Home > Uncategorized > प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते होणार औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते होणार औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते होणार औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन
X

जगभरातील व देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बुधवार, दि. 9 ते रविवार, दि. 13 जानेवारी 2019 या दरम्यान आयनॉक्स प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते होणार असून, या प्रसंगी महोत्सवाच्या पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. यंदा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री मा. गिरीष कासारवल्ली यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी ज्युरी कमिटीचे अध्यक्ष व प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एन. चंद्रा,चित्रपट निर्माते किरण शांताराम,चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे, औरंगाबाद शहराचे महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, विभागीय केंद्राचे अध्यक्ष मा. अंकुशराव कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

या महोत्सवाचे उद्घाटक असलेल्या मधुर भांडारकर यांनी बॉलीवूड सिनेमा क्षेत्रात चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार व चित्रपट निर्माता या भूमिकेतून उल्लेखनिय कार्य केलेले असून त्यांनी त्रिशक्ती या सिनेमाद्वारे या क्षेत्रात पदार्पण केलेले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘चांदणी बार’ या हिंदी सिनेमाला उत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे. ‘फॅशन, पेज थ्री, कॅलेंडर गर्ल्स, इंदू सरकार, हिरोईन, दिल तो बच्चा है जी, ट्रफिक सिंग्नल, जेल, कार्पोरेट’ यासह अनेक दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन करणार्या भांडारकर यांनी बॉलीवूड सिनेमा इंडस्ट्रित आपले वर्चस्व निर्माण केलेेले आहे.

पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार्या ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीष कासारवल्ली यांना भारतीय समांतर सिनेमांच्या अग्रणींपैकी एक मानले जाते. मुखत्वे कन्नड भाषेतील सिनेमात कार्य केलेले कासारवल्ली यांना आजवर चौदा राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यांच्या घटश्राध्द, तबराना काठे, थय्यी साहेबा व द्विपा या सिनेमांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सिनेमांचे पारितोषिक मिळालेले आहे. भारत सरकारने त्यांना सन 2011 साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले आहे.

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील वीस महाविद्यालयांमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आलेले असून दि. 3 जानेवारी रोजी नाट्यशास्त्र विभाग, डॉ. बा.आं.म.विद्यापीठ, देवगिरी महाविद्यालय येथे, दि. 4 जानेवारी रोजी विद्यार्थी कल्याण विभाग, डॉ.बा.आं.म.विद्यापीठ, एम.आय.टी. महाविद्यालय, दि. 5 जानेवारी रोजी स.भु. विज्ञान व स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालय येथे, दि. 6 जानेवारी रोजी मौलाना आझाद महाविद्यालय व वाय.बी.चव्हाण फार्मसी कॉलेज येथे कार्यशाळांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर वसंतराव नाईक महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालय, एम.जी.एम. पत्रकारीता महाविद्यालय, जी. वाय. पाथ्रीकर महाविद्यालय यांसह अनेक महाविद्यालयांत कार्यशाळा संपन्न होणार आहे. या कार्यशाळांमध्ये मा. अशोक राणे, मा. शिव कदम, मा. डॉ. आनंद निकाळजे, मा. योगिता महाजन, मा. पवन गंगावणे, मा. अविनाश रावते, मा. योगेश इरतकर, मा. प्रा. ज्योती स्वामी हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहण्याकरीता प्रतिनिधी नोंदणीची सुरवात करण्यात आलेली असून जगातील व देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमे औरंगाबादच्या रसिकांना बघता यावे, याकरीता सर्वसामान्य नागरिकांकरीता केवळ चारशे रुपये कॅटलॉग शुल्क आकारण्यात येणार आहे, तर ज्येष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात केवळ दोनशे रुपयांत या फेस्टिव्हलचा आनंद घेता येणार आहे. सहा जानेवारी पासून प्रतिनिधी नोंदणी सुरवात होणार असून 1) आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल 2)नाथ सीड्स,पैठण रोड 3)एमजीएम फिम्स आर्टस् डिपार्टमेंट, एमजीएम परिसर 4) निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड 5) विशाल ऑप्टिकल्स, पवन गॅस एजन्सी समोर, उस्मानपुरा 6) हॉटेल स्वाद, उस्मानपुरा 7) हॉटेल नैवेद्य, सिडको बसस्टॅण्ड 8) साकेत बुक वर्ल्ड, औरंगपुरा 9) जिजाऊ मेडिकल, टि.व्ही. सेंटर या केंद्रांवरती चित्रपट रसिकांना प्रतिनिधी नोंदणी करता येईल.

औरंगाबादचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, औरंगाबाद विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम,महोत्सवाचे संचालक अशोक राणे, सचिन मुळे, सतीश कागलीवाल, प्रोझोन मॉलचे व्यवस्थापक मोहम्मद अर्शद, उद्योजक उल्हास गवळी,आकाश कागलीवाल,बिजली देशमुख आदींनी केले आहे.

Updated : 3 Jan 2019 9:58 AM GMT
Next Story
Share it
Top