उध्दव ठाकरे यांच्यावर कुणाचा रिमोट...

Update: 2019-12-05 05:31 GMT

शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे मोठ्या थाटात शपथविधी पार पाडल्यानंतर आठवडा होत आला तरी अजून महाराष्ट्र (Maharashtra) विकास आघाडीचा सरकार रूळावर आलेलं नाही. खातेविहीन सहा मंत्र्यांच्या जीवावर उध्दव ठाकरे यांचं कामकाज सुरू आहे. साहजिकच सर्व खाती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या हातात आहेत.

मंत्रिमंडळाचं गठन आणि खातेवाटप हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार असला तरी उध्दव ठाकरे खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार करू शकलेले नाहीत. त्यामुळे या सरकारचा रिमोट बाहेर असल्याचं स्पष्ट झालंय. अंतर्गत वादामुळे आणि वाटाघाटी अपूर्ण राहिल्याने उध्दव ठाकरे सरकार पूर्ण मंत्रिमंडळासह अस्तित्वात येऊ शकलं नाही. त्यामुळे या सरकारला आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या आठवड्यात विंशेष कामकाज करता आलं नाही.

विश्वासदर्शक ठराव आणि फ्लोअर मॅनेजमेंट यात तीन दिवस गेले, तीन दिवस आढावा घेण्यात..मंत्र्यांना खातेवाटप नसल्याने त्यांना अधिकार नाहीयत. राज्यात ज्या पार्श्वभूमीवर निवडणुका झाल्या त्या नैसर्गिक आपत्तींच्या झळा अजूनही लोकांना लागतायत. नवीन सरकारकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत, मात्र आघाडीतल्या घटक पक्षांमधला मंत्रिपदाचा वाद अद्याप सुटत नसल्याने कामकाज ठप्पच आहे. राज्यातल्या जनतेला तुमच्या सत्तावाटपात काहीही रस नाहीय.

राज्याला लवकरात लवकर स्थिर सरकार मिळालं पाहिजे ही लोकांची भावना आहे, तिचा पदोपदी आघाडीचे नेते अनादर करताना दिसतायत. अशा वेळी उध्दव ठाकरे यांनी आपल्या विशेषाधिकारांचा वापर करून ड्रायव्हिॅग सीटचा ताबा घेतला पाहिजे. नाहीतर बॅकसीट ड्रायव्हिॅग करणारे ही गाडी ताब्यात घेतील. सध्या आघाडीचा प्रवास त्या दिशेने होताना दिसतोय.

महाराष्ट्र विकास आघाडी ज्या किमान समान कार्यक्रमाच्या आधारे अस्तित्वात आली त्यात पहिला मुद्दा शेतकऱ्यांच्या मदतीचा आहे, कर्जमाफीचा आहे, सामाजिक न्यायाचा आहे. जर सत्ता हा तुमचा किमान समान कार्यक्रम होता तर तसं त्यात नमूद करायला हवं होतं.

कोणाला किती मंत्रीपदं आणि कोण रुसला-फुगला याच्याशी लोकांना काही देणंघेणं नाही. तुम्हाला सरकार चालवता येत नसेल तर महाराष्ट्राच्या जनतेला तसं सांगा. लोकांना अंधारात ठेऊ नका, हा तुमचा वैयक्तिक व्यवहार नाही हा महाराष्ट्राच्या वर्तमान आणि भविष्याचा प्रश्न आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी विचित्र युती या निवडणुकीच्या नंतर झालीय.

विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश मिळालेला असताना तुम्हाला सत्ता स्थापनेचा मोह होऊ शकतो या मोहापासून लांब राहा असं आम्ही आधीच सांगीतलं होतं. तरीही या आघाडीला सत्तास्थापनेचा मोह झालाच, आता मोह झालाच आहे तर त्यात स्वत:चा स्वार्थ बाजूला ठेऊन काम करा. कुठलंही मंत्रीपद का मिळेना, तुम्हाला जर लोकांची कामंच करायची आहेत तर मग फरक काय पडतो. सरकार फार काळ टिकणार नाही, त्यामुळे जितकी माया जमवता येईल तितकी जमवा या अजेंड्यासाठी जर का ही मारामारी असेल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही.

एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जुगाड करून १६९ झाला आहात. समोर एकसंघ १०५ आमदारांचा विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्षांचा अजेंडा एकदम स्पष्ट आणि टोकदार आहे. त्यामुळे तुमची लढाई सभागृह आणि सभागृहाबाहेरही कठीण असणार आहे. या सरकारच्या बनण्यामागे शरद पवार यांची भूमिका मोठी असली तरी अजित पवार यांच्या हंगामी बंडामुळे पुढच्या प्रक्रीया लवकर पार पडल्या.

चर्चेची गुऱ्हाळं थांबली. सरकार स्थापन झालं, असं असली तरी अजित पवार नाराज आहेत, त्यांचा पक्षावर होल्ड आहे. अजित पवार समर्थक आणि शरद पवार समर्थक असा थेट वाद आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Congress) दिसतोय. काँग्रेसमध्ये निवडून येण्याची क्षमता नसलेल्या नेत्यांनी अचानक वैचारिक भूमिकांचा आग्रह धरला आहे. शिवसेनेतही फार बरं चाललेलं नाहीय. तिथेही दुसऱ्या फळीतल्या नेतृत्वाचा वाद आहेच. हे सगळं येत्या काळात भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडणारं आहेच. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी सगळे रिमोट कंट्रोल झुगारून देऊन सत्ता ताब्यात घेतली पाहिजे.

ज्याची सुरूवात चांगली त्याचा शेवटही चांगला असं म्हणतात, या सरकारची सुरूवात अडखळत झालेली आहे. पुढचा प्रवास कठीण आहेच....

Similar News