का ढळतोय मोदींचा तोल ?
Max Maharashtra | 5 May 2019 11:56 AM GMT
X
X
गल्लीत खेळताना दोन मुले एकमेकांशी भांडू लागतात. पहिला दुस-याला म्हणाला की तू चोर आहेस. तर दुसरा त्याला म्हणतो तुझा बाप चोर आहे, असंच काहीसं चित्र सध्या देशाच्या राजकारणात दिसतं आहे. राफेल डील (rafale deal) प्रकरणी चौकीदार चोर आहे. ही मोहीम कॉंग्रेसने उघडल्याने त्रस्त झालेल्या पंतप्रधांन नरेंद्र मोदींनी त्याला उत्तर देताना थेट दिवंगत पंतप्रधांनानाच चोर ठरवताना त्यांच्या मरणापर्यंत ताणल्याचं उत्तरप्रदेशातील एका सभेत पहायला मिळालं. त्यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आता राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना हे वक्तव्य म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असून महात्मा गांधींच्या राज्यातील व्यक्ती इतकं खोटं आणि खालच्या पातळीचं बोलत असल्याबाबत कॉंग्रेसचे रणनितीकार आणि राजीव गांधीचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी दुखः व्यक्त केलंय.
वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तोल सुटत चालला आहे का? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. जेव्हा तुम्ही तुमचे उद्दिष्ट गाठू शकत नाही. असं लक्षात येतं तेव्हा उद्विग्नतेतून आणि निराशेतून तुम्ही अशी कृती करू लागता. कमरेखाली वार करणं, पातळी सोडून बोलणं अगदी गल्लीबोळातील भांडणाचे स्वरूप राजकीय भाषणांना येणं. हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नक्कीच नाही. राहूल गांधी यांच्या चौकीदार चोर आहे. या वाक्याने चिडून जाऊन तुझा बाप चोर आहे असं म्हणण्यासारखे आहे. राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स प्रकऱणात आरोप झाले होते हे जरी सत्य असले तरी ते दोषी सिद्ध झाले नव्हते. तसंच पंतप्रधान पदावर असताना त्यांना देशासाठी आपला प्राण गमवावा लागला होता. ही बाब पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीने दुर्लक्षून चालणार नाही. शिवाय पंतप्रधानपदाला शोभेसे बोलणं सदर व्यक्तीकडून अपेक्षित असतं..
याबाबत बोलाताना पित्रोदा म्हणतात, पंतप्रधांनांनी असं वक्तव्य का केलं ? त्यांच्या या वाक्याने आम्हाला लाज वाटते आहे. मी सुद्धा एक गुजराती असून गांधीजींच्या राज्यातून आलो आहे. या राज्यातील नेत्याने एवढं खोटे आणि खालच्या पातळीचे बोलावं याचं आश्चर्य आणि दुखः वाटत असल्याचं त्यांनी सांगितले. त्यांनी राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने आम्ही खूप दुखावलो गेलो असून साधारणतः एखाद्या देशाचा पंतप्रधान हा लोकांसाठी बोलतो.
ही एक मोठी जबाबदारी आहे. पंतप्रधानांनी अनुचित बोलू नये. मात्र, उत्तरप्रदेशातील एका जाहीर सभेत राहूल गांधींवर टीका करताना मोदी म्हणाले की, तुमचे वडील हे मरेपर्यंत एक नंबरचे भ्रष्टाचारी होते. ही अतिशय निंदनीय बाब असल्याचे पित्रोदा म्हणाले असून मोदींच्या या वक्तव्य़ाबाबत अन्य राजकीय पक्षांसह जनमानसामध्येही नापसंती व्यक्त केली जाते आहे.
Updated : 5 May 2019 11:56 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire