Home > Top News > गुंतवणूक सुरू करण्याची योग्य वेळ कोणती ?

गुंतवणूक सुरू करण्याची योग्य वेळ कोणती ?

गुंतवणूकीत चक्रवाढ व्याजाची जादू कशी काम करते समजावून घ्या !

गुंतवणूक सुरू करण्याची योग्य वेळ कोणती ?
X

“गुंतवणूक कधी सुरू करावी?” हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. काहीजण विचार करतात की जास्त पगार मिळाल्यावर किंवा भरपूर बचत झाल्यावर गुंतवणूक करावी, पण वस्तुस्थिती अशी आहे की गुंतवणूक सुरू करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे – आजच!

गुंतवणुकीत वेळ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जितक्या लवकर आपण पैसे गुंतवायला सुरुवात करतो तितकी चक्रवाढ व्याजाची ताकद आपल्याला मदत करते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने २५ व्या वर्षी दरमहा ठरावीक रक्कम गुंतवायला सुरुवात केली, तर ४५ व्या वर्षी सुरू केलेल्या व्यक्तीपेक्षा त्याच्याकडे निवृत्तीच्या वेळी अनेक पटीने जास्त निधी जमा होतो. यालाच “चक्रवाढीची जादू” असे म्हटले जाते.

लवकर गुंतवणूक सुरू करण्याचे फायदे

लवकर गुंतवणूक सुरू करण्याचे आणखी एक फायदे म्हणजे जोखीम घेण्याची क्षमता जास्त असणे. तरुण वयात आर्थिक जबाबदाऱ्या तुलनेने कमी असतात, त्यामुळे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडासारख्या दीर्घकालीन पण जोखमीच्या पर्यायात गुंतवणूक करता येते. वयानुसार जोखीम घेण्याची तयारी कमी होत जाते आणि मग सुरक्षित पण कमी परतावा देणाऱ्या पर्यायांवर समाधान मानावे लागते.

गुंतवणूक सुरू करण्यासाठी मोठी रक्कम हवी का?

गुंतवणूक सुरू करण्यासाठी “मोठी रक्कम” असणे आवश्यक नाही. छोट्या रकमेतूनही गुंतवणूक सुरू करता येते. म्युच्युअल फंडातील SIP (Systematic Investment Plan) हा यासाठी उत्तम मार्ग आहे. दरमहा ५०० किंवा १००० रुपयांनीही सुरुवात करून मोठा निधी उभा करता येतो. महत्त्वाचे म्हणजे सुरुवात करणे आणि सातत्य ठेवणे.

तरीही, गुंतवणूक सुरू करण्याआधी काही प्राथमिक गोष्टी पूर्ण करणे गरजेचे आहे. जसे – आपत्कालीन निधी तयार करणे, जीवन व आरोग्य विमा घेणे, आणि जास्त व्याजाचे कर्ज कमी करणे. यामुळे गुंतवणुकीतील पैसा दीर्घकाळ सुरक्षित राहतो व मध्येच तोडण्याची वेळ येत नाही.

गुंतवणूक लवकर सुरू केल्यास कसा फायदा होतो?

अजय (२५ व्या वर्षी गुंतवणूक सुरू करणारा) आणि विजय (३५ व्या वर्षी गुंतवणूक सुरू करणारा). दोघांनी दरमहा ₹५,००० गुंतवले, आणि गृहीत धरू की त्यांना सरासरी १२% वार्षिक परतावा मिळाला.

१) अजय – २५ व्या वर्षी गुंतवणूक सुरू

मासिक गुंतवणूक: ₹५,०००

वार्षिक गुंतवणूक: ₹६०,०००

कालावधी: ३५ वर्षे (२५ व्या वर्षापासून ६० व्या वर्षापर्यंत)

एकूण गुंतवलेली रक्कम: ₹२१,००,०००

अपेक्षित परतावा (१२%): सुमारे ₹३.5 कोटी

२) विजय – ३५ व्या वर्षी गुंतवणूक सुरू

मासिक गुंतवणूक: ₹५,०००

वार्षिक गुंतवणूक: ₹६०,०००

कालावधी: २५ वर्षे (३५ व्या वर्षापासून ६० व्या वर्षापर्यंत)

एकूण गुंतवलेली रक्कम: ₹१५,००,०००

अपेक्षित परतावा (१२%): सुमारे ₹९० लाख


अजयने फक्त १० वर्षे लवकर सुरुवात केली, पण त्याच्याकडे निवृत्तीनंतर जवळपास ₹३.५ कोटी जमा झाले.विजयकडे फक्त ₹९० लाख जमा झाले. म्हणजेच फक्त १० वर्षांच्या उशिरामुळे विजयने सुमारे ₹२.६ कोटींचा फायदा गमावला!

Updated : 20 Aug 2025 10:51 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top