ये तो सिर्फ झांकी हैं…

Update: 2020-08-07 13:47 GMT

आम्ही जेव्हा म्हणतो की, हा देश धर्मांधतेकडे चालला आहे. तेव्हा स्वतःला काही वरवर तटस्थ दाखवणाऱ्या पण आतून स्वधर्माभिमानी असणाऱ्या लोकांना बरोबर मिरची लागते. कुणी कुणाचा धर्म आपल्यापुरता ठेवला तर सामाजिक सौहार्द बिघडत नाही. वैगैरे ज्ञान ते सहज देतात. पण धर्म आपल्यापुरता ठेवणे म्हणजे आपल्या उंबऱ्याच्या आत, त्यातही आपल्या स्वतःपुरता ठेवणे असते.

मी मुस्लिम आहे. म्हणून माझ्या पोराने पाच वेळा नमाज पढावा किंवा मुलीने बुरखा घालावा. ही सक्ती स्वतःच्या घरात आणणे. हा सुद्धा एक कट्टरवाद आहे. तद्वतच एखाद्या धार्मिक स्थळाला अस्मिता बनवून त्यासाठी दंगली आणि राजकारण करणे. हा सुद्धा कट्टरवाद आहे, जो इथल्या हिंदू आणि मुसलमान लोकांनी गेली. कित्येक शतके इमानेइतबारे केलाय. बाकीचे अल्पसंख्याक धर्मही काही कमी नाहीत. तेही त्याच वाटेने जात आहेत. जैनांची शाकाहारावरून असणारी अरेरावी, बौद्धांची मुलनिवासी ही भिकार कल्पना, ख्रिश्चनांचा चमत्कार दाखवून आणि पैसे वाटून केलेला धर्मप्रसार हेही धर्मांधतेचंच लक्षण आहे.

काल राममंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमाचं वार्तांकन पाहताना किंवा सोशल मीडियात तो सात्विक सोहळा कमी आणि बहुसांख्यिक लोकांचा धार्मिक उन्माद जास्त वाटला. काही लोकांना वाटेल की शेवटी अयोध्येचा प्रश्न सुटला, पण तसं अजिबात नाहीये. आता काशी विश्वेश्वर, मथुरा इथेही हीच मागणी सुरू होईल. महाराष्ट्रात उद्या बौद्धांनी लेण्याद्री ही बौद्ध लेणी आहेत. तिथून गणपतीची मूर्ती हलवा असली काही मागणी केली तरी त्यात काही नवल नसेल.

संख्येच्या, राजसत्तेच्या आणि हिंसेच्या जोरावर पुरातनकाळात एकमेकांची धार्मिक स्थळे जमीनदोस्त करणे किंवा बळकावणे हे सामान्य होते. आज आधुनिक आणि धर्मनिरपेक्ष लोकशाहीत जर आम्ही जमीन खोदून शेकडो वर्षे आधी इथे काय होतं, त्यावर धार्मिक स्थळांच्या वाटण्या करायला लागलो तर आपल्या देशाला काहीही भविष्य नाहीये.

1991 साली, बाबरी मशीद पाडण्याच्या एक वर्ष आधी नरसिंहराव सरकारने "Places of Worship Act" आणला होता, त्यानुसार 15 ऑगस्ट 1947 नंतर कुठल्याही एका धार्मिक स्थळाचे दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळात परिवर्तन करता येणार नव्हते. अयोध्या प्रकरणाला इथे सुप्रीम कोर्टाने या कायद्यास अपवाद म्हणून गणले. भविष्यात असे अनेक अपवाद होऊ शकतात आणि धर्मांधतेचे हे पीक वाढत जाईल यात शंका नाही.

कालच्या शिलान्यासानंतर अलीकडेच जनेऊधारी हिंदू झालेल्या राहुल गांधींना अचानक श्रीराम कसे श्रद्धा, न्याय वगैरेचे प्रतीक आहे. याचा साक्षात्कार झाला. ओवैसी आणि मुस्लिम लॉ बोर्डाने विरोधाचा सूर आळवला. तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीच्या कार्यक्रमास एक साधू असल्याने आपण उपस्थित राहणार नाही. हे स्पष्टपणे सांगून टाकले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना जनतेमध्ये कुठल्याही प्रकारे भेदभाव करणार नाही हे सांगावे लागते. मात्र, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना हे लागू होत नाही.

माझ्या लहानपणापासून मी शाळेत, पेपरात ऐकायचो की हिंदू धर्म किती सहिष्णू आहे. पण भारताच्या उत्तरेतल्या गायपट्टयातल्या कट्टर हिंदुत्वाची बाधा आता मीडिया आणि सोशल मीडियातून दक्षिणेतही वेगाने पसरत आहे. मुस्लिमांना तर धार्मिक सुधारणांची थेट ऍलर्जीच आहे. "हिंदू खतरेमें हैं" आणि "इस्लाम खतरेमें है" या दोन्ही घोषणा मूर्ख लोकांच्या आहेत. इथे लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि भविष्य खतरेमें हैं!!

- डॉ. विनय काटे

Similar News