बिरसा मुंडा

Update: 2019-11-15 14:39 GMT

१८७५ साली त्याचा जन्म झाला. कोल आदिवासी समाजात. सध्याच्या झारखंड राज्यातल्या छोटा नागपूर प्रदेशात.

तो मेंढ्या चारायचा, बासरी वाजवायचा. जडीबूटीच्या औषधांचं त्याचं ज्ञान अचंबित करणारं होतं.

ब्रिटीशांच्या हाती देशाचा कारभार जाईपर्यंत म्हणजे १९ व्या शतकापर्यंत जंगल-जमीन आदिवासींच्या सामूहिक मालकीची होती. १८६० फॉरेस्ट एक्ट नुसार देशातली सर्व जंगलं ब्रिटीश राज्यकर्त्यांनी बळकावली. सरपण गोळा करणं, तेंदू, आवळे, मोह, चारोळी, मध इत्यादी वेचण्याचा आदिवासींचा हक्क डावलला गेला. जंगलात गुरंढोरं चारणं हा गुन्हा ठरला. ब्रिटीशांनी अन्य भारतीयांना, व्यापार्‍यांना कोल आदिवासींची जमीन विकून टाकली. ते जमीनदार बनले.

धूसर राजकीय पिढीचा दमदार नायक !

सत्ता स्थापनेचं तीन अंकी नाटक- आशिष शेलार

आरएसएसचा झेंडा काढला म्हणून नोकरी गमावली…!

जमीनदाराच्या पालखीसाठी कोलांनी पैसे द्यायचे, पालखीही उचलायची. जमीनदाराच्या घरात लग्न वा पूजा असेल तर त्याचा कर कोलांनी द्यायचा. त्याच्या घरात कुणी मेलं तर कोलांनी दंड भरायचा. कुणी जन्माला आलं तर कोलांनी पैसे द्यायचे. कोलांनी पळून जाईपर्यंत ही लूटमार चालू असायची. कोलांचं शोषण करणारे भारतीयच होते.

१८४५ पासून मिशनरी ख्रिश्चन धर्माचा प्रचार करू लागले. लाखो कोलांचं धर्मांतर करण्यात आलं. मिशनर्‍यांनी शाळा काढल्या. पण कोलांची जमीन ताब्यात घेतली. पारंपारिक देव-धर्मांपासून कोलांना तोडलं. आदिवासींनी त्यांच्या देवांची पूजा करणं हा गुन्हा ठरवला. बिरसाचाही बाप्तिस्मा झाला होता. पण त्याने धर्मगुरूशीच भांडण केलं. म्हणून त्याला शाळेतून हाकलण्यात आलं.

बिरसा एका हिंदू विणकराकडे राह्यला. तिथे तो वैदू म्हणून उपजिविका करू लागला. त्याची किर्ती सर्वदूर पसरली. आदिवासी त्याला ईश्वरी अवतार मानू लागले. १८९५ साली बिरसा प्रेषित झाला. जग नष्ट होणार आहे माझ्या भोवती जे मुंडा जमतील तेच वाचतील. बाकी सर्व परकीय लोक-- ब्रिटीश आणि त्यांचे भारतीय दलाल, जळून खाक होतील अशी भविष्यवाणी त्याने उच्चारली. ही सुरुवात होती राजकीय बंडाची.

टेकडीवर हजारो आदिवासी तीरकमठा, गलोली, कुर्‍हाडी घेऊन बिरसाच्या भोवती जमले. ब्रिटीशांनी बिरसाला अटक केली. दोन वर्षं कारावासात काढून बाहेर आल्यावर बिरसाने आदेश दिला केळ्याच्या झाडांचे पुतळे करून जाळा. हे पुतळे ब्रिटीश सरकारचे होते. १८९९ मध्ये बिरसाने आदिवासींना बंडाचं आवाहन केलं. तीरकमठे, गलोली, कुर्‍हाडी ह्या शस्त्रांनी आदिवासींनी ब्रिटीश, मिशनरी, भारतीय जमीनदार-सावकार यांच्यावर हल्ले केले. हाच उलगुलान… प्रचंड मोठं रणकंदन.

हे बंड चिरडण्यात आलं. बंदुकांच्या गोळ्यांनी. बिरसा जंगलात पळाला. पण मार्च १९०० मध्ये त्याला जेरबंद करण्यात आलं. तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्याने वयाची पंचविशीही पार केलेली नव्हती.

आजही आपण आदिवासींच्या जमिनी हडप करतो आहोत. आपली खनिजं, आपलं पाणी त्यांच्या जमिनीत का, असे प्रश्न विचारतो आहोत. आपल्याला प्रत्युत्तर द्यायला, आपल्या विरोधात बंड करायला, आपल्याला खडसावायला आज बिरसा मुंडा नाही.

सुनील तांबे

ज्येष्ठ पत्रकार

Similar News