Home > Top News > मुख्यमंत्री मंत्रालयात का येत नाहीत

मुख्यमंत्री मंत्रालयात का येत नाहीत

मुख्यमंत्री मंत्रालयात का येत नाहीत
X

महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री नियमितपणे मंत्रालयात येत असताना राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मात्र मंत्रालयात येत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या या अनुपस्थितीवरून सध्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा आहे. तब्येतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री बाहेर फिरत नाहीत, लोकांमध्ये मिसळत नाहीत अशी चर्चा असतानाच मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर पर्यंतचा प्रवास स्वतः गाडी चालवत केला होता. त्यानंतर मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील अनुपस्थितीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता.

उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या महामारीनंतर आपलं सगळं कार्यालयच मातोश्री येथून चालवण्याचा निर्णय घेतला. उध्दव ठाकरे यांच्यासोबत बऱ्याचदा मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे ही असतात. उध्दव ठाकरे यांनी आतापर्यंत कॅबिनेट, विरोधी पक्षांसोबतची बैठक, अधिकारी किंवा उद्योगपती यांच्यासोबतच्या बैठका या सर्व बैठकांसाठी व्हिडीयो कॉन्फरन्सचा आधार घेतला होता. मुख्यमंत्र्यांना भेटायला शरद पवार ही दोन वेळा मातोश्री वर जाऊन आले.

उध्दव ठाकरे यांच्या मंत्रालयातील अनुपस्थितीचा मुद्दा राजकीय होऊ लागल्याने आज अखेरिस त्यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तंत्रज्ञानामुळे सर्व अधिकाऱ्यांशी एका जागेवर बसून बोलता येतं, आढावा घेता येतो. गर्दीत जाऊन मीच नियम का मोडू असा प्रतिप्रश्न विचारत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या मंत्रालयातील अनुपस्थितीचं समर्थन केलं आहे. मी मुख्यमंत्री आहे, माझ्या भोवती सुरक्षा रक्षकांचं कडं असतं त्यामुळे मला शारीरिक अंतर राखता येतं, मात्र जनतेचं काय. जनता मात्र गर्दीत असणार आहे. त्यामुळे जनतेमध्ये जायचं टाळतो असं ही मुख्यमंत्र्यांनी सांगीतलं आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांवरील अनेक आक्षेपांचे खुलासे उध्दव ठाकरे यांच्यामार्फत करण्यात आले.

Updated : 25 July 2020 2:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top