अनावश्यक पोटनिवडणुका टाळा

Update: 2019-09-11 09:40 GMT

पोट निवडणूका घेण्याची तीन प्रमुख कारणे आहेत . १-सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी एखाद्या मतदारसंघात अपरिहार्य कारणामुळे निवडणूक रद्द झाल्यास २-एखाद्या सभासदाचे निधन झाल्यामुळे रिक्त पदासाठी ३-एखाद्या सभासदाने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यास.

अहिल्या दोन कारणांसाठी पोट निवडणूक घेणे योग्य आहे परंतु तिसऱ्या कारणासाठी पोट निवडणूक घेणे अनावश्यक ठरते. काही वेळेला एखाद्या खासदारांस राज्याचा मुख्यमंत्री अथवा मंत्री केले जाते. त्यावेळेस त्याला खासदारकीचा राजीनामा तर द्यावा लागतोच परंतु त्याला आमदार म्हणून निवडून येण्यासाठी एखाद्या सुरक्षित मतदार संघ निवडून तेथील आमदाराला राजीनामा द्यावा लागतो. अशा वेळेस लोकसभा आणी विधानसभा अशा दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक घ्यावी लागते.

काही वेळेस काही उमेदवार एका पेक्षा जास्त ठिकाणी निवडणूक लढवतात व दोन्ही ठिकाणी निवडून आल्यानंतर एका ठिकाणचा राजीनामा देतात व तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागते. सध्या पक्षांतराची लाट आली आहे .अनेक आजी आमदार, खासदार राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षांत प्रवेश करत आहेत. अशा वेळेस सुध्दा पोटनिवडणूक घ्यावी लागते. त्यामुळे शासनाला सर्व यंत्रणा राबवावी लागते त्यात शासनाचा वेळ व पैसा खर्च होतो.

अनावश्यक पोटनिवडणूका टाळायच्या असतील तर घटना दुरुस्ती करून एखाद्या आमदार खासदारांने राजीनामा दिल्यास त्याने ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यावेळेस दुसऱ्या स्थानावर असलेल्या उमेदवारास विजयी घोषित करावे. तसेच एका व्यक्तीस फक्त एकाच ठिकाणाहून निवडणूक लढवता येईल असे बंधन घालावे. असे झाले तर अनावश्यक पोटनिवडणूका टाळता येतील.

शासनाने असा बदल केला नाही तर मतदारांनी ज्याच्यामुळे पोटनिवडणूक लादली त्याच्या विरुध्द मतदान करून आपला निषेध व्यक्त करावा.

Similar News