Home > Election 2020 > लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे सरकारं मिळतात, ही मांडणी योग्य आहे का?

लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे सरकारं मिळतात, ही मांडणी योग्य आहे का?

लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे सरकारं मिळतात, ही मांडणी योग्य आहे का?
X

कॉंग्रेसला कमी जागांवर समाधान मानायला लागेल. सत्तेपासून दूर रहायला लागेल, अशी शक्यता पोल सांगत आहेत. लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे सरकारं किंवा लोकप्रतिनिधी मिळतात, जॉर्ज ऑरवेल टाइप विश्लेषण कॉंग्रेसवाले करायला लागलेत. हे बघा, लोकांना अजिबात नावं ठेवू नका. स्वतःच्या आत डोकावून बघा आधी, मग काय बोला.

लोकांना गरज आहे आपली. राजकीय अपरिहार्यतेत पर्याय म्हणून लोकं आपल्यालाच निवडून देतील. लोकंच बदल घडवतील. आता बदल ही लोकांचीच गरज आहे, अशी धारणा बाळगून निवडणुका जिंकता येत नसतात राजे हो! होय, राजेच तर आहात तुम्ही. लोकांना गृहीत धरुन दरबारी, सरंजामी वृत्तीने घराणेशाहीचे राजकारण करणारे राजेच आहात ना तुम्ही! त्यात आणखी भ्रष्टाचाराची किती किती कथित आणि खरी प्रकरणं समोर आली. म्हणून तर हे धर्म, जात, पंथ, संप्रदाय यातून पोलरायझेन करणारे सरकार छाताडावर बसले ना देशाच्या.

एक लक्षात घ्याल, की आपल्या देशात सामान्य लोकं सरकारं निवडून देत नाहीत. सरकारं पाडतात. २०१४ ला लोकांनी कॉंग्रेस सरकार पाडले होते. बीजेपीला निवडून दिलेले नव्हते. मात्र सरकार पाडायला असंतोष पेरणाऱ्या, आकर्षक आणि तरीही आक्रमक प्रचाराचे पाठबळ लागते. मुख्य म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध यंत्रणा लागते. ते तेव्हाच्या कॉंग्रेस विरोधकांकडे होते २०१४मध्ये. आता इथे तर उलटेच, सगळेच गार गार, हतबुद्ध!

सध्याच्या काळात पारंपरिक पद्धतीने निवडणूक लढता, लढवता येत नाहीत. अमेरिकेत हिलरी क्लिंटन कशा आपटल्या, जगभर उजव्या विचारांची सरकारे येताहेत. हे कॉंग्रेस नेतृत्वाने बघितले नव्हते का? ही वैश्विक दृष्टीच नाहीये का नेतृत्वाकडे? वेळीच सावध होऊन, सर्वार्थाने ताकदवान, बलवान पक्षाने पसरवलेले न्यारेटिव्ह क्रैक करायला, कार्यकर्त्यांत चैतन्य भरायला कॉंग्रेस पक्षाने कोणती यंत्रणा उभी केली होती? खाटल्यावर निवांत झोपून देशाची सत्ता मिळत असते काय? निवडणूक तोंडावर आलेली असताना, इथले तिथले सरंजामदार दुषणं देत, एकमेकांची उणीदूणी काढत बसले होते. त्यांच्या कळवंडी बघून कॉंग्रेसचे नेतृत्व आणि हितचिंतक यांच्याहून जास्त काळजीत बुडाले होते. बरं ही कॉंग्रेसप्रणित 'पक्षांतर्गत लोकशाही' म्हणावी तर निवडणुकीदरम्यान तसे एकजीव होऊन प्रचारात उतरतानाही हे लोक दिसले नाहीत. लहान गट, पक्ष, पक्षाचा वोट बेस असलेल्या समाज घटकांना सामावून घ्यायचा, दूर गेलेल्यांना जवळ घ्यायचा, चुचकारायचा कोणता प्रयत्न झाला? यासाठी कोणता कार्यक्रम होता पक्षाकडे? संघाच्या 'उजव्या' विचाराला विरोध करणारे अनेक 'मध्यममार्गी' तरुण समाजमाध्यमांत एकटे एकटे किल्ला लढवत होते. कॉंग्रेसमध्ये सक्रिय व्हायची इच्छा होती त्यांना जवळ घ्यायला, जोडून घ्यायला कोणीही नेता पुढे आल्याचे दिसले नाही. पक्ष अडचणीत असतानाही बेरजेच्या राजकारणाचा इतका तिटकारा कसा काय? नवीन कोणी आले तर आपण बाहेर होऊ, अशी असुरक्षिततेतून आलेली भीती तर मनात नाहीये ना? कॉंग्रेस नेतृत्व प्रयत्न करते आहे. मग सगळे ठीक होईल, अशा गाफिल मानसिक वृत्तीने विजयाचा गुलाल तुमच्यावर कोण, का उधळेल?

राज्यातल्या सध्याच्या कॉंग्रेस नेतृत्वाविषयी नेमके काय बोलावे? आपण विरोधी पक्षात आहोत, असे नेत्यांना रोज सकाळी-दुपारी-सायंकाळी कोणीतरी सांगायला हवेय, अशी एकूण शोचनीय स्थिती आहे!

राहुल किंवा प्रियंका किंवा तत्सम कोणीतरी प्रयत्न करतील, स्वतःला स्टेकला लावतील, आम्हांला आयती सत्ता मिळेल, मग आम्ही आरामात बसून, खुर्च्या उबवू, अशा खुशालचेंडू मानसिकतेचे अनेक लाभार्थी कार्यकर्ते, नेते इथे आहेत. या कल्चरलाच हे लोकं पक्ष किंवा यंत्रणा असे म्हणत असले पाहिजेत!

राज्यात स्वतःच्या करिष्म्यावर गर्दी खेचेल, असा लोकांचे पाठबळ असलेला एखादा प्रभावी वक्ता नेता आजमितीस पक्षात नाही हे १३५ वर्षाची परंपरा, वारसा आणि इतिहास असलेल्या राजकीय पक्षाचे वास्तव आहे! म्हणूनच ठाकरी शैलीतल्या प्रचार सभा बघून, या पक्षातल्या कार्यकर्त्यांना गुदगुल्या होऊ लागल्या. 'राज की बात' सुरु झाल्यानंतर कुठे यांच्याही प्रचारात थोडाफार उत्साह संचारला.

पैशांशिवाय अजिबात न हलणारी, अजगरासारखी सुस्तावलेली पक्ष संघटना, हरलेल्या मानसिकतेचे कार्यकर्ते, काडीचाही आत्मविश्वास नसलेली त्यांची देहबोली. यांना बघून कोण मतं देणार? हल्ली सामान्य लोकांना अश्वासक चेहरा आकर्षित करतो. ही व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करु शकते, असा विश्वास जागवायला लागतो. असे चेहरे दिसले नाहीत. सत्ताविरोधी मानसिकतेच्या मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत खेचून आणायला सक्षम नसलेली 'यंत्रणा', गावात-वॉर्डात निवडणूक घेऊन जाणाऱ्या चैतन्यदायी तरुणांचा अभाव, शिस्तशीर, रचनात्मक, वैचारिक स्पष्टता, नावीन्यहीन प्रचार व्यवस्थेचा अभाव. शिवाय लोकांना यांचा त्रास होतोय ना मग आम्हांला निवडून द्यावे, अशी अपेक्षा. अशा राजकीय प्रतिक्षालयात बसून विजयी होता येत नसते. अशा आणखी कितीतरी गोष्टी सांगता येतील. मतदान घडवून कोणी आणायचे, सामान्य नागरिकांनी? तुम्ही काय फक्त सत्तेच्या ढेपेला चिकटायला आहात? पक्ष म्हणून एकदिलाने, संघटित होऊन प्रयत्न कोणी करायचे? शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी की आणखी कोणी? आणि काळाची कुस वांझ नसते! तुमच्याशिवाय लोकांचे काहीही अडलेले नाही, हेही कॉंग्रेसजनांनी लक्षात ठेवायला हवे. यश पक्षाचे आणि अपयशाला लोकं कारणीभूत! वा रे वा... उगीच लोकांना दोष देण्यात काही हशील नाही. दक्षिणेकडील राज्यांत अपवाद वगळता भाजपाला लोकांनी स्वीकारलेले नाहीये. यामागील कारणांचा कधी गंभीर होऊन विचार केलाय? मात्र प्रादेशिक पक्षाचा पर्याय नसलेल्या जागी कॉंग्रेससोबत थेट लढत असलेल्या राज्यांत भाजपा पुढे जाताना दिसतेय. लोकांमध्ये प्रस्थापित सत्तेविषयी नाराजी असताना असे होतेय, हे कशाचे लक्षण आहे? कॉंग्रेसची संघटना मरणासन्न अवस्थेत आहे. ती उभी करायची इच्छाशक्ती नाही. कोणाला काहीही पडलेले नाहीये? हेच यातून अधोरेखित होते.

लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत कॉंग्रेसइतकी विस्कळीत यंत्रणा देशात कोणत्याही राजकीय पक्षाची नसेल. बरं आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महानगरपालिका, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे तसेच सहकारी संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटनेतले नेते स्वतःच्या निवडणुकीत जितका जीव ओतून काम करतात, तसे लोकसभेच्या निवडणुकीत हे लोक काम करताना दिसले नाहीत. अर्थात काही ठिकाणी नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मात्र तन-मन-धनाने स्वतःची म्हणून निवडणूक लढवली. मात्र असे बोटावर मोजता येतील इतकेच. तिकडे पक्षाला मतदानही चांगले झाल्याचे दिसेल. कॉंग्रेसच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या गाडीचे पैसे हेच इंधन असते. ते नाहीतर गाडी चालत नाही. जागेवर उभी असते, मग तातडी किंवा राजकीय आणीबाणी किती का असेना...

तुलनेने समोर आक्रमक, प्रभावी, शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा आणि जोडीला मुबलक गंगाजळी! काहीही झाले तरी मोदींनाच पंतप्रधानपदावर बघायच्या इरादयाने, ध्येयाने पूर्णपणे झपाटलेले, पेटलेले असंख्य कार्यकर्ते. सत्तेसाठी वाटेल ते करायची तयारी... कणाहीन नोकरशाही, बहकलेला मीडिया, सत्तेच्या सुरात सूर मिसळू बघणाऱ्या ECसारख्या महत्त्वाच्या संस्था, भीतीच्या सावटाखालची न्याययंत्रणा असेही घटक असले तरी कॉंग्रेस संघटनेतल्या चैतन्याच्या अभावाचे विश्लेषण करायला हवे. कॉंग्रेस राफेल राफेल म्हणत, न्याय योजना सांगत बसलेली असताना आणि समोरुन पोलरायझेनचे नाना प्रकारचे फंडे प्रत्यक्षात आणले जात होते. याला सामोरे कसे जायचे, हे समजून घेऊन त्याला प्रतिसाद द्यायच्या आधी मतदान प्रक्रिया संपली. आता मतमोजणीत ही 'पॉलिटिकल पोलरायझेनची ग्याप' तशीच नाही राहिली तरच नवल! अनेक मतदारांनी तर प्रादेशिक पक्षांना जवळ केल्याचे बोलले जातेय. खातरीने लगेच काही सांगता येत नाही. निकाल येईपर्यंत वाट बघायला लागेल. आता यात विजय नेमका कोणाचा होणार, हेच बघायचे. २३ तारीख जवळ आली आहे! यदाकदाचित कॉंग्रेसला सन्मानजनक जागा मिळाल्याच, तर त्यात पक्षाची प्रभावी प्रचार यंत्रणा म्हणून, स्थानिक पातळीवरील नेतृत्व म्हणून योगदान किती असेल? याचे निराळया प्रकारे विश्लेषण करायला लागेल. आणखी बरेच मुद्दे आहेत, तुर्तास इतकेच.

आणि हो, निवडणुकीच्या आधी हे लिहायचे नव्हते. कारण अवसान गळालेल्या, मरणासन्न अवस्थेत असल्याने सॉफ्ट टारगेट झालेल्या पक्ष संघटनेविषयी लिहायची अजिबात इच्छा होत नव्हती.

Updated : 21 May 2019 5:07 AM GMT
Next Story
Share it
Top