स्मार्टफोन - डोळ्यांचा दुश्मन

Update: 2017-03-02 18:41 GMT

मोबाईल फोन ही अपरिहार्य गोष्ट झाली आहे. त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मनोरंजन हरवलंय. मग हा मोबाईलच आता लोकांच्या मनोरंजनाचं साधन झालंय. पण, ते घातक आहे. ऑफिसमध्ये आठ तास लॅपटॉप किंवा कंप्युटरवर काम केल्यानंतर सुद्धा लोक प्रवासामध्ये किंवा घरी गेल्यानंतर सतत मोबाईलवर चॅटींग, गेम, किंवा सिनेमा पहात असतात. त्यातून कंप्युटर व्हीजन सिंट्रोम हा आजार उद्भवतो. डोळ्यातून पाणी येणं, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांवर ताण येणे, ही त्याची काही लक्षणं आहेत. खासकरून कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून अशा तक्रारी वाढल्या आहेत. कित्येकदा आमच्याकडे आलेल्या अशा रुग्णाला डोळ्यांचा इतर कुठलाही त्रास काही नसतो, पण त्यांचे डोळे ताणावलेले असतात किंवा त्यांचे डोळे थकलेले असतात.

अनेक तरुण आजकाल रात्रीच्या अंधारात तासंतास मोबाईलवर चॅटींग किंवा सर्फींग करत असतात. अंधारात अशा प्रकारे मोबाईल पाहणं डोळ्यांसाठी वाईट आहे. खुपकाळ असंच सुरू राहीलं तर डोळयांमध्ये स्पाजम होतो. म्हणजे एका विशिष्ट कोनात डोळे लॉक होतात. आजकाल या केसेस वाढत आहेत. या स्पाजममुळे कधीकधी लोकांच्या डोळ्यांचे नंबर कृत्रिम रित्या वाढतात. डोळ्यांवर ताण येतो. तसंच यामुळे मणक्याचे आणि मानेच्या स्नायुचे आजार सुद्धा होऊ शकतात.

आजकाल तरुणांमध्ये आणखी एक फॅड आहे, ते म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी ग्लासेस किंवा मोबाईल थिएटर व्हीडीओ ग्लासेसमध्ये सिनेमा पाहणे. पण, अशा प्रकारे एवढ्या जवळून सिमेना किंवा टीव्ही पाहणं डोळ्यांसाठी खूपच अपायकारक आहे. त्यामुळे रेटीनावर परिणाम होऊ शकतो.

या सर्व गोष्टींमुळे दृष्टी जाते असं नाही. पण डोळ्यांवर आणि मानेवर आलेल्या ताणामुळे शरीरावर सुद्धा ताण योतो. परिणामी तुमच्या कामावर सुद्धा याचा परिणाम होतो. डोळ्यांना आराम तेव्हाच मिळतो जेव्हा आपण पुरेशी झोप घेतो. त्यामुळे डोळ्यांसाठी पुरेशी झोप फार महत्त्वाची आहे. कंप्युटर किंवा मोबाईलवर तासंतास पाहणं बंद केलं तर हे आजार टाळता येऊ शकतात. तासंतास लॅपटॉवर काम करणं अपरिहार्य असेल तर प्रत्येत तासाला डोळ्यांना आराम दिला पाहीजे. उठून एक राउंड मारा, काही मिनिटांचा ब्रेक घ्या. जागेवरून उठू शकत नसाल तर मान वर करून काही काळ छताकडे पाहा. दोन्ही हात काहीवेळ डोळ्यावर ठेवून रिलॅक्स व्हा (पामिंग करा) मग पुन्हा कामाला सुरूवात करा.

चष्मा असेल तर डोळ्यांवर ताण येत नाही आणि नसेल जर तो जास्त येतो किंवा त्याच्या बरोबर उलट चष्मा असल्यावर ताण येतो आणि नसल्यावर येत नाही. या सगळ्या गैरसमजुती आहेत. जास्त मोबाईलच्या वापरामुळे प्रत्येकाच्या डोळ्यावर ताण हा येतोच.

डोळ्यावर ताण येत असेल तर चुकूनही डोळ्यात मध, दूध किंवा गुलाबजल सारख्या गोष्टी टाकू नका. चालढकल करू नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. यावर सर्वात मोठा उपाय म्हणजे मोबाईल फोन कमीत-कमी किंवा गरजेपुरताच वापरणे.

लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आईवडील लहान मुलांच्या हातात सहज मोबाईल देतात. पण अशानं मुलांच्या कोवळ्या डोळ्यावर परिणाम होतात. मुलांच्या डोळ्यांबाबत आईवडीलांनी सजग असणं गरजेचं आहे. मुलं मोबाईलमध्ये गुंतल्यानं त्यांचा आईवडीलांशी संवाद कमी होतो. नातेसंबंधांचा बंध योग्य प्रकारे निर्माण होत नाही. आजकाल तर एका घरात राहून लोकं व्हॉट्स ऍपवर बोलतात. किंवा फॅमिलिसोबत डिनरला जातात आणि मोबाईलमध्ये डोकं घालून बसतात. त्यामुळे नातेसंबंधांमधला संवाद कुठे तरी हरवत चाललाय. त्यामुळे त्याचा सोशल इम्पॅक्ट सुद्धा आहेच.

अर्थात या युगात टेक्नोलॉजीपासून दूर राहणं कुणालाच फारसं शक्य नाही. वेगवेगळ्या कामात मोबाईलची गरजही भासतेच. त्यामुळे गरज आहे ती त्यात फार मोठ्या संशोधनाची. डोळ्यांना अपायकारक ठरणार नाही अशा मोबाईलवर संशोधन होणं गरजेचं आहे.

पण शेवटी एकच सांगते कुठल्याही गोष्टीची अतिरेक ही नुकसानकारक आहेच.

 

डॉ. रागिनी पारेख

प्रमुख, नेत्र विभाग, जे. जे. समूह रुग्णालय, मुंबई

 

 

Similar News