे अन् ते बघून घेतील की त्यांचं ते...

...पण नाही तुम्ही ग्राम पंचायत इलेक्शनच्या वेळेस इरोधी पार्टीत हुता काय मग? आता दाखवतोच गावकीचा इंगा.... हा असा सगळा प्रकार सध्या गावोगावी कोरोना क्वारनटाईनच्या आडून सुरू आहे... आणि मुळात सगळेच जण कोरोना घेऊन जातात. हे तुम्हाला कोणी सांगितलं... आणि समजा असेलही एखादा संशयीत.... त्याची लागलीच तपासणी करता येतेच की...

आता राहिला प्रश्न गावाकडच्या सोशल डिस्टंटचा तर... "होल वावर इज ऑवर...." गावाकडे तरी कुठे रोज बैलपोळा भरल्यागत गर्दी होत असते... पाहिजे तर या शहरातल्या मंडळींना काही दिवस गाववाल्यांसोबत मिसळू देऊ नका... पण आपल्याच गावात येऊन मंदिर किंवा शाळेत राहावं लागणं हे खूप वेदनादायी आहे...

तुम्ही पण त्यांच्याजागी जरा स्वत:ला ठेऊन बघा मग तुम्हालाही शहरी मंडळींचं दु:ख कळेल... बरं या गावाकडच्या शाळा, मंदिर बांधणीत शहरी मंडळीकडेच तुम्ही हक्काने वर्गणी मागता की नाही... तेही गाववाल्यांपेक्षा नक्कीच जास्त वर्गणी देत आलेत....कारण त्यांनाही हे गावं आपलंच वाटत आलंय...नव्हे त्यांचीही शेतीपोती घरं आहेतच की अजून गावाकडे... मग त्यांचाही गावावर तुमच्या इतकाच हक्क नाही का...? मग का बरं अशा संकटसमयी त्यांच्याशी असा दुजाभाव करता...आणि मुळात मुद्दा हा आहे की, क्वारनटाईन करण्याचा अधिकार हा आरोग्य विभाग आणि प्रशासनाचा आहे.

ग्रामपंचायतीचा नाहीच...... पण मनुष्यबळाअभावी प्रशासनाने ही जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपवली तरी तुम्ही मंडळी लागलीच जुने हिशेब चुकते करायला निघालात... हे बरं नव्हं गाववाल्यांनो.....तुम्हालाही दवाखाना म्हटल्यावर शहरातच यावं लागतंना... हे विसरू नका... मग अगदी शोधून शोधून नंबर काढताच की नाही शहरवाल्यांचे... कारण आजही आपण सगळे एकच आहोत म्हणूनच ना... किंबहुना नोकरी व्यवसायानिमित्त शहरात स्थायिक झालेले बहुतांश लोक आजही गावाकडच्या मतदारयादीतलं नाव काढून शहरात आणत नाहीत बरका...

एवढंच काय आधार कार्ड, रेशन कार्डसुद्धा गावाकडचीच आहेत... कारण त्यांना गावाकडची नाळ मुळात तोडायचीच नाहीये... किंबहुना निवृत्तीनंतरचं आयुष्य त्यांना गावातच घालवायचंय... मग हा आम्ही गाववाले तुम्ही शहरातले हा भेदभाव आत्ताच कुठून काढलात तुम्ही? आणि हो,... कोरोनाचं संकट काय आज उद्या जाईलही पण एकदा उसवलेलं नातं आणि दुभंगलेली मनं पुन्हा कधीच जुळत नाहीत... बघा विचार करून... उगीच कोरोना क्वारनटाईनच्या आडून गावाकडच्या माणुसकीला तिलांजली देऊ नका....

चंद्रकांत फुंदे

Similar News