Home > Top News > शस्त्रविराम झाल्यावर इंदिरा गांधी अचानक व्हायरल का झाल्या ?

शस्त्रविराम झाल्यावर इंदिरा गांधी अचानक व्हायरल का झाल्या ?

शस्त्रविराम झाल्यावर इंदिरा गांधी अचानक व्हायरल का झाल्या ?
X

भारत आणि पाकिस्तानमध्ये नुकताच शस्त्रविराम झाल्याची अधिकृत घोषणा झाली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये माजी पंतप्रधान, दिवंगत इंदिरा गांधी यांच्याशी संबंधित माहिती अचानक सोशल मीडियासह बातम्यांमध्ये झळकू लागली. यामागील कारणांचा आढावा घेऊया...

१९७१ च्या भारत-पाक युद्धात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची राजकीय इच्छाशक्ती, सैन्यदलासंदर्भातील रणनीती आणि आंतरराष्ट्रीय धोरणांचं संतुलन कसं राखलं पाहिजे याचा प्रत्यय त्यावेळी दिला, जो आजही शैक्षणिक अभ्यासक्रमात शिकवला जातोय.

इंदिरा गांधींनी त्याकाळी पूर्व पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अत्याचाराविरोधात मानवाधिकाराचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित केला होता. अमेरिका आणि चीनसारख्या बलाढ्या देशांच्या दबावापुढं न झुकता त्यांनी बांग्लादेश मुक्तिसंग्रामाला सार्वजनिकरित्या समर्थन दिलं होतं.

सोव्हिएट संघासोबत ‘१९७१ मैत्री संधी’ करारावर स्वाक्षरी करुन इंदिरा गांधींनी अमेरिकेचा संभाव्य हस्तक्षेप रोखला होता, हे विशेष. १६ डिसेंबर १९७१ ला पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी भारतासमोर आत्मसमर्पण केलं होतं. हे आत्मसमर्पण आजवरच्या कुठल्याही युद्धातील सर्वात मोठं आत्मसमर्पण समजलं जातं.

१९७२ चा शिमला समझौता, राजकीय मास्टरस्ट्रोक ?

पाकिस्तानसोबत १९७१ चं युद्ध जिंकल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे १९७२ मध्ये शिमला समझौता झाला. या करारानुसार पाकिस्तानसोबत शांतीपूर्ण संवाद ठेवण्यावर एकमत झालं. शिवाय दोन्ही देशांमध्ये कुठलाही वाद हा द्विपक्षीय संवादातून सोडवला जाईल, हे देखील मान्य करण्यात आलं. आजच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिमला कराराची पुन्हा चर्चा सुरु झालीय. त्याची कारणंही तशीच आहेत. काही जणांना हा करार दूरदृष्टीचा वाटतो. त्यांना हा करार म्हणजे शक्तिशाली भारताचं शांती प्रस्थापित करण्यासाठीचा हा महत्त्वाचा प्रयत्न वाटतो. तर काहींना ही इंदिरा गांधींच्या कुटनीतीची चूक वाटते. त्यांना वाटतं की, पाकिस्तानवरील युद्ध जिंकल्यानंतर त्या परिस्थितीचा भारताला राजकीय फायदा घेता आला नाही.

शस्त्रविरामानंतर लोकं इंदिरा गांधींच्या अंतर्गत सुरक्षा नीतीवरही चर्चा करु लागले आहेत.

RAW (Research and Analysis Wing) या महत्त्वाच्या संस्थेची निर्मिती देखील इंदिरा गांधी यांच्याच कार्यकाळात करण्यात आली होती. या संस्थेनं अल्पावधीतच भारताबाहेरच्या गुप्तचर यंत्रणेला नवी दिशा मिळाली.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि सीमेलगतची राज्य (उदा. जम्मू-काश्मीर, पंजाब) आणि त्यांच्या संदर्भात जलद निर्णय घेण्याच्या इंदिरा गांधींच्या क्षमतेचीही चर्चा या शस्त्रविरामाच्या अनुषंगानं नव्यानं सुरु झालीय.

अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रविरामाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची तुलना केली जातेय. काहींच्या मते, सध्याचे नेते हे राजकीय लोकप्रियता आणि आंतरराष्ट्रीय दबावाखाली येऊन संवाद आणि शांततेच्या मार्गाचा अवलंब करतात.

तर दुसरीकडे जनहित आणि देशाच्या एकात्मतेसाठी कठोर निर्णय घ्यायला इंदिरा गांधी मागेपुढे पाहत नसतं. जरी हे निर्णय सुपर पॉवर समजणाऱ्या देशाच्या विरोधात असले तरी, असे निर्णय घेतांना इंदिरा गांधींनी राष्ट्रहितालाच प्राधान्य दिल्याचं काही नेटिझन्सचं म्हणणं आहे.

ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर इंदिरा गांधींची जुनी भाषणं, मुलाखती आणि युद्ध काळातल्या पत्रकार परिषदांमधील बाईट्स चे व्हिडिओ, कोटप्लेट्स व्हायरल होऊ लागले, ते याच नेतृत्व कौशल्यांमुळं.

युद्धकाळात इंदिरा गांधींची काही वक्तव्यं पुन्हा नव्यानं व्हायरल होऊ लागली आहेत. जसे की,

“अगर कोई सोचता है कि भारत कमजोर है, तो वह बहुत बड़ी भूल कर रहा है।” – इंदिरा गांधी (1971 च्या युद्धावेळी)

Updated : 11 May 2025 8:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top