Home > Uncategorized > 'भाजपनं जे पेरलं ते उगवलं'

'भाजपनं जे पेरलं ते उगवलं'

भाजपनं जे पेरलं ते उगवलं
X

सोशल मीडियावर भाजपने जे पेरलं ते उगवलं अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबुक पेजवरून दिली आहे. भाजपनं जे अस्त्र वापरले ते त्यांच्यावरच बुमरँग झाल्यावर नोटिसा पाठवण्याच्या कारवाईवर त्यांनी टीका केली आहे.

राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट अशी आहे......

भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय.

निवडणूका जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासनं दिली, लोकांची मनं भडकवण्यासाठी खोट्याचं खरं करून दाखवलं, आणि जे याला विरोध करत होते त्यांना 'ट्रोल्स' च्या माध्यमातून शिवीगाळ केली, त्यांचं खच्चीकरण केलं.

हे सगळं करून सत्तेवर आल्यावर,नीट काम केली असतीत, दिलेली आश्वासनं पूर्ण केली असतीत तर एक वेळ लोकांनी दुर्लक्ष केलं असतं.

पण आश्वासनं पूर्ण करणं सोडा, तुम्ही सत्तेच्या मग्रूरीत निवडणुकीच्या काळांत दिलेली आश्वासनं हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला 'जुमला' होता असं निर्लज्जपणे जाहीर केलंत.

तुम्ही केलेल्या नोटबंदीने अर्थव्यवस्था डबघाईला गेली, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, महागाईने कळस गाठलाय आणि एवढं होऊन देखील लोकांनी तुम्हाला जाब विचारायचा नाही? पंतप्रधान स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात आणि जनतेला राजा, मग राजाने सेवकाला कामचुकारीबद्दल प्रश्न विचाराचे नाहीत?

आणि सोशल मीडियावर जाब विचारला म्हणून तुम्ही नागरिकांना पोलिसांकरवी नोटिसा धाडणार? पंतप्रधानांच्या फसलेल्या योजनांविषयी लिहिलं, त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि पोलिसांना जर धडाधड नोटिसा पाठवायला लावणार असाल तर मग तुम्ही पोसलेल्या लाखो 'ट्रोल्सचं' काय?

फोटोशॉपचा वापर करून नव्हत्याच, होतं केलंत. तुम्हाला विरोध करणाऱ्या पत्रकारांबद्दल, विचारवंतां बद्दल भारतीय जनता पक्षाच्या आयटी आणि सोशल मीडियाकरवी इतकं गलिच्छ लिहिलं गेलं की ते वाचून मरू दे तो सोशल मीडिया असं वाटावं. तेंव्हा नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला?

दुसऱ्या राजकीय पक्षांची,त्यांच्या नेत्यांची थट्टा करताना तुम्हाला आनंद मिळत होता पण तुमची थट्टा व्हायला लागल्यावर तुम्ही पोलिसी बळाचा वापर करणार?

स्वाती चतुर्वेदी नावाच्या पत्रकार बाईंनी लिहिलेल्या I am a Troll पुस्तकांत भारतीय जनता पक्षाची आयटी आणि सोशल मीडिया टीम कसं काम करते याची पूर्ण माहिती आहे.

या भस्मासुरांना तुम्ही पोसलंत, त्यांच्या बरोबर पंतप्रधान सेल्फी घेतात, त्यांना ट्विटरवर फॉलो करतात याचा अर्थ अराजक पसरावणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालताय. आणि तुमच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढणाऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करून दहशत बसवताय हा प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही

ज्यांना ज्यांना अश्या नोटिसा सरकारने धाडल्या असतील किंवा धाडल्या जातील त्यांनी माझ्याशी [email protected] या माझ्या ईमेल आयडीवर संपर्क साधा,तुमचं नाव,पत्ता,पोलीस स्टेशनचं नाव संपर्क क्रमांक कळवा. पुढे पाहू काय करायचं ते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच नाही तरी कोणाही सामान्य माणसाला जरी अशी नोटीस आली तरी मला कळवा.

अजून एक बाब, मी पहिल्यापासून पोलिसांच्या पाठीशी ठाम उभा होतो,आहे आणि राहणार. माझी पोलीस बांधवाना विनंती आहे की तुम्ही सरकारच्या दडपणाखाली असल्या गोष्टी करू नका, सरकार बदलत राहतात, सरकारच्या सांगण्यावरून असल्या चुकीच्या गोष्टी करू नका.

Updated : 27 Sep 2017 5:30 AM GMT
Next Story
Share it
Top