भयावह अराजकाचे सावट

Update: 2017-08-26 06:40 GMT

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग हे बलात्काराच्या केसमध्ये दोषी असल्याचे हायकोर्टाने म्हटले आणि हिंसेचा उद्रेक झाला. हरयाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश , उत्तर प्रदेश या राज्यात हिंसेचा आगडोंब उसळला. आतापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार सुमारे ३० मृत्यू झाले आहेत २५० जखमी झाले आहेत आणि १०००हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शेकडो बसेस जाळण्यात आल्या आहेत. ट्रेन्स पेटवल्या आहेत. सैन्यावर हल्ला करण्यात आला आहे. मीडियाच्या ओबी व्हॅनवर देखील मारा करण्यात आला आहे.एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवताच इतका मोठा हिंसाचार का झाला ?

कोण आहे गुरमीत राम रहीम सिंग ?

१९४८ साली डेरा सच्चा सौदा या स्वयंघोषित समाजकल्याणकारी आश्रमाची स्थापना करण्यात आली. १९४८-१९६० या काळात शाह सतनाम आश्रमाचे प्रमुख होते. या आश्रमाचं मुख्यालय हरियाणातील सिरसा येथे आहे. या आश्रमाच्या ४६ शाखा भारतभर पसरलेल्या आहेत. शिवाय कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, युनायटेड अरब एमिरेटस आदी देशांमध्येही या आश्रमाच्या शाखा आहेत. अंदाजे ६ कोटी या आश्रमाचे अनुयायी असल्याचे सांगितले जाते. १९९० साली गुरमीत रामरहिम वयाच्या तेविसाव्या वर्षी आश्रमाचा प्रमुख बनला. १९९० पासून रामरहिम सिंग यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. या आश्रमाचे भक्त राजस्थान, पंजाब आणि हरयाणा या राज्यात अधिक आहेत याचं कारण व्यसनाधीनतेचे प्रमाण या भागात अधिक असून आश्रम व्यसनमुक्तीचे कार्यक्रम राबवतो, अशी त्याची ख्याती होती. व्यसनाच्या विरोधात काम करत असल्याचा दावा करत आश्रमाच्या आत सर्व गैरव्यवहार सुरु होते. अनेक स्त्रियांवर लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. बाबा राम रहीम यांची खुनांच्या संदर्भात चौकशी झाली. त्यानंतर राम रहिम यांनी ४०० अनुयायांचा लिंगविच्छेद घडवून आणला जेणेकरुन वासना कमी होऊन त्यांना देवाच्या जवळ जाता येईल. या बाबतही त्यांची चौकशी सुरु झाली. २००२ साली दोन साध्वींनी बलात्काराच्या संदर्भात आवाज उठवला. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही पत्र लिहिले.

‘पूरा सच’

रामचंद्र छत्रपती या ‘पूरा सच’ वर्तमानपत्राच्या संपादकांनी या साध्वींचे पत्र छापले. या नंतर त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. धमक्यानंतर त्यांना कोणतीही सुरक्षा देण्यात आली नाही. २४ ऑक्टोबर २००२ रोजी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या प्राणघातक हल्ल्यानंतर ते हॉस्पीटलमध्ये वीस दिवस जिवंत होते मात्र त्यांची मृत्यूपूर्व जबानी घेण्यात आली नाही. कुठलीही चौकशी, तपास करण्यात आला नाही. ज्या साध्वींनी बलात्काराच्या संदर्भात तक्रार केली त्यांच्यापैकी एका साध्वीचा भाऊ रणजित सिंग यांनी बाबा राम रहीम यांच्या खून, बलात्काराची प्रकरणं जनतेसमोर यावीत, यासाठी प्रयत्न केले. त्यांचीही हत्या करण्यात आली.

उच्च न्यायालयाचा निकालः

बलात्काराच्या प्रकरणात बाबा राम रहीम दोषी असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने देताच हिंसेचा उद्रेक झाला. याविषयी हायकोर्टाने लगेच आपली भूमिका मांडली. कोर्टाने या प्रकरणात जी हिंसा डेरा सच्चा सौदा या आश्रमाच्या समर्थकांनी केली त्याची नुकसान भरपाई बाबा राम रहीमच्या संपत्तीतून करण्यात यावी, असे आदेश दिले. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगदीप सिंग यांनी जी धाडसी भूमिका घेतली तिचे अनेक स्तरातून स्वागत होते आहे. अतिशय प्रामाणिक आणि निर्भीड न्यायमूर्ती म्हणून जगदीप सिंग प्रसिध्द आहेत. नुकसान भरपाई बाबा रामरहीम यांच्या संपत्तीतून करण्यात यावी, असे न्यायालयाने सांगितलेले असतानाही हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी सरकार नुकसान भरपाई देईल, असे म्हटलेले आहे.

बलात्कारी बाबाला राजाश्रयः

बाबा राम रहीमने २०१४ च्या निवडणुकीत मतदान करावे, म्हणून मोदींनी या बलात्कारी, खुनी बाबाला लोटांगण घातलं. हरयाणाच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांसह सर्व भाजप मंत्र्यांनी या बाबाला साकडं घातलं. जिंकल्यावर पूर्ण कॅबिनेट धन्यवाद देण्यासाठी आश्रमात गेलं. या निकालाच्या अवघ्या १० दिवसांपूर्वी त्याच्या वाढदिवसासाठी भाजपचे दोन कॅबिनेट मंत्री राज्य सरकारतर्फे ५१ लाखाची भेट देण्यासाठी गेले. २५ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने निकाल देताच या पध्दतीचा हिंसाचार होऊ शकतो, याची कल्पना शासनाला होती म्हणूनच लष्कर, पोलीस तैनात करण्यात आलेलं होतं तरीही एवढा उन्मादी प्रकार घडला. जमावबंदीचे कलम १४४ लागू असल्याचे सांगण्यात आले मात्र ‘श्रध्देवर जमावबंदी लावता येत नाही’ अशी विनोदी विधानं करत प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. जाणीवपूर्वक हिंसा घडू दिली गेली. बाबा राम रहीम यांना शिक्षा झाल्यास ‘पूरा इंडिया तहस नहस कर देंगे’ अशा धमक्या त्यांच्या भक्तांनी एक दिवस आधीच दिलेल्या असतानाही त्याचा गांभीर्याने विचार केला गेला नाही.पोलिसांच्या समोर एनडीटीव्हीची ओबी व्हॅन जाळण्यात आली. अनेक साध्वी पोलिसांसमोर, आर्मीसमोर वाहनं जाळून घोषणा देतानाच्या चित्रफिती दिसत आहेत. मोठ्या प्रमाणावर लष्करी कुमक असतानाही बाबा रामरहीमच्या भक्तांनी आर्मीवरही दगडफेक केली. अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या. शाळा कॉलेजांनाही सुट्ट्या देण्यात आल्या.

एका व्यक्तीमुळं सारी व्यवस्था दावणीला बांधली जाण्याचं हे उदाहरण अभूतपूर्व आहे.

अराजक

हरयाणामध्ये या आधीही जाट आंदोलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हिंसा घडली. मुख्यमंत्री खट्टर हे आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरले. नुकतंच उत्तर प्रदेशमधील गोरखपूर इथे ७१ मुलांचा बळी गेला ऑक्सिजन न मिळाल्याने. यावर तेथील आरोग्यमंत्री म्हणाले- ऑगस्टमध्ये लहान मुलां

चे मृत्यू होतातच.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले, या आधीही अशा घटना घडल्या आहेत, एवढ्या मोठ्या देशात अशा गोष्टी घडत असतात; काहीही घडलं तरी जन्माष्टमी उत्साहात साजरी करा. बाबा रामरहीम घटनेनंतर भाजपचे खासदार साक्षी महाराज म्हणाले, डेरा सच्चा सौदाच्या भक्तांनी केलेल्या हिंसेला न्यायालय जबाबदार आहे. त्यापुढे ते म्हणाले, “ एक दोन लोकांच्या तक्रारीवरुन न्यायालय निर्णय देते आहे; मात्र कोट्यावधी लोक डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम यांना देव मानतात; त्याचे काय ?’ म्हणजे आता न्यायालयाने बहुसंख्य लोक काय म्हणतात यानुसार निर्णय द्यावेत, असा नवा मुद्दा साक्षी महाराजांनी मांडला आहे. बलात्कारी माणसाला देव मानलं जातं हीच मोठी दुर्दैवाची बाब आहे. राहत इंदौरी यांनी म्हटलं आहे- मेरी निगाह में वो शख्स आदमी भी नहीं, जिसे लगा है जमाना खुदा बनाने में !

बहुसंख्याकवादाचे प्राबल्य वाढते आहे. लोकशाहीची वाटचाल झुंडशाहीकडे होते आहे. गेल्या तीन वर्षात झुंडींनी केलेल्या हत्या या प्रवासाच्या निदर्शक आहेत. धर्मसंस्थांचा राज्यसंस्थेच्या कारभारात हस्तक्षेप वाढतो आहे. धर्मसंस्थाच राज्यकारभार करत आहेत की काय, अशी शंका यावी, अशी अवस्था आहे. या विघातक प्रथा संवैधानिक नैतिकतेला हरताळ फासत आहेत. हरयाणाच्या विधानसभेत जैन मुनी तरुण सागर महाराज यांना राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यापेक्षा उंच आसनावर स्थान दिले जाते, ही केवळ प्रतीकात्मक बाब नव्हती तर प्रत्यक्षात तशी राजकीय प्रक्रिया साकारली जात असल्याचेच ते द्योतक होते. या भयानक झुंडशाहीनंतर, उन्मादानंतर तिचे समर्थन केले जात असेल तर त्याहून भयावह काय असू शकेल ! जोवर बाबा रामरहीम, आसाराम बापू यांच्यासारख्या विकृत व्यक्तींच्या समर्थनार्थ रस्त्यावर येणाऱ्या लोकांची संख्या दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येच्या विरोधात रस्त्यावर येणा-यांपेक्षा जास्त असेल तोवर चिंता आहेच.मुख्य म्हणजे अशा बाबाबुवांना राजाश्रय मिळतो आहे त्यामुळे अराजक माजायला वेळही लागणार नाही.विवेकी व्यक्तींच्या विरोधात सरकार आहे. सत्संग, अध्यात्म आदी गोष्टी सांगणारे भक्त हिंसा करतात आणि इतर बाबतीत असहिष्णु असणारे सरकार मात्र भक्तांना हिंसेला खुला अवकाश देते, हे चिंताजनक आहे.

भारतीय लोकशाहीच्या प्रवासातला २५ ऑगस्ट २०१७ हा एक काळा दिवस आहे जो भयावह अराजकाच्या सावटाचे संकेत देणारा आहे!

-श्रीरंजन आवटे

Similar News