गुंतवणूक करताना प्रमोटर होल्डिंग का महत्त्वाची?
X
एखाद्या कंपनीत गुंतवणूक करताना सर्वसाधारण गुंतवणूकदार सर्वप्रथम पाहतो ते म्हणजे कंपनीची कमाई, नफा किंवा बाजारभाव. पण यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रमोटरची हिस्सेदारी.
प्रमोटर होल्डिंग म्हणजे काय?
जेव्हा एखादी कंपनी सुरू होते, तेव्हा तिच्या 100% शेअर्सवर प्रमोटरचा ताबा असतो. पण कंपनीला व्यवसाय विस्तारासाठी किंवा भांडवल उभारणीसाठी पैसे लागतात. त्यावेळी प्रमोटर आयपीओ (IPO) किंवा इतर मार्गाने निधी उभा करतो. यासाठी तो आपले काही शेअर्स विकतो किंवा बँकांकडून कर्ज घेण्यासाठी ते गहाण ठेवतो.
उदाहरण पाहूयात
प्रमोटरकडे 100% शेअर्स असतील. त्याने 20% शेअर्स विकले, तर त्याच्याकडे आता 80% हिस्सेदारी राहते.
सेबीचे नियम काय सांगतात?
सेबीच्या नियमानुसार, प्रमोटरकडे 75% पेक्षा जास्त शेअर्स ठेवता येत नाहीत. त्यामुळे उर्वरित शेअर्स सामान्य गुंतवणूकदार, संस्थात्मक गुंतवणूकदार किंवा सार्वजनिक भागधारकांकडे जातात.
गुंतवणूक करताना काय तपासावे?
गुंतवणूकदारांनी खालील गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे –
प्रमोटरकडे 50% पेक्षा जास्त हिस्सेदारी आहे का?
– असल्यास कंपनीत त्यांचा विश्वास व नियंत्रण अधिक आहे.
गेल्या 5 वर्षांत प्रमोटरची हिस्सेदारी वाढली आहे का कमी झाली?
– हिस्सेदारी वाढत असेल तर प्रमोटर कंपनीच्या भविष्यातील वाढीवर विश्वास दाखवत आहेत.
– हिस्सेदारी कमी होत असेल तर सावध राहणे गरजेचे.
शेअर्स गहाण ठेवले आहेत का?
– प्रमोटरने आपले शेअर्स गहाण ठेवले असतील, तर त्याचा अर्थ कंपनीवर कर्जाचा भार जास्त आहे. ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते.
गुंतवणूक करताना प्रमोटर होल्डिंगकडे दुर्लक्ष करू नका. प्रमोटरची मजबूत हिस्सेदारी गुंतवणूकदारांना आत्मविश्वास देते. तर हिस्सेदारी कमी होणे किंवा गहाण ठेवलेले शेअर्स हा धोक्याचा इशारा असू शकतो. म्हणूनच, गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी कंपनीच्या प्रमोटर होल्डिंगचा नीट अभ्यास करा.