७५ व्या वर्षी पीएम मोदींची गुंतवणूक कुठे ? FD आणि NSC वरच सर्वाधिक भर
Where does PM Modi invest at the age of 75? Most emphasis is on FD and NSC
X
PM Narendra Modi Birthday News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आर्थिक गुंतवणुकीबाबतची माहिती पुन्हा चर्चेत आली आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट यांसारख्या धोकादायक गुंतवणुकीपासून दूर राहून मोदींनी आपली बचत सुरक्षित आणि निश्चित परतावा देणाऱ्या साधनांत केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या संपत्ती विवरणपत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ३ कोटी ४३ लाख रुपये झाली आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार एका वर्षात त्यांच्या संपत्तीत ४३ लाख रुपयांची वाढ झाली आहे. २०२४ मध्ये ती ३.०२ कोटी होती, तर २०१९ मध्ये २.५१ कोटी रुपये होती.
बँक FD मध्ये ३.२६ कोटी रुपये
मोदींचा सर्वाधिक विश्वास बँक फिक्स्ड डिपॉझिटवर आहे. गांधीनगर येथील एसबीआय बँकेत त्यांनी तब्बल ३ कोटी २६ लाख ३४ हजार रुपये FD मध्ये ठेवले आहेत. निश्चित परतावा आणि सुरक्षिततेमुळे त्यांनी हा पर्याय निवडला आहे.
NSC मध्ये जवळपास १० लाखांची गुंतवणूक
पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC) योजनेत मोदींनी ९ लाख ७५ हजार रुपये गुंतवले आहेत. ५ वर्षांच्या मुदतीच्या या योजनेवर ७.७% वार्षिक व्याजदर आणि आयकर कलम ८०सी अंतर्गत करसवलत मिळते.
सोन्याच्या अंगठ्या आणि बँक बॅलन्स
मोदींकडे एकूण ४ सोन्याच्या अंगठ्या असून त्यांचे वजन ४५ ग्रॅम आहे. त्यांची एकूण किंमत ३.१० लाख रुपये आहे. तर गांधीनगर एसबीआय खात्यातील बॅलन्स फक्त १,१०४ रुपये आहे.
म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये शून्य गुंतवणूक
लक्षवेधी बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्युच्युअल फंड, शेअर्स, बॉण्ड किंवा डिबेंचरमध्ये एकही पैसा गुंतवलेला नाही. त्यांचा संपूर्ण भर सुरक्षित गुंतवणूक पर्यायांवरच आहे.
कमाईचा स्रोत काय?
मोदींच्या संपत्ती विवरणपत्रानुसार त्यांची प्रमुख कमाईची साधने म्हणजे सरकारी पगार आणि FD व सेव्हिंग्सवर मिळणारे व्याज. गेल्या वर्षभरात त्यांच्या उत्पन्नावर १.६८ लाख रुपये टीडीएस वजावट झाली आहे, तर एफडीवरून २.२० लाख रुपये व्याज मिळाले आहे.
अशा प्रकारे मोदींची संपत्ती वाढली
२०१४ : १.६५ कोटी रुपये
२०१९ : २.५१ कोटी रुपये
२०२४ : ३.०२ कोटी रुपये
२०२५ : ३.४३ कोटी रुपये
गेल्या ११ वर्षांत नरेंद्र मोदींच्या संपत्तीत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.
PM Narendra Modi यांच्या गुंतवणुकीवरून हे स्पष्ट होते की सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या बँक FD आणि स्मॉल सेव्हिंग्स स्कीम आजही सर्वात विश्वसनीय गुंतवणूक पर्याय मानले जातात.