कलाकारांच्या शोकांतिका नंतरची सुखांतिका !

Update: 2020-04-29 16:21 GMT

“व्हय, हे जग एक रंगमंच ये ! आसं शेक्सपियर बोलून गेलाय त्यात काय चुकीचं नाय राव..”

“तुला, अचानक काय झालं हे बोलायला ?..”

“काय नाय. जाऊदे. मग, बाकी काय चाललय ? कुठंयस सध्या ?..”

“अरे, तू काय डोक्यावर पडलाय का ?..”

“सॉरी-सॉरी. म्हणजे घरीच असशील. ते काय ये ना की, रोजचीच सवय झालेलीय ना. म्हणून..”

“काय झालंय तुला ?..”

“काही नाय. असच..”

“तू सांगणार ये का, ठेऊ फोन ?..”

“अरे ! त्रास होतोय रे खूप. छातीत बळच दुखल्यासारखं होतं. विचार करून मेंदू जड झालाय. खूप प्रश्न पडतायत. पण उत्तर मिळत नाही. भीती वाटते भविष्याची खूप...”

“पण का? अरे, घराशिवाय सेफ्टी जागा नाय दुसरी..”

“नाटक करायचय रे. तालीम करायचीय. सेट गाडीतून उतरवायचाय. चेहऱ्यावर रंग चढवायचाय. ड्रेपरी नं सजायचय. तिसरी घंटा कानावर पडली ना की पडदा उघडायच्या आत रंगमंचावर धाव घ्यायचीय ! आणि समोर तुडुंब भरलेला प्रेक्षक पहायचाय रे. पण दोन महिने झाले रंगमचाचं तोंड सुद्धा पाहिलं नाय रे. आरं येक दिवस म्हशीचं दूध नाय पेलं तर मोडशी होऊन वांत्या करायचो लहानपणी. इथं लॉकडाऊनची मोडशी नाय सहन होत रे. दिसरात आठवणींच्या वांत्या करतोय मी ! जगात करोनाचं महानाट्य चालू असताना.”

रंगमंचावर उभा राहून कलेची नाळ प्रेक्षकांशी जोडणारा एक अवलिया कलाकार दुसऱ्याला फोनवरून लोककला नाहीतर लॉककलेची व्यथा मांडत होता. करोनाच्या महामारीमुळे दोघांच्याही कलेच्या सारणीत खंड पडला होता. त्याच्यासारख्या अनेक कलावंतांची अवस्था सध्या निराशेनं ग्रासून रंगभूमीच्या ओढीनं जास्त दिसत आहे. आईला आपल्या मुलापासून लांब राहणं जितकं अवघड, तितकचं एका कलाकाराला रंगभूमीपासून लांब राहणं अवघड; कारण रंगभूमी ही कलाकरासाठी मातेसमानचं.

कला हा अभिव्यक्त करण्याचा प्रकार आहे; पण देश लॉकडाऊन झाल्यानंतर कलेचं अभिव्यक्त होणं कुठेतरी हरवलं आहे. कला ही कलाकाराला शांत बसू देत नाही. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून अनेकांनी सोशल मीडियावर सोसल तेवढया वेगवेगळ्या गोष्टींची शक्कल लढवली; पण काही गोष्टी जिथल्या तिथं झालेल्याच योग्य. नाटक हे प्रेक्षकांच्या समोर लाईव्ह सादर होणाऱ्या प्रकरात मोडणारं माध्यम आहे. ते कलाकाराला रंगमंचावर सादर करायला आणि प्रेक्षकांना सभागृहातल्या खुर्चीवर बसून पाहण्यात जो आनंद आहे, तो इतर कुठेही नाही.

सध्या हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या अनेक कलाकारांची अवस्था ही पाण्याबाहेर तडफडत असलेल्या माश्यागत झालेली आहे. त्यातल्या त्यात व्यावसायिक कलाकार आर्थिकदृष्ट्या काही प्रमाणात सदृढ असल्यामुळे लॉकडाऊनचा फारसा फरक त्यांच्यावर पडलेला दिसत नाही; पण टांगती तलवार कुणाच्या गळ्यात लटकलेली असेल तर ते म्हणजे तळागाळातील हौशी कलाकार. जो कलाकार खेड्यापाड्यातून शहरात आपली कला जोपासायला आलेला असतो. मुंबई आणि पुण्यामध्ये ग्रामीण भागातून आपलं नशीब आजमवून पाहण्यासाठी आलेले अनेक कलाकर सध्या आपापल्या गावी घरामध्ये लॉकडाऊन आहेत.

काही शहरातच अडकलेली आहेत. लॉकडाऊन मुळे अंगावर आलेल्या परिस्थितीत काहींचं हातातलं थांबलंय. काहींना काम मिळायच्या मार्गावर होतं; पण करोनानं हातातोंडाशी आलेला घास पळवलाय; तर काही कळीतून फुलायच्या मार्गावर असतानाच त्यांचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आलेलं आहे. हे क्षेत्रच असं आहे की इथं प्रचंड इच्छाशक्ती आणि संयम टिकवून काम करावं लागतं. इकडून तिकडून सकारात्मकरित्या जुळवलेला आत्मविश्वास हा सध्याच्या परिस्थितीत वाऱ्याच्या झुळकेनं ढासळणाऱ्या पत्यांच्या बंगल्यासारखा झालाय. त्यात मन हे इतकं चंचल आहे की सध्याचा वेळ लिहिण्या- वाचण्याच्या कामात कमी आणि अस्वस्थतेकडेच जास्त घेऊन चाललाय. अश्या वेळी मानसिकदृष्ट्या सक्षम राहणं कलाकारासाठी खूप गरजेचं आहे.

ब्याकस्टेज सांभाळणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यात तर अमावसेचा अंधार कायमचा दाटल्या सारखा झालाय. ज्यांच्यावर कुटुंबांची जवाबदारी आहे, त्यांच्यावर तर उपासमारीची वेळ आलेली आहे; कारण त्यांचा आर्थिक स्त्रोत हा पडद्यामागे मागे काम करून मिळवलेल्या तुटपुंज्या रकमेवर अवलंबून आहे. जर सद्यस्थिती मध्ये काही आमुलाग्र बदल झाला नाही. करोनातून लवकरात लवकर सावरलो नाही; तर मात्र जागतिक आर्थिक संकटासोबत जगण्याचाच प्रश्न उद्भवून बसेल. आणि अश्यातच सर्वसामान्य हौशी कलाकारांसोबत सगळेच आळीपाळीनं होरपळून निघतील. वर्तमानाच्या धोक्यातून सावरताना भविष्य संकटात पडतय का ? अश्या प्रश्नांची योग्य उत्तरं शोधून मनाला धीटपणे प्रस्थापित करणं अत्यंत गरजेचं आहे.

काहींसाठी लॉकडाऊन म्हणजे धावत्या जीवनात अपूर्ण राहिलेल्या गोष्टींना वेळ देण्याची सुवर्णसंधी वाटतेय. बरचं काही वाचन करावसं वाटतंय. अनेक लहानमोठ्या लेखकांना जसं की उकळून प्यावासं वाटतय. ते एका ठराविक वेळेपर्यंत पचनी पडतय. पण एकच गोष्ट रोजरोज करून आलेल्या मानसिक थकव्यामुळे मात्र आता हे सगळं नकोसं झालं आहे.

स्तानिस्लावस्कीच्या अभिनय साधनेच्या प्रेमात पडणारा कलाकार आज भविष्याच्या धोकादायक भ्रमात आहे. त्याचं भ्रमात राहणं ही साहजिकच. कोसला वाचून ‘ पांडुरंग सांगवीकरच्या ’ सानिध्यात रमणारा रसिक वाचक एकांतवासात एकलकोंडा झालाय. अनेक चित्रपट पाहून डोळ्यांचा नंबर वाढलाय. त्यात टाळेबंदी मुळे बाहेर जायची सोय नाही. रोजरोज एकाच जागेवर असल्यानं जागेचा वीट आलाय. एकंदरीत लॉकडाऊनमुळे कलाकराला आलेल्या मानसिक अस्वस्थतेमुळे रंगभूमीवरचं भविष्याचं संकट डोकावू लागलंय.

करोना गेल्यानंतर जेव्हा सगळं काही व्यवस्थित चालू होईल, तेव्हा हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर जोमानं काम करण्यासाठी कलाकार सक्षम असेल का ? असा प्रश्न सध्या खूप भेडसावत आहे. पण जर मन ताब्यात ठेवून मिळालेल्या काळाच्या वेळेत भविष्याची योग्य बांधणी करून ठेवली तर कला आणि कलाकार यांना कुणीच एकमेकांपासून दूर करू शकत नाही. सोबत कलाक्षेत्राला अधोगती पासूनही वाचवू शकतो.

सगळं जग लॉकडाऊनमध्ये बंद असताना जगाच्या रंगमंचावर मात्र एक महानाट्य सुरु झालं आहे. एक जानेवारीत चीनच्या वूहानमध्ये तिसरी घंटा वाजली. आणि प्रयोग सुरु झाला. असुरी फिरत्या महानाट्यानं रंगमंचावर कला सादर करणाऱ्या कलाकरांचाचं जीव घेणं सुरु केलं. एकीकडे नाटकानं समाजप्रबोधन होतं तर दुसरीकडे करोना महानाट्याच्या संसर्गजन्य सादरीकरणाने समाज विघटन होत आहे. या महानाट्यावर लवकर पडदा टाकून संपूर्ण जग डिबार होण्यापासून थांबवनं खूप गरजेचं आहे. मनुष्यनिर्मित असलेल्या हया महानाट्यावर एक मनुष्यच साखळी तोडून पडदा टाकू शकतो.

“ हे बघ, तू धीट रहा. संयम ठेव. अस्वथ हो, पण कलेच्या शोधात. सकारात्मकता मरून देऊ नकोस. रोज रोजच्या गोष्टींचा वीट तेव्हा येतो जेव्हा आपण त्याचा आनंद घेत नाहीत. कलाकार म्हणून जे काही करशील त्यात आनंद घे. शेक्सपियरशी बोल. त्याला बिनधास्त विचार की अजरामर लिखाण कसं केलं ? रोमियो जुलियेटला कसा मिळाला ? स्यांडी माईसनर कडून सटल अभिनय शिकून घे. स्तानिसलावस्कीचये पाय धुवून पाणी पी. म्हंजी मेथड आणि स्पॉनटेनिस अभिनय फरक समजून घे. पुढं कामात येईल. कथा, कादंबरी आणि नाटक खाणीतून सोनं उजाळून काढावं तसं वाचून काढ.

करोना गेल्यावर तो दिवस दूर नसेल जेव्हा तू रंगमंचावर भूमिकेची पायाभरणी करताना या सगळ्यांचा बेधडक वापर करशील. हां, पण खचून नायतर करोनाच्या नाकावर टिचून उभं राहायचय ! हे मात्र सदा लक्षात राहूदे. आयुष्याचं नाटक जगत असताना अनेक पात्रांतून जावं लागतं. पात्रांच्या आठवणी साखळी पद्धतीने एकमेकांशी जोडाव्या लागतात. एकदा आयुष्याचं नाटक समजलं की मग रंगमंचावरचं नाटक करणं खूप सोपं होतं. चला, करोना महानाट्यावर पडदा पडण्याच्या उंबरठ्यावर असताना आपण विंगेत पुढच्या नाटकाच्या तयारीत असणं खूप महत्वाचं; नाहीतर "टू बी ऑर नॉट टू बी, दयाट् इज द क्वेशन" जगावं की मरावं हा एकच सवाल ये !..जो सवाल शेवटाला गत्यंतर दिल्याशिवाय राहणार नाही.

लेखक – कृष्णा यमुना विलास वाळके

Similar News