Home > Uncategorized > बीडमध्ये वाळूमाफिया- अधिकारी अभद्र युती; पुराव्यासह पोलखोल

बीडमध्ये वाळूमाफिया- अधिकारी अभद्र युती; पुराव्यासह पोलखोल

बीडमध्ये वाळूमाफिया- अधिकारी अभद्र युती; पुराव्यासह पोलखोल
X

बीडचा महसूल विभाग सतत चर्चेत असतो. गेल्या महिन्याभरापासून बीड जिल्ह्यात वाळूमाफियांनी घातलेल्या धुडगुसामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र याकडे महसूल खात्याने साफ दुर्लक्ष केल्याचा सार्वत्रिक सूर आहे. बीडमध्ये कोणताही वाळू घाट नियमानुसार सुरू नसताना चोरटी वाळू वाहतूक करण्याऱ्या वाळूमाफियांचा धंदा तेजीत चाललाय. बीड महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे वाळूमाफिया आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. हा पर्दाफाश बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील राजापूर गावात झालाय. या गावात वाळूमाफियांनी करून ठेवलेल्या हजारो ब्रास वाळू साठयावर जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी अचानक धाड टाकल्याने वाळूमाफिया आणि त्यांना साथ करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.

वाळूसाठा प्रकरणावरून राजापूर गावचे तलाठी दादासाहेब आंधळे यांना गेवराईच्या तहसीलदार संगीता चव्हाण यांनी निलंबित केलंय. मात्र ज्या वाळूघाट प्रकरणावरून आंधळे यांना निलंबित करण्यात आलंय त्या वाळूघाटाची माहिती आधीच आंधळे यांनी तहसीलदार संगीता चव्हाण, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांना दिली आहे, याचे सबळ पुरावे जिल्हाधिकाऱ्यांपुढे सादर करून त्याची पोलखोलही केलीय. कसे ते नेमके पाहू या!

जिल्हाधिकाऱ्यांची ऑन दी स्पॉट धडक

बीड जिल्हा गेवराई तालुका राजापूर गावालगत गोदापात्र आहे. याच गोदापात्रात वाळूमाफियांनी हजारो ब्रास अवैध वाळूसाठा जमा केला होता. या वाळू साठ्याची खबर मिळाल्यानंतर, बीडचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. पांडेय यांनी दोन दिवस आणि एक रात्र या स्पॉटवर मुक्कामही ठोकला. या छाप्यात त्यांनी हजारो ब्रास वाळूसाठा जप्त केलाय. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढया मोठ्या प्रमाणात वाळूसाठा जप्त करण्यात आलाय. पांडेय यांनी हा सर्व वाळूसाठा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणून टाकलाय.

विभागीय अधिकारी निलंबनाचा प्रस्ताव पाठवला आहे- जिल्हाधिकारी

या संदर्भात बीडचे जिल्हाधिकारी, आस्तिककुमार पांडेय यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणात विभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांना निलंबित करा , असा प्रस्ताव आयुक्तांना पाठवला आहे. असं 'मॅक्समहाराष्ट्र'शी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.

    • या वाळूसाठा प्रकरणावरून राजापूरचे तलाठी दादासाहेब आंधळे यांना गेवराईच्या तहसीलदार, संगीता चव्हाण यांनी तात्काळ निलंबित केलंय. मात्र ज्या कारणावरून आंधळे यांना निलंबित केलंय त्या वाळूसाठाविषयी तलाठी आंधळे यांनी वेळोवेळी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, गेवराई तहसीलदार संगीता चव्हाण व तलवाडा पोलीस ठाणे अधिकारी यांना तोंडी, लेखी अर्जाद्वारे, मोबाईल मॅसेजद्वारे , वॉटसऍप मॅसेजद्वारे कळवल्याचे सर्व पुरावे आंधळे यांच्याकडे आहेत. आंधळे यांच्याकडून कारवाईसाठी पुरेस मनुष्यबळ पुरवण्याची मागणी तसेच पोलीस बंदोबस्ताची मागणीही केली जात होती. मात्र त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून कधीच सहकार्य मिळालं नाही. त्यामुळं आंधळे यांना कारवाईची इच्छा असूनही ती वरिष्ठांमुळं करता आली नाही, हा प्रकार त्यांच्याकडील पुराव्यामुळं उघड झालाय. तर तलाठी आंधळे यांनीही वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने कारवाई होत नव्हती, असं सांगितलंय.

  • या सर्व प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालंय. जर एखाद्या तलाठ्याला कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना एवढे मेसेज करूनही सहकार्य मिळत नसेल तर तो एकटा तलाठी काय करू शकतो ? किंवा संबंधित वरिष्ठ अधिकारीच हा अवैध वाळूसाठा करून वाळू वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांशी संधान बांधून नाहीत ना ? जर सहकार्य करत नसतील तर तलाठ्याने वेळोवेळी लोकेशन देऊन, वाळू माफियांवर आणि दडवून ठेवलेल्या वाळू साठ्यावर, वरिष्ठ अधिकार्यांयनी कारवाईचे धाडस का दाखवले नाही ? असे एक ना अनेक सवाल यानिमित्तान उपस्थित होत आहे.
  • तलाठी दादासाहेब आंधळे यांनी न्यायासाठी जिल्हाधिकारी पांडेय यांच्याकडे धाव घेतली. आंधळे यांनी दिलेल्या निवेदनावर जिल्हाधिकारी पांडेय यांनी अभिप्राय दिलाय, की जर sdm , pi , तहसीलदार वाळूमाफियांवर कारवाई करू शकत नाहीत तर एकट्या तलाठ्याला निलंबित करून काय उपयोग ? त्यानंतर त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभोदय मुळे यांच्या निलंबनाचा प्रस्तावही आयुक्त सुनील केंद्रेकर यांना पाठवला आहे.
  • एकंदर वाळूमाफियांना वाळू वाहतूक करण्यासाठी, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य असल्याचा हा पुरावा मानला जात आहे. त्यामुळे अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

विनोद जिरे | बीड

Updated : 26 Jun 2019 1:01 PM GMT
Next Story
Share it
Top