X

रायगड (धम्मशिल सावंत)- रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील उध्दर हद्दीतील मौजे करंजघर येथील जिवा फुडस प्रा.लि. मशरुम कंपनीविरोधात गजानन वाडेकर (अपंग व्यक्ती) रा. करंजघर यांनी सोमवार दि. (27)पासून पाली तहसिलकार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. सदर उपोषणावर प्रशासनामार्फत अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याने आठव्या दिवशी दि.(3) रोजी देखिल वाडेकर यांचे उपोषण सुरुच आहे. दरम्यान उपोषणकर्ते गजानन वाडेकर यांची प्रकृत्ती दिवसागणिक खालावत असल्याचे पाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुत्सम दामले यांनी उपोषणकर्त्यांच्या तपासणीनंतर सांगितले. गजानन वाडेकर यांनी तब्बल 10 महिण्यापासून जिवा फुड कंपनीवरोधात कारवाईच्या मागणीसाठी स्थानिक व जिल्हा प्रशासनासह मंत्रालयस्तरावर पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान जिवा फुड मशरुम कंपनीतील कामगारांनी कंपनीत मिळालेल्या रोजगारातून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्याने कंपनी बंद करु नये अशी मागणी निवेदनाद्वारे पाली तहसिलदार बि.एन.निंबाळकर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे एका बाजूला गजानन वाडेकर यांचे आमरण उपोषण तर दुसर्‍या बाजूला कामगारांचे पोषण अशा दुहेरी पेचात अडकलेले प्रशासन यावर नेमका कसा मार्ग व तोडगा काढणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. गजानन वाडेकर यांनी केलेल्या तक्रारीत जिवा फुडस कंपनीत उत्पादीत होणार्‍या मशरुमच्या प्रक्रीयेदरम्यान परिसरात असह्य दुर्गंधी पसरत असल्याने नागरीकांच्या जिवितास धोका निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे. तसेच कंपनीच्या विस्तारीकरणादरम्यान शासन नियम धाबेवर बसवून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत असल्याचा आरोप करीत जिवा फुडस कंपनीवर शासन प्रशासनामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात यावी, सदर बांधकाम हटविण्यात यावेत या प्रमुख मागणीसह गजानन वाडेकर यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत आमरण उपोक्षण सुरु केले आहे. येथील मौजे करंजघर सर्व्हे नं. 15-1 , 15-1 , 13-6 , 13-6 , हे सर्व्हे नं.चे मालक आणि जिवा फुडस मशरुम कंपनीचे संचालक यांनी लागवडीयोग्य शेतजमीनीत पक्के स्टिल सिमेंट कॉक्रीटचे अंडरकिंग आर.सी.सी बांधकामे अनधिकीकृत व अरेरावीने केली असल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्ते व ग्रामस्तांकडून होत आहे. जिवा फुड कंपनीच्या वाढत्या तक्रारींबाबत यापुर्वी आ. धैर्यशिलदादा पाटील यांनी देखील कंपनी व्यवस्थापन, शासन प्रशासन, स्थानिक व लोकप्रतिनिधींसमवेत बैठक बोलावली होती. परंतू जिवा फुड कंपनीचे मालक बैठकीस गैरहजर राहिल्याने आमदारांनी उपस्तीत कंपनी व्यवस्थापकांना खडसावले होते. अशातच जिवा फुडस मशरुम कंपनीने बांधकाम करताना आवश्यक परवाणग्या घेतल्या नसल्याचा आरोप उपोषणकर्ते वाडेकर यांनी केला आहे. याबाबतचे तक्रारी निवेदनाच्या प्रत जिल्हाधिकारी रायगड यांच्यासह महसुलमंत्री महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त कोकण भवन सि.बि.डी, बेलापूर, प्रदुषण महामंडळ सि.बि.डी बेलापूर, नगररचनाकर रायगड अलिबाग आदिंना देण्यात आल्या आहेत. जोपर्यंत जिवा फुड मशरुम कंपनीतील विनापरवाणा करण्यात आलेल्या बांधकामावर हातोडा पडत नाही व मागणिनुसार प्रत्यक्षात कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरुच राहिल असा इशारा उपोषणकर्ते वाडेकर यांनी दिला आहे.

दरम्यान पाली तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की जिवा फुड मशरुम कंपनीत झालेल्या अनधिकृत बांधकामावर प्रशासनामार्फत यापुर्वी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. परंतू उपोषणकर्त्यांनी अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी केली असून सदर कारवाई करण्याचे अधिकार माझ्या अखत्यारीत नाहीत. त्यामुळे मा. रायगड जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी रोहा यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तसेच जिवा फुड मशरुम कंपनीचे अधिकार्‍यांना चर्चेस निमंत्रीत केले असून ते अद्याप आले नसल्याचे तहसिलदार यांनी म्हटले.

दरम्यान जिवा फुडस कंपनी व्यवस्थापक राहूल शेडगे यांची याप्रकरणी प्रतिक्रीया जाणून घेतली असता कंपनीतील बांधकामाकरीता पाली तहसिलकार्यालयाकडून आकारलेला दंड जमा करण्यात आला आहे. तसेच आवश्यक असलेल्या परवाणगीकरिता जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले.

Updated : 3 Sep 2018 9:12 AM GMT
Next Story
Share it
Top