Home > Uncategorized > आयआयटी मुंबईला केंद्राकडून एक हजार कोटी रुपये

आयआयटी मुंबईला केंद्राकडून एक हजार कोटी रुपये

आयआयटी मुंबईला केंद्राकडून एक हजार कोटी रुपये
X

संशोधन, नावीण्यपूर्णतेवर विशेष भर द्या

56 व्या दीक्षांत समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आवाहन

आयआयटी मुंबईचे देशातील नामांकित संस्थांमध्ये स्थान

2621 विद्यार्थ्यांना पदवीप्रदान तर 380 विद्यार्थी पीएचडीने सन्मानित

भारत हे जगातील सर्वात मोठे तांत्रिक मनुष्यबळ असलेले केंद्र

आयआयटी म्हणजे इंडियाज इन्स्ट्रुमेन्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईला केंद्र शासनाच्या मानव संसाधन विभागाच्या वतीने एक हजार कोटी रुपयांचे साहाय्य देण्यात आले आहे. त्यातून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होणार असून संशोधन आणि नावीण्यपूर्णतेवर विद्यार्थ्यांनी विशेष भर द्यावा, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले. आयआयटी मुंबईच्या 56 व्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

कार्यक्रमास राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभीच प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दीक्षांत समारंभात पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. गेल्या सहा दशकांत आयआयटीने केलेल्या निरंतर प्रयत्नांमुळे आज या संस्थेने देशातील नामांकित संस्थांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आयआयटी आणि येथील पदवीधरांच्या उल्लेखनीय कार्याचा राष्ट्राला अभिमान आहे. आयआयटीच्या यशाने देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची निर्मिती झाली, ज्यांची आयआयटी ही प्रेरणा आहे, यामुळे भारत हे जगातील सर्वात मोठे तांत्रिक मनुष्यबळ असलेले केंद्र बनले असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी यावेळी म्हणाले.

गेल्या चार वर्षांमध्ये आपल्या सर्वांसाठी शिकण्याचा एक अद्भूत अनुभव होता, महाविद्यालय उत्सव, वसतीगृहे, आंतर विद्याशाखा, संघटना आदी गोष्टींमधून त्याची प्रचिती आपल्याला येते. दर्जेदार, सर्वोत्कृष्ठ शिक्षण आपल्याला या शिक्षणप्रणालीद्वारे प्राप्त झाले आहे. येथे विद्यार्थी भारताच्या विविधतेचे प्रतिनिधीत्व करतात, विविध भाषा, अनेकविध प्रकारची पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी ज्ञान आणि शिकण्यासाठी येथे एकत्र होत असल्याचेही प्रधानमंत्री म्हणाले. आयआयटीला देशात, जगात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून ओळखले जात असले तर आज त्याची व्याख्या बदलली आहे, हे फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहिली नाही तर, आयआयटी म्हणजे इंडियाज इन्स्ट्रुमेन्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (भारताच्या परिवर्तनाचे साधन) झाले असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले.

स्टार्टअपची क्रांती ज्या वेगाने देशात झाली त्याचा स्त्रोत आपल्या आयआयटी आहेत, असे सांगून आज जग आयआयटींना युनिकॉर्न स्टार्ट अप्सची नर्सरी म्हणून ओळखत आहे. तंत्रज्ञानाचा आरसा असलेल्या या संस्थांमधून जगाचे भविष्य आपल्याला दिसत आहे. नावीन्यता आणि उद्योगांच्या माध्यमातून भारताची विकसित अर्थव्यवस्थेची पायाभरणी होत आहे. या पायाभरणीतून शाश्वत आणि दीर्घकाळ तंत्रज्ञानावर आधारित आर्थिकवृद्धी होणार आहे. नावीण्यता हा एकविसाव्या शतकातला एक महत्त्वाचा शब्द आहे. कोणतीही संस्था नावीन्यतेशिवाय स्थिर होऊ शकत नाही. याच नावीण्यतेच्या शोधातून भारत हे स्टार्टअपचे केंद्र म्हणून उदयास आले आहे, नावीन्यता आणि उद्योगासाठी भारत हे जगाचे आकर्षण केंद्र व्हावे, यादृष्टिने आपण प्रयत्न करीत असून हे केवळ शासनाच्या प्रयत्नांतून नाही होणार तर त्यासाठी आपल्यासारख्या तरुणांची आवश्यकता आहे, असे सांगून केवळ शासकीय कार्यालय किंवा झगमगीत कार्यालयांमधून हे होणार नाही तर अशा नावीण्यपूर्ण संकल्पना आयआयटीसारख्या कॅम्पसमधून आणि आपल्यासारख्या युवकांच्या मनातून निर्माण होतील, असेही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.

आपले लक्ष्य नेहमी उच्च असू द्या, केवळ महत्त्वाकांक्षाच नाही तर आपले लक्ष्य, उद्दिष्ट हे सुद्धा महत्त्वाचे असते असे सांगून इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण खूप परिश्रम केले आहेत, अनेक लोक प्रतिकूल परिस्थितीत इथपर्यंत पोहोचलेत, आपल्यात असलेल्या अभूतपूर्व क्षमतेमुळे आपल्याला त्याचे प्रभावी परिणाम पाहायला मिळत असल्याचेही प्रधानमंत्री म्हणाले. आज प्रदान झालेली पदवी ही आपल्या समर्पण आणि बांधिलकीचे प्रतीक आहे, हा केवळ एक टप्पा असला तरी खरे आव्हान अजून आपल्याला पेलायचे आहे. आज आपण जे काही मिळवले आहे आणि जे मिळवायचे आहे, त्यामागे तुमच्या, परिवाराच्या आणि सव्वाशे कोटी देशवासियांच्या आशा-अपेक्षा जोडल्या गेल्या असल्याचेही श्री. मोदी म्हणाले.

प्रारंभी आयआयटी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष दिलीप शंघवी यांनी दीक्षांत समारंभाचे प्रास्ताविक केले. तर संचालक प्रा. देवांग खक्कर यांनी अहवालाचे सादरीकरण केले. सिम्फनी एआय ग्रुपचे अध्यक्ष डॉ. रोमेश वाधवानी यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयआयटी मुंबईच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी तसेच पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. आयआयटी मुंबईच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या विविध तंत्रज्ञानाधारित प्रदर्शनाला प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी भेट देऊन पाहणी केली आणि या प्रदर्शनातील उपकरणे,शोध पाहून विद्यार्थ्यांचे कौतूक केले.

2621 विद्यार्थ्यांना पदवीप्रदान तर 380 विद्यार्थी पीएचडीने सन्मानित

आज आयआयटी मुंबईच्या झालेल्या 56 व्या वार्षिक दीक्षांत समारंभात 2621 विद्यार्थ्यांना विविध विषयांतील पदवी प्रदान करण्यात आली तर 380 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवीने सन्मानित करण्यात आले. आयआयटी मुंबई आणि मोनाश विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या पीएचडी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मोनाश विद्यापीठाचे कुलगुरु तथा अध्यक्ष प्रा. मार्गारेट गार्डनर यांच्या हस्ते 29 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

Updated : 11 Aug 2018 12:58 PM GMT
Next Story
Share it
Top